कर्जत-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावरील दोन्ही पुलांची कामे प्रगतीपथावर लॉकडाऊन मध्ये कामे सुरू

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


  


कर्जत :-  तालुक्यातील कर्जत-नेरळ-कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर दोन लहान पुलांची कामे सार्वजनिक बांधकाम खात्याने हाती घेतली होती.मार्च महिन्यात लॉक डाऊन सुरू झाल्यानंतर त्या दोन्ही पुलांची कामे बंद पडली होती.मात्र शासनाने सार्वजनिक हिताची कामे करण्यास तिसऱ्या लॉक डाऊन मध्ये परवानगी दिल्यानंतर तुटपुंज्या मजुरांना सोबत घेऊन त्या दोन्ही पुलांची कामे पूर्णत्वाकडे नेली आहेत.दरम्यान,पावसाळा सुरू होण्यापूर्वी पुलांवरून वाहतूक सुरू झालेली असेल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे.


 


                         कर्जत-नेरळ-शेलू कर्जत हद्द या कर्जत-कल्याण राज्यमार्गाचा भाग असलेल्या रस्त्यावर राज्य सरकारच्या हायब्रीड तत्वावर रस्त्याचे काँक्रीटकरण आणि डांबरीकरण ही कामे मंजूर आहेत.त्या रस्त्याच्या 21 किलोमीटर भागातील डांबरीकरण आणि काँक्रीटकरण ही कामे पूर्ण झाली आहेत.त्या रस्त्यात नेरळ ग्रामपंचायत हद्दीत दोन अरुंद पूल होते.त्या दोन्ही पुलांच्या बाजूला नवीन पूल बांधण्याची कामे मंजूर होती.सदर रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने नेरळ येथील पोलीस ठाणे समोरील आणि वाल्मिकीनगर येथील पुलाचे बांधकाम सुरू केले होते.जानेवारी महिन्यात पोलीस स्टेशन समोरील पुलाचे सर्व पिलर तयार होऊन उभे राहिले होते.तर वाल्मिकीनगर येथील पुलाचे काम करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात खोदकाम केले गेले.त्यात मार्च महिन्यात सुरू झालेल्या लॉक डाऊनमुळे दोन्ही पुलांची कामे ठप्प झाली.साधारण दीड महिना त्या पुलांकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचा अधिकारी फिरकला देखील नाही.


 


                        मात्र तिसऱ्या लॉक डाऊन मध्ये शासनाने सार्वजनिक हिताची कामे करण्यास परवानगी दिल्यानंतर नेरळ-कर्जत रस्त्यावरील दोन्ही पुलांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केली.कर्जत-कल्याण रस्त्यावरील या दोन्ही पुलांचे महत्व लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदार कंपनीला आदेश देत कामे युद्धपातळी वर पूर्ण करण्याची सूचना केली.त्यामुळे त्या रस्त्याचे आणि पुलाचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने लॉक डाऊन मध्ये पुलांची कामे उपलब्ध असलेले तुटपुंजे मजूर यांच्या साहाय्याने पूर्ण करण्यावर भर दिला आहे.आता त्या दोन्ही पुलांच्या कामाचे पिलर चे बांधकाम पूर्ण झाले आहेत.पावसाळा सुरू होण्यास आणखी 20 दिवसांचा कालावधी आहे, त्यामुळे या काळात दोन्ही पुलांवर स्लॅब टाकण्याची कामे करावी लागणार आहेत.स्लॅब टाकण्याचे काम पूर्ण करून कर्जत-कल्याण रस्त्यावरील दोन्ही पूल खुले करण्याचे मोठे आव्हान सार्वजनिक बांधकाम विभागावर आहे.मात्र बाजूला पर्यायी व्यवस्था असल्याने नवीन पुलांची कामे प्राधान्याने केली पाहिजेत अशी भीती सार्वजनिक बांधकाम विभागाला नाही,परंतु दोन्ही पुल पावसाळ्यापूर्वी खुले करून देण्याचे आव्हान मात्र बांधकाम खात्यावर आहे.


 


 


 


 


 


 


अजयकुमार सर्वगोड-उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग


 


कर्जत-कल्याण रस्त्यावरील दोन्ही पुलांची कामे लॉक डाऊन मध्ये होतील की नाही अशी शंका होती,ल.मात्र शासनाने लॉक डाऊन काळात अशी कामे करण्यास सूट दिल्याने दोन्ही पुलांची कामे केली जात आहेत.त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी पुलांची कामे पूर्ण करून वाहतूक सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे.


 


 


 


 


 


 


फोटो ओळ 


 


नेरळ येथील पुलांची सुरू असलेली कामे


 


छायः गणेश पवार