एकही नुकसनाग्रस्त शासकीय मदतीपासून वंचित राहता कामा नये - खासदार श्रीरंग बारणे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


एकही नुकसनाग्रस्त शासकीय मदतीपासून वंचित राहता कामा नये - खासदार श्रीरंग बारणे


 


कर्जत,ता.8 गणेश पवार


 


                        'निसर्ग' चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका मावळ लोकसभा मतदारसंघातील मावळ, कर्जत, खालापूर, उरण आणि पनवेल तालुक्याला बसला आहे. या परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सरकारने त्यासाठी मदत जाहीर केली आहे, या मदतीपासून एकही नुकसानग्रस्त वंचित राहता कामा नये.त्यासाठी सर्व नुकसानग्रस्तांचे काळजीपुर्वक पंचनामे करावेत आणि त्याचा अहवाल तत्काळ सरकारला पाठवावा अशा सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी अधिका-यांना दिल्या आहेत.


 


                        मावळचे लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आज 8 जून रोजी कर्जत आणि खालापूरमधील निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला. कर्जत येथील तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीला कर्जत च्या प्रांतधिकारी वैशाली परदेशी, तहसीलदार विक्रम देशमुख, महावितरणचे सहायक अभियंता राजेंद्र घुले,कर्जतच्या नगराध्यक्षा सुवर्णा जोशी,तसेच सर्व विभागाचे अधिकारी आणि माजी नगरसेवक संतोष पाटील, नगरसेवक विवेक दांडेकर, नगरसेविका प्राची देरवणकर,कर्जत शिवसेना उपतालुका प्रमुख बाबू घारे,विभागप्रमुख दिनेश भोईर उपस्थित होते.  


 


                         कर्जत तहसिल कार्यालयात झालेल्या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे यांना प्रांत अधिकारी वैशाली परदेशी आणि तहसीलदार देशमुख यांनी वादलानंतरच्या परिस्थितीची माहिती दिली.तर कोसळलेल्या विजेच्या खांबांबद्दल माहिती महावितरणचे अधिकारी घुले यांनी करून दिली.त्यावेळी बोलताना खासदार बारणे यांनी निसर्ग चक्रीवादळाचा मोठा फटका रायगड जिल्ह्याला बसला आहे.त्यात कर्जत, खालापूर, उरण पनवेल तालुक्यांना सर्वाधिक फटका बसला आहे.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सविस्तर आढावा घेतला आहे आणि या नुकसानीची 100 टक्के भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. त्यासाठी पंचनामे सुरु झाले आहेत, एकही नुकसानग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थ हे शासकीय मदतीपासून वंचित राहू नये.तसेच ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे,आब्यांचे,झाड आणि घरांचे नुकसान झाले आहे. त्याची 100 टक्के भरपाई दिली पाहिजे आणि बाधित शेतकरी,नागरिकांना मदत मिळण्यासाठी अधिकारी वर्गाने सर्व पंचनामे काळजीपूर्वक पूर्ण करण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या आहेत.सर्वांना मदत मिळाली पाहिजे,त्याचा अहवाल तत्काळ सरकारला पाठवावा अशी सूचना अधिकारी वर्गाला देण्यात आल्या.


 


                         कर्जत, खालापूरमधील दुर्गम भागात आदिवासी पाडे मोठ्या प्रमाणात आहेत. पाड्यांवरील घरांची कौल,पत्रे उडून गेली आहेत.त्यांनी स्व:खर्चाने तात्पुरती दुरुस्ती करुन घेतली आहे.त्यांना सरकारी मदत मिळावी याबाबत राज्याचे पुर्नवसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांच्याशी खासदार बारणे यांनी बोलणे केले.पुढील चार ते पाच दिवसात राज्य सरकारच्या वतीने बाधितांना आर्थिक मदत दिली जाईल. तोपर्यंत नुकसानग्रस्तांचे बँक खाते क्रमांक, आधार कार्ड हे कागदपत्रे जमी केली जातील. त्यानंतर बाधितांच्या खात्यात नुकसान भरपाई दिली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले. वादळाचा महावितरणाला देखील फटका बसला आहे. विद्युत तारांवर झाडे पडली आहेत. अनेक ठिकाणचे पोल पडले आहेत. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. शहरातील विद्युत पुरवठा सुरळीत झाला आहे. पण, खेड्यापड्यातील वीज अद्यापर्यंत दुरुस्ती झाली नाही.  येत्या चार ते पाच दिवसात ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन महावितरण कडून खासदार बारणे  यांच्याकडून देण्यात आली.


 


 


 


 


 


 


फोटो ओळ 


 


खासदार श्रीरंग बारणे आढावा घेताना


 


छायः गणेश पवार