किरीट सोमय्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचार उघड करावा..… राष्ट्रवादीचे संजोग वाघेरे यांचे थेट आव्हान

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



 


राष्ट्रवादीचे संजोग वाघेरे यांचे थेट आव्हान


 


पिंपरी, दि. 23 मे : उठसुठ महाविकास आघाडी आणि मुंबई महापालिकेवर बिनबुडाचे आरोप करण्यापेक्षा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचार उघड करावा, पुरावेदेखील आम्ही देऊ त्यांनी फक्त महापालिकेच्या कारभारात लक्ष घालण्याचे धाडस दाखवावे आणि भाजपाच्या सत्ताधार्‍यांना धडा शिकवावा, असे थेट आव्हान शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दिले आहे.


 


माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ प्रकाशित करत मुंबई महापालिकेच्या वतीने उभारलेल्या निवारा केंद्रातील जेवणावरून टीका केली होती. तसेच करोना अटोक्यात आणण्यात महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला होता. त्याचा चांगलाच समाचार संजोग वाघेरे यांनी घेतला असून त्यांनी एक प्रसिद्धपत्रक काढले आहे.


 


या प्रसिद्धीपत्रकात वाघेरे यांनी म्हटले आहे की, किरीट सोमय्या यांनी भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात असलेल्या पिंपरी-चिंचवड महापालिकेने उभारलेल्या निवारा केंद्रातील परिस्थिती पहावी. या ठिकाणी असलेल्या नागरिकांना साधा चहा, नाष्टादेखील मिळत नसून अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात आहे. यासाठी महापालिका प्रतिदिन प्रतिव्यक्ती 170 रुपयांपासून 480 रुपये ठेकेदारांना देत आहे. जेवण पुरविणारे सर्व ठेकेदार हे भाजपाचे कार्यकर्ते आहेत. ‘आपले ठेवावे झाकूण, दुसर्‍याचे पहावे वाकून’ या प्रवृत्तीने किरीट सोमय्या विरोधकांवर आरोप करत सुटले आहेत. 


 


हिंम्मत असेल तर त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचार उजेडात आणावा. आम्ही पुरावेदेखील त्यांना द्यावयास तयार आहोत. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भ्रष्टाचार त्यांनी उघड करावा. करोनाग्रस्तांच्या टाळूवरील लोणी खाण्याचे पाप भाजपाच्या सत्ताधार्‍यांनी केले आहे. मात्र सोमय्या यांना हा प्रकार कधीच नजरेस येणार नाही. मास्क, औषधे, वैद्यकीय साहित्य यासह तातडीची म्हणून केलेल्या खरेदीमध्ये सत्ताधारी पदाधिकारी आणि त्यांच्या ठेकेदारांनी कोट्यवधींची माया गोळा केली आहे. त्याकडेही त्यांनी लक्ष देऊन भाजपाच्या पदाधिकार्‍यांची पाच वर्षांपूर्वीची संपत्ती आणि आताची संपत्ती जाहीर करावी, असे आव्हानही त्यांनी दिले.


 


महापालिका जेवणासाठी साहित्य आणि पैसे देत असतानाही भाजपाच्या नेतेमंडळी आणि नगरसेवकांनी सर्वसामान्यांना आम्ही जेवण पुरवित असल्याची प्रसिद्धी केली आहे. या नेतेमंडळीची सोशल मीडियाची आणि फेसबुक अकाऊंट चेक केली तरी सर्वकाही समोर येईल. मात्र हे पाहण्यासाठी त्यांच्याकडे कदाचित वेळ नसावा. महापालिकेत गेल्या अडीच वर्षांत भाजपाच्या पदाधिकारी व नेत्यांनी केलेल्या कारभाराची चौकशी एकदा करूनच दाखवा त्यासाठी आपण पुढाकार घ्या, आम्ही साथ आणि पुरावे द्यायला तयार असल्याचेही वाघेरे यांनी या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.