नेरळ पोलिसांनी पकडलेल्या गुरे चोरणाऱ्या टोळीतील तिघांवर 13 गुन्हे दाखल

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


नेरळ पोलिसांनी पकडलेल्या गुरे चोरणाऱ्या टोळीतील तिघांवर 13 गुन्हे दाखल


 


ठाणे,मुंबई,रायगड आणि नाशिक मध्ये गुन्हे दाखल


 


कर्जत ,ता.9 गणेश पवार


 


                         बदलापूर येथून बॅरिकेट तोडून आलेले गुरे चोरणारे यांचे वाहन नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले होते आणि त्या गाडीतून प्रवास करणारे यांना पकडले होते.त्या गाडीतील तीन जण अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर मुंबई,ठाणे,रायगड आणि नाशिक जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात विविध 13 गुन्हे दाखल आहेत.दरम्यान,गुरे चोरणारी ही टोळी अनेक वर्षे सक्रिय असून पोलिसांना चकवा देणारी ही टोळी सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे.


 


                            ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे राहणारे चार तरुण तवेरा गाडीने नेरळकडे येत असताना बदलापूर येथे पोलिसांनी लॉक डाऊन असल्याने लावलेले बॅरिकेट तोडून रायगड जिल्ह्यात प्रवेश केला होता.त्या वाहनाने पुढे नेरळ येथील जिल्हा सीमा हद्दीला लावलेले बॅरिकेट उडविले होते.त्यानंतर सुरू झालेल्या पाठलागात कर्जत पोलिसांच्या तसेच बदलापूर, नेरळ येथील स्थानिक तरुण यांच्या मदतीने गुरे चोरणारी टोळी ताब्यात घेतली होती.कल्याण पत्री पूल येथे राहणारे सर्व चार जण 18 एप्रिल पासून पोलीस कोठडीची हवा खात आहेत. पोलिसांच्या गुप्तचर विभागाने त्या चारही जणांचे पोलीस रेकॉर्ड तपासले असता त्यातील तिघे अट्टल गुन्हेगार असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी अटक केलेल्या चौघांमध्ये फय्याज युसूफ खान याच्यावर अद्याप कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल नाहीत. परंतु तो देखील मागील एक वर्षांपासून गुरे चोरणाऱ्या टोळीमध्ये सक्रिय आहे.तर अन्य तिघांवर मुंबई सह ठाणे,रायगड आणि नाशिक जिल्ह्यात देखील गुन्हे दाखल आहेत.मात्र त्यातील एका आरोपीवर तर खुनाचा प्रयत्न केल्याचे देखील गुन्हे दाखल आहेत.


 


                          अनेक जिल्ह्यातील पोलीस वाट बघत असलेले गुरे चोरणारी टोळी नेरळ पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यात या टोळीचा म्होरक्या असलेल्या अनिलकुमार रामनारायण सरोज-28 याच्यावर कुळगाव बदलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.तर अल्लाउद्दीन शाही शेख-25 याच्यावर तीन गुन्हे दाखल असून 2015 मध्ये मुंबई कुरार तसेच 2017 मध्ये मानपाडा-ठाणे आणि बांद्रा मुंबई येथे असे गुरे चोरल्या प्रकरणी तीन गुन्हे दाखल आहेत.कैस मुर्तुझा डॉन हा आरोपी गाडी वेगाने पळविण्यात माहीर असून त्याच्यावर 8 वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.हा 2014 पासून गुन्हेगारी क्षेत्रात कार्यरत असूनत्यांच्यावर गुरे बेशुद्ध करून चोरणे आणि हाफ मर्डर  चे गुन्हे दाखल आहेत.त्यात मुंबई मधील बाजार पेठ पोलीस ठाणे,कालबादेवी पोलीस ठाणे,तसेच ठाणे जिल्ह्यातील एमएफसी,सेंट्रल उल्हासनगर, मानपाडा,येथील पोलीस ठाण्यात आणि नाशिक जिल्ह्यातील सातपूर तसेच देवलोळी कॅम्प या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.त्यामुळे नेरळ पोलिसांनी पकडलेल्या त्या गुरे चोरणाऱ्या टोळीकडून नजीकच्या काळात आणखी गुन्हे समोर येण्याची शक्यता आहे.गुरे चोरून नेली आहेत,पण गुन्हे दाखल नाहीत अशा असंख्य केसेस पोलिसात शेतकऱ्यांनी दिल्या आहेत.त्यामुळे गुरे चोरणारी ही टोळी किती सक्रिय होती हे सिद्ध होणार आहे.