विशेष पोलीस अधिकाऱ्यांच्या नेमणुकीचा उपक्रम यापुढेही सुरु ठेवावा* गृहमंत्री अनिल देशमुख

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


*


 


* वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत संवाद


 


*कोरोना नियंत्रणासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचे व उपक्रमांचे कौतुक


 


* 'लोकभावनांचे सर्वेक्षण' पुस्तिकेचे प्रकाशन


 


*पोलिसांच्या कामावर आधारीत कॉफी टेबल बुक साठी माहिती व छायाचित्रांचे संकलन करावे


 


पुणे दि. 7 : लॉक डाऊन कालावधीत पुणे शहर पोलीस आयुक्तालयाने पोलिसांच्या मदतीला 5 हजार 500 विशेष पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा उपक्रम उत्कृष्ट असून यापुढेही हा उपक्रम सुरु ठेवावा, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिल्या.


 


कोरोना नियंत्रणासाठी लॉक डाऊन कालावधीत पुणे, पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या व करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या, यावेळी ते बोलत होते.


  


  कोरोना नियंत्रणासाठी लॉक डाऊन ची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच नागरिकांना उपलब्ध करुन दिलेल्या सोयी - सुविधांबद्दल पुणे, पिंपरी चिंचवड शहर व ग्रामीण पोलीस विभागाचे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाचे श्री. देशमुख यांनी कौतुक केले. यावेळी पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या "लोक भावनांचे सर्वेक्षण" या पुस्तिकेचे प्रकाशन श्री. देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. 


 


     यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम्, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, जिल्हा पोलीस अधीक्षक(ग्रामीण) संदीप पाटील, पोलीस सह आयुक्त (शहर) डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम विभाग) डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त (पूर्व) सुनील फुलारी तसेच सर्व पोलीस उपायुक्त व पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 


 


   पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलिसांच्या पाल्यांना शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी तांत्रिक सहाय्य कारणाऱ्या बिझनेस बायजू एज्युकेशन टेक्नॉलॉजी कंपनीचे सहायक व्हाइस प्रेसिडेंट अरुणेश कुमार यांना प्रशस्तीपत्र देवून सन्मान करण्यात आला. तसेच लॉकडाऊन कालावधीत अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या इच्छित स्थळी जाण्यासाठी डिजीटल पास आवश्यक होता. हा पास उपलब्ध करुन देण्यासाठी डिजीटल कार्यप्रणाली विकसित करणाऱ्या सायबेज सॉफ्टवेअर चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण नथानी यांना प्रशस्तीपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.


 


पुणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने निर्जंतुकीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या संजीवनी व्हॅन, तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सेल, मेडिकल मधून औषधे खरेदी करणाऱ्या ग्राहकांची माहिती घेवून याद्वारे कोविड संक्रमित रुग्ण शोधणे व कोरोना प्रतिबंधासाठी केलेल्या विविध उपाययोजनांचे श्री. देशमुख यांनी कौतुक केले. ते म्हणाले, पोलिसांनी माणुसकी जपून काम करणे गरजेचे आहे. राज्यात बऱ्याच पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलता दाखवून पोलीस विभागाची प्रतिमा उंचावली आहे, याचा अभिमान वाटतो, असे सांगून राज्यभरात चांगले काम करणाऱ्या पोलिसांची उदाहरणे दिली. तसेच ताडीवाला रोड व अन्य प्रतिबंधित क्षेत्राला भेट देवून नागरिकांशी संवाद साधला असता पोलिसांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केल्याचे त्यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यात चांगले काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कामाची छायाचित्रांसह माहिती संकलित करावी, जेणेकरुन महाराष्ट्र पोलीस विभागाच्या वतीने कॉफी टेबल बुक तयार करता येईल, असे ते म्हणाले. लॉक डाऊन कालावधीत चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, असे सांगून यापुढेही अफवा पसरवून समाजात भय, सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करावी, असे निर्देश त्यांनी दिले.


 


यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी लॉकडाऊन कालावधीत शहर व ग्रामीण भागात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या उपाययोजना, विद्यार्थी, कामगार व मजूरांच्या स्थलांतरणासाठी केलेल्या कामाची व जनजागृती साठी केलेल्या उपाययोजनांची माहिती सादरीकरणातून दिली. 


 


यावेळी उपस्थित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लॉकडाऊन च्या अंमलबजावणीसाठी तसेच नागरिकांना उपलब्ध करुन दिलेल्या आवश्यक त्या सोयी सुविधा, स्थलांतरीत गरजूंना भोजनाचे व अन्नधान्याचे किट देणे, प्रवासाच्या परवानगीचे पासेस देणे, वाहनांची सुविधा देणे आदी विविध कामांची माहिती गृहमंत्री श्री.देशमुख यांना वरिष्ठ पोलीस अधिकारी व उपायुक्त यांनी दिली.


           *****


Popular posts
कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर 5 टक्के कॅशबॅक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाहनधारकांसाठी 11 जानेवारी, 2021 पासून सवलत योजना
झीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*
BLaCK PAPPER PANT*💕💕💕
Image
मानव आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उत्तर प्रदेश हाथरस येथील "मनिषा वाल्मिकी" दलित पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंड गार्डन चाैकात कँन्डल लावून श्रद्धांजली वाहण्यात आली...
Image
राजमुद्रा प्रतिष्ठान !!🚩🚩     !! निलेश म निम्हण मित्र परिवार !!........... दिवस_ 33...             दिनांक 1/5/2020
Image