पनवेल तालुक्यातील स्कुलबस मिरची न्यायला आली कर्जतकर आक्रमक

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पनवेल तालुक्यातील स्कुलबस मिरची न्यायला आली कर्जतकर आक्रमक

कर्जत, ता.10  गणेश पवार
                    पनवेल, नवी मुंबई रेड झोन आहे,पण दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. या भागातील ग्राहक मिरची खरेदीसाठी कर्जत शहरात सर्रास येत असल्याने कर्जत शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. आज नवी मुंबई - पनवेल मधून एक स्कूल बस मिरची खरेदीसाठी आली आणि कर्जतकर आक्रमक झाले. त्यांनी त्या स्कूलबस वर पाळत ठेऊन पोलिसांशी संपर्क साधला आणि ती स्कूलबस पोलीस ठाण्यात नेण्यात आली.  आणि दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून ठेऊन संध्याकाळी समज देऊन सोडून देण्यात आले. बाहेरील कर्जतमध्ये बंदी करावी अशी मागणी कर्जतकरांकडून होत आहे.

                             कर्जतमध्ये चांगली मिरची मिळते म्हणून रायगड, ठाणे जिल्ह्यातील ग्राहक नेहमीच मिरची खरेदीसाठी कर्जतला येत  असतात. मात्र यंदा कोरोना विषाणूंचे संकट जगभर पसरले आहे. दिवसेंदिवस ते वाढत आहे. पनवेल आणि नवी मुंबई रेड झोन मध्ये आहे. तरीही पहाटे सहा वाजल्यापासूनच पनवेल परिसरातील ग्राहक मिरची खरेदीसाठी सर्रास वाहने घेऊन येत आहेत. याबद्दल पोलिसांना दोष दिला जातो परंतु पोलिसांचा डोळा चुकवून किंवा अत्यावश्यक सेवा असा फलक असलेले वाहन घेऊन हे ग्राहक येतात. त्यामुळे पोलिसांचा नाईलाज होतो. काही ग्राहक भिसेगाव मार्गे जुन्या एस टी स्टँड पर्यंत वाहने आणून तेथे ठेवतात  आणि रेल्वे ब्रिज वरून कर्जत बाजारपेठेत चालत येऊन मिरची खरेदी करून जातात. आधारकार्ड घेऊन मिरची दिल्यास बाहेरून येणाऱ्या ग्राहकांवर वचक बसेल असे काहींचे म्हणणे आहे.
                        एम एच 46 एक्स 2538 नंबरची ए व्ही बी पी स्कूल नवीन पनवेल असे लिहिलेली स्कूलबस महावीर पेठेत आली. हे कर्जतकरांच्या निदर्शनास आले आणि ते आक्रमक झाले. पोलिसांशी संपर्क साधल्यावर त्यांना ही स्कूल बस आय डी बी आय बँके समोर आढळली. बस कुणी आणली त्याची शोधाशोध सुरू झाली. अर्ध्या तासानंतर स्कूलबसचा चालक आणि मिरची खरेदीदार तेथे आले. तेथे उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, सुनील गोगटे, राहुल कुलकर्णी, समीर सोहनी आदी होते. पोलिसांनी ही स्कूलबस पोलीस ठाण्यात नेली. पोलीस निरीक्षक अरुण भोर यांनी मिरची खरेदीदार आणि स्कूलबस चालकाला दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून  चांगलीच समज दिली आणि त्यांना संध्याकाळी सोडून देण्यात आले. 

 

 

 
'पनवेलहून येणारी वाहने भिसेगाव मार्गे जुन्या एस टी स्टँड कडे येतात त्यामुळे भिसेगावचा मार्ग बंद केला असून सर्व वाहने चारफटा मार्गे जातील अशी व्यवस्था केली आहे.'
----- अरुण भोर,पोलीस निरीक्षक, कर्जत