जिल्हाधिकारी नवल किशोर राम व पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी शिवाजीनगर परिसरातील कोरोनाबाबतच्या उपाययोजनांची केली पाहणी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


जिल्हाधिकारी नवल किशोर राम व पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी शिवाजीनगर परिसरातील कोरोनाबाबतच्या उपाययोजनांची केली पाहणी
            पुणे, दिनांक १४-  शिवाजीनगर-घोले पाटील क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत असलेल्या पाटील इस्टेट, संगमवाडी व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे चौक तसेच जुना तोफखाना परिसरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी नवल किशोर राम व पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी संयुक्तरित्या या परिसरातील उपाययोजनांबाबतची पाहणी केली. प्रशासनाकडून सुरू असलेल्या उपाययोजना अत्यंत प्रभावीपणे राबवा व कोरोना रुग्ण वाढणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या.
शिवाजीनगरलगतच्या प्रतिबंधित क्षेत्राच्या पाहणी दरम्यान  महानगरपालिकेच्या वॉर्ड अधिकारी श्रीमती शिंदे, आरोग्य अधिकारी, परिचारिका तसेच कर्मचारी उपस्थित होते.
            कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या तपासणीवर भर देणे गरजेचे असल्याचे सांगून जिल्हाधिकारी राम म्हणाले, प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांना मुलभूत सोयी- सुविधा पुरविण्यासाठी नियोजन करावे, सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेवर भर देण्यासोबतच नागरिकांनी मास्क व सॅनिटायझर वापरणे आवश्यक आहे. प्रतिबंधित परिसरातील नागरिकांची गतीने आरोग्य तपासणी करा तसेच निश्चित केलेल्या कालावधीत अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कुणाला येथून बाहेर जाता येणार नाही अथवा बाहेरून या ठिकाणी येता येणार नाही याबाबत दक्षता घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकचे वॉर्ड अधिकारी श्रीमती शिंदे यांनी महापालिकेच्या वतीने प्रतिबंधित क्षेत्रात करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. यावेळी पुणे महानगरपालिका तसेच प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.