कर्जत तालुक्यातील खांडस येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून....

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कर्जत तालुक्यातील खांडस येथे किरकोळ वादातून तरुणाचा खून....



सर्व 11 आरोपींना अटक

कर्जत,ता.6 गणेश पवार

                                     कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या खांडस येथे चिकनचे दुकान लावण्याचे जुन्या वादाला नळपाणी योजनेची पाईप लाईन टाकण्याचे कामात अडथळा अशा किरकोळ वादातून एका 49 वर्षीय तरुणाचा खून करण्यात आला.या प्रकरणी पोलिसांनी सर्व 11 आरोपीना अटक केली असून या घटनेने लॉक डाऊन काळात कर्जत तालुक्यात खळबळ माजली आहे.

                                 नेरळ पोलीस ठाण्याचे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,तालुक्यातील खांडस येथे लॉक डाऊन असल्याने काही रोजगार मिळावा म्हणून आपल्या वडिलोपार्जित जागेत शिवाजी गोविंद पाटील यांनी चिकनचे दुकान सुरू केले होते.मात्र ते दुकान सुरू करण्यास काही लोकांनी विरोध केला होता.त्यानंतर त्यांच्यामधील वडिलोपार्जित जमिनीच्या वादाला 4 मे 2020 रोजी नळपाणी योजनेचे पाईप लाईन टाकण्यावरून शिवाजी पाटील यांनी हरकत घेतली. त्या ठिकाणी आपल्याला घर बांधायचे असून पाईप लाईन टाकू नका अशी सूचना केल्यानंतर पाईप लाईनचे काम करणारे ऐनकर कुटुंब यांना राग आला.त्या सर्वांनी पावणेसात च्या दरम्यान गैरकायद्याची मंडळी जमवून पाईप लाईन टाकायला हरकत घेणारे शिवाजी गोविंद पाटील यांना तेथे उपस्थित असलेले मनोहर भाऊ ऐनकर,जनार्दन भाऊ ऐनकर,विठ्ठल भाऊ ऐनकर,प्रकाश विठ्ठल ऐनकर, बाळाराम लानु ऐनकर आणि पुंडलिक भाऊ ऐनकर यांनी शिवाजी गोविंद ऐनकर यांना लाठी काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

                             ही मारहाण सुरू असताना विलास मनोहर ऐनकर याने लोखंडी टिकावाचे साहाय्याने तर मच्छीन्द्र जनार्दन ऐनकर यांनी लोखंडी फावडा याच्या साहाय्याने शिवाजी गोविब्द पाटील यांच्यावर घाव घालण्यास सुरुवात केली.तर कैलाश पुंडलिक ऐनकर आणि जगदीश पुंडलिक ऐनकर या दोघांनी धारदार चाकूच्या साहाय्याने शिवाजी पाटील यांच्या शरीराच्या डाव्या बाजूस,छातीवर आणि पोटावर वार केले आणि शेवटी गणेश पुंडलिक ऐनकर याने शिवाजी पाटील यांच्या डोक्यात तलवारीने घाव घातला आणि शिवाजी पाटील हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून सर्व आरोपी तेथून पळून गेले. त्यावेळी मारहाणीत जखमी झालेले गोविंद शंकर पाटील यांनी आपल्या मुलास उचलून खांडस येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले.परंतु प्रचंड रक्तस्त्राव यामुळे खांडस प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांनी जखमी ला पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात हलविण्यास सांगितले.

                            मात्र पनवेल कडे जाताना रस्त्यात शिवाजी गोविंद पाटील यांचा मृत्यू झाला होता.घटनेची माहिती मिळताच नेरळ पोलीस खांडस गावात पोहचले.तर जखमीला उपचारासाठी नेण्यात आले होते.मात्र जखमी शिवाजी पाटील-49 यांचा या हाणामारीत मृत्यू झाला असल्याची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अनिल घेरडीकर आणि नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अविनाश पाटील यांनी आपल्या सर्व कर्मचारी वर्गासह शिवाजी गोविंद पाटील यांचा खून करून जंगलात पसार झालेले आरोपी यांचा शोध घेण्यास सुरुवात केली.रात्री तीन आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर 5 मे रोजी दिवसभरात सर्व 11 आरोपींना पकडण्यात नेरळ पोलिसांना यश आले आहे.शिवाजी गोविंद पाटील यांच्या खून प्रकरणी मच्छीन्द्र जनार्दन ऐनकर,कैलाश मनोहर ऐनकर,विलास मनोहर ऐनकर,जनार्दन मनोहर ऐनकर,मनोहर भाऊ ऐनकर,विठ्ठल भाऊ ऐनकर, प्रकाश विठ्ठल ऐनकर, बाळाराम लानु ऐनकर,जगदीश पुंडलिक ऐनकर,पुंडलिक भाऊ ऐनकर आणि गणेश पुंडलिक ऐनकर असे सर्व 11 आरोपी यांना अटक करून त्यांच्यावर शिवाजी गोविंद पाटील यांचा खून केल्याचा गुन्हा नोंद केला आहे.

                         नेरळ पोलीस ठाण्यात या सर्वांवर भादवी कलम 302,324,143,144, 147,148,149,504 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 चे (1) (3) प्रमाणे गुन्हा ठेवण्यात आला आहे.या खून प्रकरणामुळे लॉक डाऊन काळात घडलेल्या प्रकाराबद्दल खळबळ माजली आहे.आज 6 मे रोजी सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे.सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.