लॉकडाऊनमध्येही पर्यावरणाप्रति जागरूक आहेत विद्यार्थी: ब्रेनली

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


लॉकडाऊनमध्येही पर्यावरणाप्रति जागरूक आहेत विद्यार्थी: ब्रेनली



मुंबई, ७ मे २०२०: लॉकडाऊनमध्ये मिळालेला अतिरिक्त वेळ विद्यार्थी आपल्या कुटुंबियांसमवेत व्यतीत करीत आहेत तसेच त्यांचे अवांतर वाचनही सुरु आहे. याच जोडीला ते पर्यावरणाची ही विशेष काळजी घेत असल्याचे ब्रेनलीने जागतिक पृथ्वी दिनानिमित्त केलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. वातावरण बदलावर विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन जाणून घेण्याचा या सर्वेक्षणाचा उद्देश होता.


 


आवश्यकता नसताना विजेची उपकरणे बंद करणे, पाण्याची बचत, स्वतःच्या घरातील, बागेतील झाडांची काळजी, टाकाऊ पासून टिकाऊ वस्तूंची निर्मिती आदी माध्यमातून विद्यार्थी घरबसल्या पर्यावरणाची काळजी घेत असून पर्यावरण संरक्षणाप्रति ते जागरूक असल्याचे हे निदर्शक आहे.


  


पर्यावरणासंबंधी सर्वाधिक माहिती विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतून उपलब्ध होत असल्याचे ६० टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले. तर ४६ टक्के विद्यार्थ्यांनी त्यांना ऑनलाईन माध्यमातून माहिती उपलब्ध झाल्याचे नमूद केले. तसेच टीव्ही, प्रिंट मीडिया, पालकांकडून यासंदर्भात माहिती मिळत असल्याचे अनुक्रमे ३८.४ टक्के, १६.९ टक्के, ३५.८ टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले.


 


देशभरातील सुमारे ३००० विद्यार्थ्यांनी या सर्वेक्षणात सहभाग नोंदवला होता. ८३.९ टक्के विद्यार्थ्यांनी हवामान बदल हा वास्तविक असल्याचे म्हटले आहे. प्रदूषणामुळे पर्यावरणाला सर्वाधिक धोका असल्याचे ५१ टक्के विद्यार्थ्यांनी नमूद केले तर जागतिक तापमानवाढ, उध्वस्त सागरी जीवन हे देखील पर्यावरणाला हानी पोहोचविण्यात प्रमुख भूमिका बजावत असल्याचे सुमारे ३० टक्के विद्यार्थ्यांनी सांगितले.सर्वेक्षणात सामील ७१.२ टक्के विद्यार्थ्यांनी हवामान बदलात रस असल्याचे म्हटले आहे तर त्यापैकी ४६ टक्के विद्यार्थ्यांनी हवामान आणि वातावरण बदलावर स्वत: संशोधन करणार असल्याचे देखील म्हटले आहे.


 


ऑनलाइन शैक्षणिक पद्धतीत स्वतःचे विशिष्ट स्थान निर्माण केलेले ब्रेनली हे विविध प्रासंगिक सर्वेक्षण करून भारतीय विद्यार्थ्यांचा आवाजही बनत आहे. याद्वारे गंभीर विषयांवर विद्यार्थ्यांची मते प्रदर्शित होतात. भारतात लाँच झाल्यापासून ब्रेनलीने २२ दशलक्षांपेक्षा जास्त यूझरबेसची नोंदणी केली आहे.