पुणे प्रवाह न्युज पोर्टल
कर्जत तालुक्याच्या अर्ध्या भागाला अवेळी पावसाचा फटका..
मोठ्या प्रमाणात घरांचे आणि विजेच्या खांबांचे नुकसान
कर्जत,ता.29 गणेश पवार
कर्जत तालुक्यात आज सायंकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या अवेळी पावसाने मोठे नुकसान केले. कशेळे,पाथरज,सावेळे,जांबरुंगनांदगाव या ग्रामपंचायत मधील घरांची कौले,पत्रे उडून गेली असून तेथील वीज पुरवठा करणारी वीज वाहक तारा तसेच काही खांब उन्मळून पडले आहेत.
कर्जत तालुक्यात आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. त्यानंतर आलेल्या वादळी पावसाने नांदगाव,सावेळे, जांबरुंग, पाथरज,आणि कशेळे ग्रामपंचायत मधील अनेक गावांमध्ये नुकसान केले आहे.कशेळे ग्रामपंचायत मधील कोथिंबे गावात घरांची पत्रे उडून गेली असून तेथे घरामध्ये या लॉक डाऊनच्या काळात साठवून ठेवलेले धान्य अवेळी आलेल्या पावसाच्या पाण्याने भिजल्याने वाया गेले आहे.तर नावढेवाडी येथील विजेच्या तारा या घरावर कोसळल्याने मोठ्या प्रमाणात आगीचे लोळ पसरले.मात्र घरात कोणी नसल्याने जीवितहानी झाली नाही.तर सावळे,पाथरज उभा दोन ग्रामपंचायत मधील बहुतेक सर्व गावांना वादळी वाऱ्याने आपला दणका दिला असून मोरेवाडी मध्ये नव्याने बांधलेले घरकुल वादळी वाऱ्यामुळे कोसळले आहे.मात्र आज सकाळ पासून पाऊस येण्याची स्थिती नसल्याने सर्व लोक लॉक डाऊन असल्याने घरातच निर्धास्त होते.अचानक आलेल्या पावसाने वीट उत्पादक संकटात आले असून त्यांचे देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
घरांची कौले आणि सिमेंट पत्रे उडून जाण्याचे प्रकार घडले असल्याने लॉक डाऊन च्या काळात त्या रहिवाशांना घरांची दुरुस्ती करणे देखील कठीण होऊन गेले आहे.तर विजेचे खांब काही ठिकाणी कोसळले असल्याने सध्याच्या उन्हाळ्याच्या काळात आज त्या भागात विजेविना राहावे लागणार आहे.