करोनाशी दोन हात : ग्रीनझोनमध्ये असलेल्या चंद्रपूरकरांनी तयार केला कलरकोड

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


करोनाशी दोन हात : ग्रीनझोनमध्ये असलेल्या चंद्रपूरकरांनी तयार केला कलरकोड
___________________________________


कोरोनाकाळात जीवनावश्यक गरजांसाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडत असल्यामुळे पोलीस तसंच प्रशासन यंत्रणेवरचा ताण वाढत आहे आणि सोशल डिस्टंन्सिंग कसं अमलात आणायचं हा मुद्दा सगळीकडेच चर्चिला जात आहे. पण नागपूर आणि यवतमाळ या करोनाग्रस्त जिल्ह्यांच्या सीमेलगत असणाऱ्या चंद्रपूरने मात्र हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने सोडवला आहे.
चंद्रपूरमध्ये अजूनपर्यंत तरी करोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. पण तरीही चंद्रपूरकर सामाजिक शिस्त नेटाने पाळत आहेत. प्रशासनाने त्यांना वेगवेगळ्या रंगांचे पास दिले आहेत आणि जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी कोणत्या तारखांना कोणत्या रंगाचा पास असलेली व्यक्ती घराबाहेर पडेल हे ठरवून दिलं आहे. उदाहरणार्थ २२ हजार कुटुंबांची वस्ती असलेल्या बल्लारपूरमध्ये गुलाबी, निळा, पांढरा, पिवळा आणि हिरव्या रंगाचे पास दिले आहेत. त्या त्या रंगाचा पास घेऊन त्या कुटुंबातली एक व्यक्ती जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडू शकते. पासवर तिचं नाव आणि छायाचित्रं असतं. आणखी एक पर्यायी नाव आणि छायाचित्रंही असतं. पांढऱ्या रंगाचा पास ज्यांच्याकडे आहे अशा कुटुंबातली एक व्यक्ती ५, १०, १५, २०, २५ आणि ३० या तारखांना घराबाहेर पडू शकते. निळ्या रंगाचा पास ज्यांच्याकडे आहे अशा कुटुंबातली व्यक्ती २, ७, १२, १७, २२ आणि २७ तारखेला घराबाहेर पडू शकते. पिवळ्या रंगाचा पास बाळगणाऱ्या कुटुंबातली व्यक्ती १, ६, ११, १६, २१ आणि २६ तारखेला घराबाहेर पडू शकते. तर गुलाबी पासधारकांसाठी ३,८,१३, १८, २३ आणि २८ या तारखा ठरवून दिल्या आहेत. हिरव्या रंगाचा पास बाळगणाऱ्या कुटुंबातली व्यक्ती ४, ९, १४, १९, २४ आणि २९ तारखेला जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडू शकते. हे पास त्या त्या कुटुंबातल्या व्यक्तींनीच वापरायचे आहेत. हा पास घेऊन त्या व्यक्तीला संबंधित महापालिका प्रभागातच फिरता येणार असून संबंधित प्रभागाची नोंदही पासवर करण्यात आली आहे. घराबाहेर पडण्यासाठी साडेअकरा ते साडेचार अशी वेळही निश्चित करून देण्यात आली आहे. तर चंद्रपूर शहरात रंगीत पास नसले तरी लोकसंख्येचं सहा गटांमध्ये वर्गीकरण करून पांढऱ्या रंगाचे पास दिले गेले आहेत.तिथे आशा सेविकांनी लोकांकडून फाॅर्म भरून घेतले. त्यात नावं, छायाचित्रं, रेशन कार्डाचा क्रमांक, त्या कुटुंबाला अन्नधान्याची गरज लागणार आहे का हे तपशील देखील नोंदवून घेण्यात आले होते.
दररोज सगळ्याच लोकांनी बाहेर पडून गर्दी करण्यापेक्षा ही सोय बरी असली तरी ती सगळ्याच ठिकाणी वापरता येईल असं नाही पण जिथे शक्य आहे तिथे तरी तिच्यामुळे गर्दीचा ताण कमी करता येईल, असं संबंधित अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.