जीवनावश्यक वस्तुंची वाहतुक सुरळीत सुरु रहावी*                 *विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर*

*जीवनावश्यक वस्तुंची वाहतुक सुरळीत सुरु रहावी*
                *विभागीय आयुक्त  डॉ. दीपक म्हैसेकर*
                                                      
        पुणे, दि.11 : कोरोनाच्या पार्श्वभुमीवर लॉकडाऊनच्या कालावधीत अन्नधान्य, भाजीपाला पुरवठा सुरळीत सुरु राहण्यासाठी येत असलेल्या अडीअडचणींच्या अनुषंगाने कृषि उत्पन्न बाजार समिती, पुना मर्चंट चेंबर,आडते, हमाल, तोलणार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर  विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी चर्चा केली.


            यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, पणन संचालक सुनिल पवार, पुरवठा विभागाचे उपायुक्त  जयंत पिंपळगांवकर, जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड, अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक बाळासाहेब देशमुख, पुना मर्चंट चेंबरचे सचिव विजय मुथा, अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, तोलणार संघटनेचे  अध्यक्ष राजेंद्र चोरघे, कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष नांगरे तसेच हमाल संघटना आदी उपस्थित होते.


            विभागीय आयुक्त डॉ.म्हैसेकर म्हणाले, अन्नधान्य, भाजीपाला, किराणामाल याबरोबरच इतरही जीवनावश्यक वस्तु सुरळीत सुरु राहाण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या वस्तूंची वाहतुक  रस्त्यात पोलिसांनी अडवू नये, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पासेस देण्यात येतील. तसेच आतापर्यंत  पोलीस प्रशासनमार्फतही  अत्यावश्यक सेवेतील काही ट्रक, टेम्पोचालक यांना पासेस वितरण करण्यात आले आहेत. त्यांना मालवाहतूकीस ये-जा  करण्यास कुठल्याही प्रकारची अडचण भासणार नाही, याची जिल्हा प्रशासन पुरेपुर खबरदारी घेईल. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांनाही पास देण्यात येतील. परंतु त्या पासचा कुठल्याही प्रकारे गैरवापर होणार नाही, याची संबंधितांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. कामगारांचा विमा उतरवण्यासाठी प्रशासनाच्या वतीने  प्रयत्न केले जातील. दररोज ग्रामीण भागातून ये-जा करणाऱ्या कामगारांसाठी बसेसची व्यवस्था करण्यात येईल. त्याचबरोबर ये-जा करणे शक्य नसणाऱ्या कामगारांसाठी राहाण्याची, जेवणाची व्यवस्था प्रशासनाकडून केली जाईल, असेही ते म्हणाले.


            यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती आणि विविध संघटनांना येणाऱ्या अडीअडचणी जाणून घेऊन त्या बाबत योग्य ते मार्गदर्शनही डॉ.म्हैसेकर यांनी  केले.   


0000