पुणे प्रवाह न्युज पोर्टल
प्रेस नोट
*जागतिक वारसा दिन ऑन लाईन साजरा करण्याचे आवाहन* ------------------------------
पुणे:
कोरोना लॉक डाऊन काळात अडचणी असल्याने १८ एप्रिल हा जागतिक वारसा दिन ऑन लाईन साजरा करण्याचे आवाहन 'ढेपे वाडा सांस्कृतिक मंच' तर्फे करण्यात आले आहे.'ढेपे वाडा सांस्कृतिक मंच'चे संचालक नितीन ढेपे,ऋचा ढेपे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
भाषा, प्रांत आणि रहाणीमानातील वैविध्याने नटलेल्या समृद्ध भारतीय संस्कृती ची माहिती या निमित्ताने सर्वाना होण्यासाठी डिजिटल माध्यमातून प्रसार करावा.'शेअर्ड कल्चर्स,शेअर्ड हेरीटेज,शेअर्ड रीस्पोन्सिबीलिटी' असे या वेळच्या जागतिक वारसा दिनाचे घोष वाक्य आहे. या संकल्पनेनुसार फेसबुक,व्हाटस अप,इंस्ताग्राम आणि ट्विटर सारख्या सोशल माध्यमातून वारसा विषयक विचार ,छायाचित्रे ,लेख प्रसारित करावेत.जागतिक वारसा स्थळांना दिलेल्या भेटींचे फोटो शेअर करावे,असे नितीन ढेपे यांनी पत्रकात म्हटले आहे.
नितीन ढेपे म्हणाले,'वारसा वास्तुरचनांचाच नसतो तर तो भाषा, साहित्य, राहणीमान, कला इत्यादी अनेक गोष्टींचा असतो.सुदैवाने आपल्या पूर्वजांनी हजारो वर्षांपासून हा वारसा बऱ्याच अंशी जपला असल्याने आज आपण हा समृद्ध वारसा अनुभवू शकतो आहोत.जगभरातले देश आज आपल्या भारतीय संस्कृतीकडे कुतूहलाने बघत आहेत.आपल्या हजारो वर्षे जुन्या योगविद्येचा आणि आयुर्वेदाचा प्रसार जगभरात झाला आहे'.
नुकतंच कोरोनाच्या निमित्ताने भारतीय संस्कृतीतील नमस्काराचे, बाहेरून आल्यावर चपला बाहेर काढून घरात येण्याचे, तांब्याच्या भांड्याच्या वापराचे महत्त्व अधोरेखित झाले.आपण नुसता वारसा जपला जावा असं म्हणून किंवा वारसा जपला जावा असं नुसतं आपल्याला वाटून काही उपयोग नाही तर आपण वारसा जपण्यासाठी काय योगदान देतो आहे हे महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
नेटवरील माहितीच्या खजिन्याचा घ्या लाभ :
ऋचा ढेपे म्हणाल्या,'आपला वारसा जपण्यासाठी आधी आपल्याला त्याविषयी माहिती करून घेणं आवश्यक आहे .सुदैवाने आज इंटरनेट वर माहितीचा प्रचंड खजिना उपलब्ध आहे त्यामुळे भारतीय संस्कृतीतील वैविध्यपूर्ण राहणीमान, वास्तुरचना, खाद्य, कला इत्यादी विविध प्रकारच्या वारशांची माहिती उपलब्ध होऊ शकते, काही ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन देखील माहिती मिळू शकते. मात्र ही माहिती घेताना नुसती वरवरची माहिती घेऊन उपयोग नाही तर संपूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे जसे गड किल्ले किंवा जुन्या वास्तूंच्या ऐतिहासिक वारश्याची माहिती घेताना त्या मध्ये वास्तव्य केलेल्या पिढ्यांच्या जीवनशैलीचा देखील अभ्यास करणे गरजेचं आहे. गड,किल्ले राखणाऱ्या मराठ्यांचा पराक्रमी इतिहास आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे किंवा तो जाणून घेताना आपल्याला आजही स्फुरण चढतं परंतु रानावनातुन हजारो मैलांची घोडेस्वारी करताना,काही किलो वजन असलेल्या तलवारी, भाले इत्यादी आयुधं घेऊन लढाई लढताना आवश्यक असलेल्या त्यांच्या शारीरिक क्षमतेचा, मानसिक क्षमतेचा कस लागत असेल. ही क्षमता त्यांनी कशी मिळवली असेल ह्याचा अभ्यास करून तो वारसा देखील आपल्या समोर आणणं गरजेचं आहे,असेही त्यांनी सांगितले .
अगदी आत्ता 75,80 वर्षे वयात असलेली पीढीत देखील कुठल्याही प्रकारच्या शारीरिक व्याधी नसलेली लोकं आहेत त्यांनी कशा प्रकारे जीवनशैली अंगीकारली होती ह्याचा देखील अभ्यास करणं गरजेचं आहे. भारतातील काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि गुजरात पासून पश्चिम बंगाल पर्यंत असलेला नैसर्गिक विविधतेचा अविष्कार जगभरात खचितच कुठेतरी पाहायला मिळतो त्याविषयी माहिती आणि प्रत्यक्ष अनुभव घेणं आवश्यक आहे,असे या पत्रकात म्हटले आहे.
वैविध्याचा घ्या आस्वाद संपूर्ण भारतभूमीत भाषा, पेहराव,खाद्यपदार्थ, जीवनशैली ह्यात प्रचंड वैविध्य आहे त्याची माहिती आणि आस्वाद घेणं गरजेचं आहे.एके काळी सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत संपन्न असलेल्या भारतात विविध प्रकारच्या कला बहरल्या त्यात शास्त्रीय, उपशास्त्रीय संगीत, लोककला ,नाटय कला इत्यादी कला अत्यंत समृद्ध होत्या त्या कलांच्या वारशाची माहिती आणि अनुभूती घेणं आवश्यक आहे.भारतीय संस्कृतीतील वेद, उपनिषदांसह अनेक ग्रंथ तसंच विविध प्रकारच्या साहित्याचा समृद्ध वारसा आपल्याकडे उपलब्ध आहे त्याविषयीची माहिती घेणं गरजेचं आहे.
भारतीय संस्कृतीतील ह्या आणि अशा अनेक गोष्टींचा समृद्ध वारसा अनुभवणं, आत्मसात करणं आणि तो पुढच्या पिढीपर्यंत ते पोहोचवणं गरजेचे आहे. ह्या पुढील अनेक वर्षे हा समृद्ध वारसा जपण्याची जबाबदारी आपली आहे कारण आपला हा समृद्ध वारसाच आपल्या पुढच्या पिढ्यांच्या जगण्याचा मार्ग सुकर करणार आहे,असे
नितीन ढेपे यांनी सांगितले.
------------------------------