पुणे प्रवाह न्युज पोर्टल
अमेरिकेत एक दिवसात हजारांवर कॊरोनाबळी, रुग्णांची संख्या दोन लाखांवर
__________________________________
कोरोना विषाणूच्या फैलावामुळे अमेरिकेमध्ये भीषण परिस्थिती ओढवली आहे. वेगाने वाढत असलेल्या रुग्णांच्या संख्येमुळे महाशक्ती असलेल्या अमेरिकेतील आरोग्य यंत्रणा कोलमडून पडली आहे. काल एका दिवसात अमेरिकेत कोरोनाची बाधा झालेले सुमारे 26 हजार 473 नवे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे अमेरिकेतील एकूण रुग्णांची संख्या दोन लाखांच्यावर पोहोचली आहे. तर कालच्या एका दिवसात 1 हजार 49 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत आतापर्यंत एकूण 5 हजार 102 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोनाच्या फैलावाचा वेग जगभरात कायम असून, जगभरातील कोरोनाबधितांचा आकडा 9 लाख 35 हजारांच्या वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे मृतांची संख्या 47 हजार 192 झाली आहे. दरम्यान, कोरोनामुळे काल एका दिवसात जगभरात 4 हजार 883 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात अमेरिकेत एका दिवसात 1049 जणांचा मृत्यू झाला आहे. तर युरोपमधील इटली आणि स्पेनमध्येही कोरोनाचे थैमान सुरू आहे. इटलीमध्ये मृतांचा आकडा 13 हजार 153 जणांचा मृत्यू झाला आहे. तर स्पेनमध्ये काल एका दिवसात 923 जणांचा मृत्यू झाला. तसेच 9 हजारांच्या आसपास नवे रुग्ण आढळल्याने स्पेनमधील कोरोनाबधितांचा आकडा 1 लाख 4 हजार 118 पर्यंत पोहोचला आहे.