सारे झरे सुखाचे*, *आहेत आटलेले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*सारे झरे सुखाचे*,
*आहेत आटलेले* . . . 


    सध्याच्या मर्यादित भ्रमंतीत, आजूबाजूच्या एकाकी माणसांशी संवाद साधताना, अनेक झरे, मनमोकळे होण्याचा, खळाळून वाहते होण्याचा प्रत्यय येत आहे. 
     टिळक रस्त्याजवळ, एका दुकानाच्या पायरीवर, रोज या आजींना पहात असतो.  रोजच्या जेवणासाठी , काही अडचण नाही ना ? या माझ्या प्रश्नावर मिळालेल्या  उत्तरातून, सध्याच्या जनजीवनाची उसवलेली वीण, नेमकी समजून घेता आली. 
दोन मुले परदेशात, आपापल्या प्रपंचात स्थिरस्थावर, एक विवाहित कन्या, असा गोतावळा असलेल्या या आजी, सध्या मध्यवस्तीत, एकाकी जीवन जगताहेत.
    दुसरी कथा अशी  . . . 
परदेशस्थ मित्राचा निरोप, एकाकी आईला, दोन दिवस दूध भाजीपाला औषधे, काहीही मिळाले नाही. नव्वदीच्या पुढे असलेल्या आजींना, बाहेर पडणे मुश्किल, कामवाल्या बाईंची सुट्टी. अशा परिस्थितीत होणारा कोंडमारा विलक्षण आहे. त्या घरी समक्ष जाऊन,अत्यावश्यक गोष्टी,देऊन आलो. दुधाची पिशवी सुद्धा अशा घरी, दिवाळीच्या मिठाई भेटीसारखी वाटतेय. आधाराचा माणूस, देवदूत वाटतोय  ! 
       या निमित्ताने पुण्यातील जनजीवनाचा  एक वेगळाच दृष्टिकोन समजतोय. परदेशस्थ मुले असलेल्या ज्येष्ठांची, पुण्यातील घरांची संख्या, आता पंचवीस हजारापुढे गेली आहे. अशा सर्व घरांमधे सधनता आली पण आधाराला माणूस आणि मायेचा दिलासा मात्र दुरावतोय. सध्याच्या स्थितीत अशी घरें त्याची तीव्रता,प्रकर्षाने अनुभवताहेत  ! 
     सर्व काही पैशाने विकत घेता येते, हा अनेकांचा भ्रम, आता दूर होत आहे,त्याचवेळी अनोळखी मदतीचे हात सुद्धा पुढे येत आहेत. 
आयुष्याच्या उतरार्धाची वाटचाल करणा-या अशा  मंडळींचा कोंडमारा होतोय आणि त्यातूनच कधीकाळी वाचलेल्या  काव्याचा अर्थ, स्पष्टपणे समजतोय  ! 
*सारे झरे सुखाचे*,
*आहेत आटलेले*
*सांगू कसे कुणा मी*,  . . *आयूष्य फाटलेले* . . .


*आनंद सराफ*