नेरळमध्ये शिवसेनेकडून निर्जंतुकीकरण कक्षाची स्थापना, आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते उदघाटन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


नेरळमध्ये शिवसेनेकडून निर्जंतुकीकरण कक्षाची स्थापना,


आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते उदघाटन


 


कर्जत दि. 11 गणेश पवार


 


                कोरोनाने सगळीकडे थैमान घातले आहे. हे संकट घोंगावू लागल्यापासून आतापर्यंत अधिक गडद होऊ लागले आहे. त्यामुळे या विषाणूला रोखण्यासाठी नेरळ शहरात शिवसेनेकडून निर्जंतुकीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. नेरळ शहरप्रमुख रोहिदास मोरे, नेरळचे सरपंच रावजी शिंगवा व सदस्य प्रथमेश मोरे यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या या कक्षांचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले आहे. 


                कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेरळ शहरात प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेऊन औषध फवारणीसह जनजागृती केली जात आहे. अशातच जीवनावश्यक वस्तूंसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेची उपाययोजना गरजेची आहे. त्यामुळे नेरळ शिवसेना शहरप्रमुख रोहिदास मोरे, नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंच रावजी शिंगवा व ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश मोरे यांनी शहरात निर्जंतुकीकरण कक्ष निर्माण करण्याची संकल्पना मांडून अस्तित्वात आणली. यात नेरळ शहरात युनियन बँकेच्या जवळ व छत्रपती शिवाजी महाराज मैदान अशा २ ठिकाणी प्रामुख्याने हे कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज मैदानात भाजी, फळे या विक्रेत्यांना सोशल डिस्टन्स पळून बसण्यास जागा देण्यात आली. तसेच युनियन बॅंकेजवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्ग हा शहरातला मुख्य मार्ग असल्याने अशा २ मुख्य ठिकाणी हे कक्ष निर्माण करण्यात आले आहेत. या कक्षामध्ये प्रवेश करताना व्यक्तीवर सुमारे २४ स्पिंकलरद्वारे द्रव रूपात हायपोक्लोराइड हे द्रावण फवारले जाते. साधारण ५०० लिटरच्या टाकीचा वापर करून या टाकीला १ एचपी क्षमतेची मोटार लावण्यात आली आहे. या मोटारीच्या साहाय्याने टाकीतील पाणी मिश्रित हायपोक्लोराइडचे द्रावण हे कक्षातील स्प्रिंक्लरच्या पाइपलाइनला जोडले आहे. या कक्षात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर हे द्रावण फवारून निर्जंतुकीकरण केले जाते. 


                  या दोन्ही कक्षाचे उदघाटन शुक्रवारी १० एप्रिल रोजी कर्जत खालापूर मतदारसंघाचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते करण्यात आले. हि संकल्पना खूप चांगली असून निर्जंतुकीकरण प्रत्येक व्यक्तीचे निर्जंतुकीकरण करण्यास हे कक्ष मदत करतील. जेणेकरून कोरोनाविरुद्धची लढाई आपण अधिक क्षमतेने लढू शकू असे यावेळी बोलताना आमदार थोरवे हे म्हणाले. तर हे कक्ष शिवसेनेकडून उभारण्यात आले असून याची देखभाल यापुढे नेरळ ग्रामपंचायत घेणार असल्याची माहिती सरपंच रावजी शिंगवा यांनी दिली. 


                यावेळी आमदार महेंद्र थोरवे यांच्यासह कर्जत पंचायत समितीच्या सभापती सुजाता मनवे, गटविकास अधिकारी बी.एस.पुरी, नेरळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील, नेरळ ग्रामपंचात सरपंच रावजी शिंगवा, नेरळ शिवसेना शहरप्रमुख रोहिदास मोरे, नेरळ ग्रामपंचायत सदस्य प्रथमेश मोरे, धर्मानंद गायकवाड, उमा खडे, जयश्री मानकामे, पार्वती पवार, गीतांजली देशमुख, शिवाली रासम-पोतदार, विस्तार अधिकारी सुनील अहिरे, नेरळ शिवसेना उपशहरप्रमुख हेमंत क्षीरसागर आदी उपस्थित होते.