गॅस शवदाहिनी घोटाळ्यात राष्ट्रवादीला बदनाम करणाऱ्यांनी माफी मागावी :  संजोग वाघेरे*.    

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*गॅस शवदाहिनी घोटाळ्यात राष्ट्रवादीला बदनाम करणाऱ्यांनी माफी मागावी :  संजोग वाघेरे*.     पिंपरी १० एप्रिल
राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक विकासकामे करूनही २०१७ च्या महापालिका निवडणुकीत विरोधी पक्षातील नेत्यांनी विठ्ठल रुक्मिणी मूर्ती व सांगवी येथील गॅस शवदाहिनी यामध्ये घोटाळा झाल्याचे खापर राष्ट्रवादी काँग्रेसवरती फोडले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील कोणत्याही पदाधिकाऱ्यांचे वैयक्तिक नावे न घेता केवळ पक्षाला बदनाम करण्याचा घाट विरोधकांनी जाणीवपूर्वक रचला असल्याचे आज आयुक्तांनी दिलेल्या निकालावरून स्पष्ट होते. यात गॅस शवदाहिनी घोटाळामधील पुरावे ग्राह्य धरून वैयक्तिक लाभासाठी निविदा राबविल्याचा ठपका ठेवत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकेतील कार्यकारी अभियंत्यासह तीन अभियंते आणि एका लेखाधिकार्‍याला दोषी ठरवले. यावरून या घोटाळ्यांचा चुनावी जमला करत विरोधकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बदनामीचा घाट रचला असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे विरोधकांनी पिंपरी चिंचवड शहरातील नागरिक व राष्ट्रवादी-काँग्रेसची माफी मागावी. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी निवेदनाद्वारे केली आहे.


काय आहे गॅस शवदाहिनी घोटाळा प्रकरण....


महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना 2016 साली ५ ठिकाणी पर्यावरण पूरक गॅस शवदाहिनी बसविणे आणि सांगवी येथे बसविण्यात आलेल्या गॅस शवदाहिनीच्या कामकाजात झालेली अनियमितता व भ्रष्टाचाराचे प्रकरण नगरसेविका सीमा सावळे यांनी उघडकीस आणून दोषींवर कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर तत्कालीन आयुक्त दिनेश वाघमारे यांनी निविदा प्रक्रियेला स्थगिती दिली होती. २०१७ महापालिका निवडणूक तोंडावर असतानाच हे प्रकरण गाजले होते. या गॅस शवदाहिनीच्या कामकाजात झालेली अनियमितता व भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली.


काय आहे यामधील सत्यता....


गॅस शवदाहिनी घोटाळा प्रकरणात पुरावे ग्राह्य धरून वैयक्तिक लाभासाठी निविदा राबविल्याचा ठपका ठेवत आयुक्तांनी गॅस शवदाहिनीच्या भ्रष्टाचारात महानगरपालिकेच्या कार्यकारी अभियंत्याच्या दोन तर दोन अभियंत्यांची कायमस्वरुपी एक वेतनवाढ स्थगित केली आहे. याशिवाय एका उपलेखापाल महिलेला दोषारोप मुक्त करत सक्त ताकीद दिली आहे.आयुक्त श्रावण  हर्डीकर यांनी पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय नारायण कुलकर्णी यांच्या दोन वेतनवाढी कायमस्वरुपी स्थगित केल्या आहे. या चौकशीमध्ये ठेवण्यात आलेले आरोप काही पुर्णत: व काही अशंत: स्वरुपात सिद्ध झाले आहेत.
तर, उपअभियंता मनोहर टेकचंद जावरानी, कनिष्ठ अभियंता विकास विठ्ठल घारे यांची कायमस्वरुपी एक आणि लेखाधिकारी किशोर बाबूराव शिंगे यांची तात्पुरत्या स्वरुपात एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे. तर, उपलेखापाल उषा सतीश थोरात यांना दोषारोप मुक्त करत सक्त ताकीद दिली आहे. यापुढे गैरवर्तन केल्यास कडक कारवाईचा इशारा दिला आहे. या आदेशाची त्यांच्या सेवा पुस्तकात नोंद केली जाणार आहे.