पुणे शहर तहसील कार्यालयामधील कर्मचाऱ्यांची पूर्व कोवीड  19 तपासणी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुणे शहर तहसील कार्यालयामधील कर्मचाऱ्यांची पूर्व कोवीड  19 तपासणी


            पुणे, दिनांक 28- जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांच्‍या सूचनेनुसार पुणे शहर तहसिल कार्यालयातील सर्वच कर्मचाऱ्यांची कोवीड 19 बाबतची पूर्वतपासणी करण्‍यात आली. मेट्रो मेडिकल फाऊंडेशन  व पुनीत बालन ग्रुप यांच्या सहकार्याने आयोजित  शिबीरात ही तपासणी करण्‍यात आल्याची माहिती तहसिलदार तृप्‍ती कोलते-पाटील यांनी दिली.


            पुणे शहर तहसील कार्यालयांतर्गत अनेक झोपडपट्टया आहेत. त्यात वास्तव्य करणारे,  हातावर पोट असणा-या  अनेक नागरिकांवर ‘लॉकडाऊन’मुळे वाईट वेळ आली आहे. महाराष्ट्रातील इतर जिल्‍ह्यांबरोबरच परराज्यातील मजुरांचे प्रमाण जास्त आहे. गेले महिनाभर तहसिल कार्यालय पुणे शहर येथील क्षेत्रीय अधिकारी म्हणजेच गाव कामगार, तलाठी, कोतवाल, मंडळाधिकारी हे पुणे शहरातील गरजू,  बेरोजगार मजुरांकरिता अन्नधान्याचे किट वाटप करतात. प्रसंगी अतिसंवेदनशील भागांमध्ये जाऊनही तलाठ्यांना नागरिकांसाठी  कीट उपलब्ध करून द्यावी लागतात. कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे कार्यालय प्रमुखाचे आद्य कर्तव्य आहे. त्यामुळेच पालकमंत्री अजित पवार, विभागीय आयुक्‍त डॉ. दिपक म्‍हैसेकर  आणि जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांच्‍या सूचनेनुसार कार्यालयातील कर्मचाऱ्यांना नागरिकांची सेवा अक्षयपणे करता यावी म्हणून  प्री कोविड 19 च्‍या तपासण्या करून घेतल्या. यामुळे  कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत तसेच आत्‍मविश्‍वासात नक्कीच वाढ होणार असल्‍याचेही श्रीमती  पाटील यांनी सांगितले.


            कर्मचाऱ्यांच्या तपासणीबरोबरच त्यांना वैयक्तिक संरक्षणासाठी  पीपीई कीट, सॅनिटायझर, मास्‍क, हातमोजे, द्रवरुप हँडवॉश असे  सुमारे ६५०० रुपये किमतीचे किट देण्यात आले.  तसेच प्रतिकारशक्ती वाढीकरि‍ता कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांकरीता कामधेनू व तत्वसेवा या संस्थेतर्फे मोफत होमियोपथी औषधे व डॉ. बनसोडे यांच्यातर्फे सुमारे २२०० रूपयांची मोफत आयुर्वेदिक औषधे देण्यात आली आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे आत्मबल व मनोधैर्य वाढण्‍यास नक्‍कीच मदत होईल, असेही तहसिलदार तृप्‍ती कोलते-पाटील यांनी सांगितले.