पुणे प्रवाह न्युज पोर्टल
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना- विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर
पुणे, दिनांक 6- जगभरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण केवळ अडीच ते 3 टक्के असून या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिली. महाराष्ट्रात किंवा पुण्यात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही. तथापि, नागरिकांनी वैयक्तिक आरोग्य स्वच्छतेबाबत आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीस पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, उपसंचालक आरोग्य डॉ. संजय देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक नांदापूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी भगवान पवार, विमानतळ प्राधीकरणाचे संचालक कुलदीपसिंग, डॉ. रामचंद्र हंकारे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, केंद्र सरकारच्या निर्देशानुसार मुंबई, पुणे, नागपूरसह देशातील २३ विमानतळांवर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रिनिंग करण्यात येत आहे. या स्क्रिनिंगमध्ये आढळलेल्या संशयित रुग्णांना विलगीकरण कक्षामध्ये भरती करण्याची सुविधा पुण्यातील नायडू रुग्णालयात करण्यात आली आहे.
नागरिकांनी कोरोना विषाणू आजाराबाबत सोशल मिडीयाव्दारे पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. या विषाणूचा संसर्ग होवू नये, यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे तसेच सामाजिक शिष्टाचार पाळून दक्षता बाळगावी असेही डॉ. म्हैसेकर म्हणाले. जे प्रवासी कोरोना बाधित देशातून किंवा परदेशातून भारतात येत आहेत, त्यांची माहिती दररोज विमानतळ आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत आरोग्य विभागास कळविली जात आहे. बाधित देशातून आलेल्या तारखेपासून पुढील १४ दिवस या सर्व प्रवाशांचा दैनंदिन पाठपुरावा केला जातो. त्यांच्यामध्ये कोरोना आजार सदृश्य लक्षणे निर्माण झाली आहेत किंवा कसे याबाबत दैनंदिन विचारणा करण्यात येते. याशिवाय अशी लक्षणे आढळल्यास त्यांनी स्वतःहून आरोग्य विभागात कळवण्याबाबत देखील प्रत्येक प्रवाशास सुचित करण्यात आले आहे. दैनंदिन पाठपुराव्यात एखाद्या प्रवाशामध्ये संशयित कोरोना आजाराची लक्षणे आढळल्यास त्याला विलगीकरण कक्षात भरती करण्याबाबत संबंधितांना सूचित करण्यात आले असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
एखाद्या हॉटेलमधील परदेशी नागरिक आजारी असल्यास तेथील व्यवस्थापनाने जिल्हा प्रशासनास तात्काळ याची माहिती द्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
कोरोना विषाणू आजाराच्या रुग्ण निदानाची व्यवस्था राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एन आय व्ही) येथे करण्यात आली आहे. पुण्याव्यतिरिक्त आता राज्यातील दोन विषाणू संशोधन आणि निदान प्रयोगशाळांमध्ये (व्ही.आर.डी.एल.) देखील करोना निदानाची सुविधा निर्माण करण्यात आली आहे. कस्तुरबा मध्यवर्ती प्रयोगशाळा, मुंबई आणि इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर येथे या प्रयोगशाळा आहेत. कोरोना आजारी रुग्णांना भरती करण्यासाठी सध्या मुंबईमध्ये कस्तुरबा रुग्णालय आणि पुण्यात नायडू रुग्णालय येथे आवश्यक विलगीकरण व उपचार सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात गंभीर रुग्णांसाठी विलगीकरण व्यवस्था करण्यात आली आहे. या शिवाय प्रत्येक जिल्हा रुग्णालयात आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातही विलगीकरण कक्ष कार्यान्वित करण्याबाबत संबंधितांना सूचित करण्यात आले असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
कोरोना संदर्भात अर्धवट माहिती असणारे, चुकीचे, भिती उत्पन्न करणारे संदेश कोणीही सोशल मिडियावर पाठवू नयेत. विविध अधिकृत स्रोतांकडून खात्री करुन घेतल्याशिवाय असे संदेश पुढे पाठवू नयेत, तसेच आवश्यक असल्यास हेल्पलाईनला फोन करुन शंका निरसन करुन घ्यावे. सर्दी, ताप, खोकला या लक्षणांनुसार रुग्णांवर उपचार केले जात असून सर्वांनी रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी प्रयत्न करावेत. शिंकणे, खोकल्यातून बाहेर पडणाऱ्या थुंकीच्या वाटे या विषाणूचा प्रसार होत असल्यामुळे खोकतांना, शिंकताना नाका- तोंडावर रुमाल ठेवावा व सामाजिक शिष्टाचार पाळायला हवेत, असेही ते म्हणाले. हात वारंवार धुवावा, शिंकताना, खोकताना नाका-तोंडावर रुमाल अथवा टिश्यू पेपर धरावा, अर्धवट शिजलेले, कच्चे मांस खाऊ नये, फळे, भाज्या धुवूनच खावेत,असेही त्यांनी सांगितले.
धुलीवंदन कार्यक्रमात सहभागी होतांना काळजी घ्या- जिल्हाधिकारी राम
जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवाहन करतांना सांगितले की, आपल्या कुटुंब किंवा मित्रपरिवाराने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी व्हायला हरकत नाही, तथापि, अनोळखी लोकांनी आयोजित केलेल्या होळी कार्यक्रमात सहभागी होवू नये. गर्दीच्या ठिकाणी जाणे अत्यावश्यक असेल तरच जावे, अन्यथा अशा ठिकाणी जाणे टाळावे. सध्या वातावरणात बदल होत आहे, हिवाळा संपून उन्हाळा सुरु होत आहे, वातावरणातील बदलामुळे सर्दी-पडसे होवू शकते त्यामुळे नागरिकांनी घाबरुन न जाता वैद्यकीय उपचार करुन घ्यावेत, असेही जिल्हाधिकारी राम म्हणाले. सर्वसामान्य नागरिकांच्या कोरोना विषयक शंका- समाधानासाठी टोल फ्री क्रमांक १०४ उपलब्ध करुन देण्यात आला आहे. संचालक आरोग्य सेवा पुणे कार्यालयात कोरोना नियंत्रण कक्ष स्थापन (०२० -२६१२७३९४) करण्यात आला असून तो सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.