कोरोना'' प्रतिबंधासाठी सूक्ष्म नियोजन करा* *विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या सूचना* *व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला आढावा*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*''कोरोना'' प्रतिबंधासाठी सूक्ष्म नियोजन करा*
*विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्या सूचना*


*व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला आढावा*


  पुणे, दि. 13 : कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांचे सूक्ष्म नियोजन करुन त्यानुसार कार्यवाही करा. पर्यटनस्थळे, तीर्थस्थळे येथे गर्दी होवू नये, म्हणून व्यापक जनजागृती करा. तसेच शहरांमध्ये विलगीकरण आणि क्वॉरंटाईनची सुविधा तात्काळ निर्माण करा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पुणे विभागातील पुणे, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला दिल्या.
    'कोरोना' बाबत विभागीय आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे डॉ. दीपक म्हैसेकर यांनी संवाद साधला. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, महसूल उपायुक्त प्रताप जाधव, जयंत पिंपळकर, आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजय देशमुख आदी यावेळी उपस्थित होते.
           डॉ. म्हैसेकर म्हणाले, केंद्र शासनाच्या सूचनेनुसार चीन, इराण, इटली, द.कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या 7 देशांमधून प्रवास करुन आलेल्या व्यक्तिंना क्वॉरंटाईन करावे. प्रत्येक शहरातील टुर ऑपरेटर्सकडून परदेश प्रवास केलेल्या आणि सध्या परदेशात असलेल्या प्रवाशांची यादी घेवून त्यानुसार योग्य त्या उपाययोजना कराव्या. परदेशातून परतणाऱ्या पर्यटकांनी स्वत:हून घरीच 15 दिवस स्वतंत्र रहावे. कुटुंबात अथवा समाजात मिसळू नये, असा संदेश सर्वत्र द्यावा. 
  डॉ. म्हैसेकर म्हणाले, पर्यटनस्थळे, धार्मिक ठिकाणी गर्दी होवू नये, यासाठी व्यापक जनजागृती करा. शालेय व महाविद्यालयीन विध्यार्थ्यांना तसेच नागरिकांना स्वच्छतेच्या खबरदारीबाबत प्रशिक्षित करा. सार्वजनिक स्वच्छतागृह, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्याबाबत संबंधितांना सूचना देवून सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा.
    कोरोनाच्या संशयित रुग्णांची माहिती मिळाल्यावर त्यांच्या विलगीकरणावर भर द्या. बाधित रुग्ण आढळल्यास त्यांच्या प्रवासाची माहिती, त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती याबाबत विचारपूस करण्यासाठी पथके तयार करा. क्वॉरंटाईनची सुविधा ही रुग्णालयापासून दूर करा. विलगीकरणाची सुविधा मात्र रुग्णालयात असायला हवी, असे सांगून पुढील किमान 15 ते 20 दिवस शहरांमधील धार्मिक कार्यक्रम, यात्रा रद्द करण्याबाबत विविध संस्थांना विनंती करा, अशा सूचनाही डॉ. म्हैसेकर यांनी यावेळी केल्या.  


  दरम्यान, विभागातील जिल्हाधिकारी, विशेष पोलीस महानिरीक्षक, महानगरपालिका आयुक्त, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा शल्यचिकित्सक, निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्ह्यात सुरु असलेल्या उपाययोजनांबाबत तसेच क्वॉरंटाईन आणि विलगीकरणासाठी राखीव केलेल्या जागा, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव  होवू नये यासाठी वापरण्यात येणाऱ्या मास्क, सॅनिटायझर, हँन्ड वॉश तसेच औषधसाठयाची उपलब्धता आदी विषयांबाबत यावेळी माहिती दिली. यामध्ये साताऱ्यातून जिल्हाधिकारी शेखर सिंह, सांगलीचे जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, कोल्हापुरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई, मनपा आयुक्त डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके, सोलापुरातून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आयुक्त दीपक तावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ तसेच पुण्याच्या निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी सहभागी झाले. 
0000000