*आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एआयटी) विद्यार्थ्यांचे* *'केपीआयटी स्पार्कल' आणि 'सॉल्व्ह फॉर भारत' हॅकेथॉन स्पर्धेत यश*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एआयटी) विद्यार्थ्यांचे*
*'केपीआयटी स्पार्कल' आणि 'सॉल्व्ह फॉर भारत' हॅकेथॉन स्पर्धेत यश*


पुणे: दिघी येथील आर्मी इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या (एआयटी) विद्यार्थ्यांनी केपीआयटी स्पार्कल २०२० आणि ‘सॉल्व्ह फॉर भारत’ या राष्ट्रीय स्तरावरील हॅकेथॉन स्पर्धेत अनुक्रमे प्रथम व तृतीय पारितोषिक मिळवले. राष्ट्रीय स्तरावरील केपीआयटी स्पार्कल २०२० मध्ये ‘डेटॉक्स’ संघाने सुवर्ण पदक जिंकून ५ लाख रुपयाचे पारितोषिक मिळवले. राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष पद्मविभूषण ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर आणि केपीआयटीचे सहसंस्थापक रवी पंडित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.


'केपीआयटी स्पार्कल २०२०' ही एक राष्ट्रीय स्तरावरची स्पर्धा असून, होतकरू आणि हुशार भावी उद्योजकांना आपल्या कल्पना मांडण्यासाठीचे महत्वपूर्ण व्यासपीठ आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या कल्पना मूर्त स्वरूपात आणण्याची संधी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन या शिक्षण शाखांच्या कल्पक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाते. या स्पर्धेसाठी देशभरातील १००० महाविद्यालयांच्या जवळपास २०,००० विद्यार्थ्यांकडून तीन हजाराहून अधिक संकल्पना पाठवण्यात आल्या होत्या. त्यापैकी छाननी केलेल्या ३० संघांनी आपल्या संकल्पनेचे कार्यान्वित प्रारूप पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयात झालेल्या अंतिम फेरीत सादर केले.


अभियांत्रिकीच्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या पितांबर पांडा, प्रियांशु आणि विशाल सिंग या विद्यार्थ्यांच्या 'डेटॉक्स' संघाने ‘एआयटी’चे प्रतिनिधित्व केले. त्यांनी विमानाच्या नाकाच्या रचनेपासून प्रेरणा घेऊन उभ्या अक्षाचे वाऱ्यावर चालणारे टर्बाईन तयार केले. ज्यामुळे टर्बाईनची एकूण कार्यक्षमता वाढते आणि टर्बाइनकडून तुलनेने अधिक ऊर्जा मिळते. या संरचनेचा उपयोग व्यावसायिक आणि औदयोगिक क्षेत्रात केला जाऊ शकतो. प्रा. आर. बी. गुरव आणि प्रा. एस. एम. गायकवाड यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर यांत्रिक अभियांत्रिकी विभागाचे प्रमुख डॉ. एस. एम. संसगिरी यांनी विद्यार्थ्यांना यासाठी प्रोत्साहन दिले. 'एआयटी'चे संचालक ब्रिगेडिअर (निवृत्त) अभय भट विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या कामगिरीचा अभिमान वाटत असल्याचे सांगितले.


याच प्रकारच्या देशभरातील 'आयआयटीज'तर्फे आयोजित ‘सॉल्व्ह फॉर भारत’ या दुसऱ्या स्पर्धेत ‘एआयटी’च्याच सौरभ सिंग या तृतीय वर्षातील इलेकट्रोनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याने 'सिटी मॉनिटरिंग सिस्टीम फॉर हेल्थकेअर आयओटी’ या प्रकल्पासाठी एक लाख रुपयांचे पारितोषक जिंकले. ही स्पर्धा बंगळूर येथील भारतीय विज्ञान संस्था येथे पार पडली. २५०० नोंदणी केलेल्या संघांपैकी शेवटच्या फेरीसाठी ६७ संघांची निवड करण्यात आली होती. या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक 'एआयटी'च्या माजी विद्यार्थ्यांनी पटकावले. त्यामध्ये अनिरुद्ध मुरली, रोहन चौगुले, स्वस्तिक श्रीवास्तव, आणि रजत रावत यांचा समावेश होता. त्यांचा प्रकल्प 'रियल टाइम मल्टिलिंग्वल ट्रान्सलेशन अँड लाईव्ह क्लासरूम ऍट लो बँड्विथ' या विषयावर होता.


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*