कोरोना व्हायरसच्या धास्तीनं लग्न ठरलेल्या २७ वर्षीय युवकाचे थेट पंतप्रधानांना पत्र

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


कोरोना व्हायरसच्या धास्तीनं लग्न ठरलेल्या २७ वर्षीय युवकाचे थेट पंतप्रधानांना पत्र
___________________________________


चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे जगातील अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. जगात ४ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर १८ हजारांहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. वाऱ्याच्या वेगात पसरणाऱ्या कोरोनामुळे भारतातही ५३६ जणांना लागण झाली आहे तर आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाला संबोधित केले. यावेळी त्यांनी पुढील २१ दिवस अख्खा देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. या व्हायरसला रोखण्यासाठी प्रशासकीय, आरोग्य यंत्रणा सर्वोत्तोपरी प्रयत्न करत आहेत. पण लोकांनी २१ दिवस घराच्या बाहेर पडू नये, अत्यावश्यक सेवा-सुविधा देणाऱ्यांना बाहेर पडण्याची परवानगी आहे. बाकीच्या लोकांनी घराच्या बाहेर पडू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये अशाप्रकारे आवाहन नरेंद्र मोदींनी केले आहे.


कोरोनामुळे लग्नसराईच्या दिवसात अनेक लग्न पुढे ढकलण्यात येत आहेत. ओडिशा येथील एका २७ वर्षीय युवकाने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून त्याच्या आई-वडिलांना समजवण्याची विनंती केली आहे. पुढील महिन्यात या युवकाचे लग्न असून त्यात पाहुण्यांची रीघ लागणार आहेत. त्यामुळे पाहुण्यांची गर्दी होऊ नये यासाठी माझ्या आई-वडिलांना समजावा असं त्या युवकाने पत्रात लिहिलं आहे.


ओडिशातील ग्रामविकास विभागाच्या शाळेत काम करणारा रोहित कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. कुमार याचे लग्न एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे. त्याने पत्रात नमूद केले आहे की, मी माझ्या कुटुंबातील लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतोय, पाहुण्यांची गर्दी न करता लग्न करुया, पण ते ऐकत नाहीत. कारण त्यांना अपेक्षा आहे की, एका महिन्यात परिस्थिती सर्वसामान्य होईल. पण मला भीती आहे की, एका महिन्यात परिस्थिती ठिक झाली तरी लोकांना एकत्र करुन गर्दी करणं धोक्याचं आहे असं त्याने सांगितले.


त्यामुळे हे पत्र पंतप्रधानांपर्यंत पोहचवण्यासाठी त्याने माध्यमांशीही संवाद साधला. पंतप्रधान मोदी माझ्या घरच्यांना समजावतील तर घरातलेही त्यांचे ऐकतील कारण माझ्या घरातले नरेंद्र मोदींचे चाहते आहेत असं कुमार याने सांगितले.  आजपासून देशभरात २१ दिवस लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जर या २१ दिवसात कोरोनावर मात नाही केलं तर मोठा अनर्थ घडेल अशी भीती पंतप्रधानांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे लोकांनीही घराच्या बाहेर न पडता स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे असंही त्यांनी सांगितले.