नाशिकमधील शेतकऱ्याने मोफत वाटले गहू, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


नाशिकमधील शेतकऱ्याने मोफत वाटले गहू, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
___________________________________


देशभरात कोरोना व्हायरसमुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. देशभरातील ऑफिसेस, कंपन्या, कारखाने बंद असल्याने पोटावर हात असल्याने कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यामुळे अनेक समाजसेवक पुढे येऊन या गरजूंना मदत करत आहेत. नाशिकमधील एका मध्यमवर्गीय शेतकऱ्याने देखील त्याच्या शेतात पिकवलेला गहू गरजूंमध्ये दान केला आहे. त्यांच्या या दानशूरपणाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले असून त्याचे आभार देखील मानले आहे.
नाशिकमधील शेतकरी दत्ता राम पाटील यांची तीन एकरात शेतजमीन आहे. त्यांनी या तीन एकरात गहूचे पिक घेतले आहे. या तीन एकरमधील एक एकरात पिकलेले गहू दान करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यांनी एक एकरातील गहू गरजू व्यक्तींना दान केले आहेत. ‘मी एक छोटा शेतकरी आहे. आम्ही आर्थिकदृष्ट्या सधन नाही पण आमच्याकडे एक चपाती आहे तर त्यातील अर्धी चपाती आम्ही गरजवंतांना देऊ शकतो’, असे दत्ता राम पाटील यांनी सांगितले. एएनआयने याबाबत ट्विट केले आहे. एनएनआयचे हे ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाने रिट्विट करून दत्ता राम पाटील यांचे कौतुक केले आहे. ‘माणूसकीच आपल्याला या युद्धात जिंकण्यासाठी मदत करू शकते. दत्ता राम पाटीलजी या कार्यासाठी तुमचे आभार’, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून पोस्ट करण्यात आले आहे.