बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात डायलेसिस सेवा सुरु* *ज्येष्ठ नागरिक, बीपीएल रेशनकार्डधारकांसाठी मोफत;इतरांसाठी दोनशे रुपयात*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


*बारामतीच्या सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात डायलेसिस सेवा सुरु*
*ज्येष्ठ नागरिक, बीपीएल रेशनकार्डधारकांसाठी मोफत;इतरांसाठी दोनशे रुपयात*
          बारामती, दि. २: येथील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालायासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार तातडीने पूर्ण वेळ कंत्राटी स्वरूपाचे डायलेसिस ऑपरेटर हे पद जिल्हा शल्यचिकित्सकांनी उपलब्ध करुन दिले आहे. त्यामुळे येथील डायलेसिस सेवा सुरु झाली असून आज पहिल्या रुग्णाने या सेवेचा लाभ घेतला. ज्येष्ठ नागरिक, बिपीएल रेशनकार्ड धारकांसाठी ही सेवा मोफत असून इतर रुग्णांसाठी केवळ दोनशे रुपयात ही सेवा उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. सदानंद काळे यांनी दिली. 
           मुंबईच्या सिध्दी विनायक ट्रस्टच्यावतीने राज्य सरकारला ३४ डायलेसिस मशिन देण्यात आल्या आहेत. या मशिन राज्यातील विविध शासकीय रुग्णालयात देण्यात आल्या आहेत. या अंतर्गत बारामती येथील सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयासाठी दोन डायलेसिस मशिन देण्यात आल्या होत्या. मात्र या मशिनच्या वापरासाठी आवश्यक असणारे डायलेसिस ऑपरेटर हे तांत्रिक पद सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात उपलब्ध नसल्यामुळे ही सेवा सुरु झाली नव्हती. 
                उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रश्नी लक्ष घालून सूचना केल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक नंदापूरकर यांनी सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयासाठी पूर्ण वेळ कंत्राटी स्वरुपाचे डायलेसिस ऑपरेटर पद उपलब्ध करुन दिले. तसेच बारामती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमडी मेडीसिन तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा या उपक्रमासाठी घेण्यात आली आहे. त्यामुळे राज्यात सर्वात पहिल्यांदा बारामती शासकीय रुग्णालयात ही सेवा सुरु झाली आहे. मंगळवारी पहिल्या रुग्णाने या सेवेचा लाभ घेतला. 
                बदलती जीवनशैली आणि अन्य कारणांनी मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. डायलासिसची सेवा खासगी रुग्णालयात घेण्यासाठी साधारणत: बाराशे ते दोन हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. बारामती उपजिल्हा रुग्णालयात ही सेवा सुरु झाल्यामुळे दारिद्र्य रेषेखालील बीपीएल रेशनकार्डधारक तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी ही सेवा मोफत उपलब्ध आहे. तर अन्य रुग्णांसाठी केवळ दोनशे रुपयांत ही सेवा उपलब्ध होणार आहे. 
                 सध्या सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात असणाऱ्या दोन मशिनवर दिवसांत चार रुग्णांना डायलेसिस सेवा देता येणार आहे. बारामती तालुक्यातील गरजू रुग्णांना याचा लाभ घेता यावा यासाठी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, अशा वर्कर, खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून रुग्णांसाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले. 
*****


◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆


*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*


*संपादक संतोष सागवेकर,*


*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*


*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*