अमेरिकेमध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित; युरोप बनला उद्रेकाचे केंद्र

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


अमेरिकेमध्ये राष्ट्रीय आणीबाणी घोषित; युरोप बनला उद्रेकाचे केंद्र
________________________________


जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून जवळपास 1 लाख 39 हजाराहून अधिक लोकांना लागण झाली आहे. तर 5120 लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेलाही कोरोनाने  वेढले असून राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. तसेच या संकटाविरोधात लढण्यासाठी 50 अब्ज डॉलर्सचा निधी दिला आहे. 
अमेरिकेमध्ये आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला असून 1740 जणांना कोरोनाचे संक्रमण झाले आहे. डब्ल्यूएचओने शुक्रवारी युरोपला कोरोनाचे नवे केंद्र घोषित केले आहे.
डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस गेब्रेसियोस यांनी सांगितले की, अटली आणि युरोपच्या अन्य देशांमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण वाढत चालले आहेत. चीनच्या तुलनेत या देशांतून संक्रमण आणि मृत्यंचा आकडा जास्त आहे. एकट्या इटलीमध्ये मृतांचा आकडा 1266 झाला आहे. तर 17660 लोक संक्रमित झाले आहेत. 
युक्रेनने परदेशी नागरिकांना आपली सीमा बंद केली. येथे तीन जणांना संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. कोरोनो व्हायरसचा प्रादुर्भाव आफ्रिकन खंडातील सुमारे 18 देशांमध्ये झाला आहे. शुक्रवारी केनिया, इथिओपिया, सुदान आणि गिनी येथे पहिला रुग्ण आढळला आहे. इराणमध्ये शुक्रवारी एका दिवसात 85 लोकांचा मृत्यू झाला. येथे आतापर्यंत एकूण 514 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे स्पेनचे पंतप्रधान पेद्रो सांचेझ यांनी देशात 15 दिवसांची आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांची पत्नी सोफी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.