कर्नाटकात मॉल,सिनेमागृह,क्लब,पब 8 दिवसांसाठी बंद, मंगल कार्यालयासही टाळे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


कर्नाटकात मॉल,सिनेमागृह,क्लब,पब 8 दिवसांसाठी बंद, मंगल कार्यालयासही टाळे
__________________________________


देशात कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यानंतर खबरदारी सार्वजनिक ठिकाणी लोकांना न येण्याचं आवाहन प्रशासन आणि सरकारकडून करण्यात येत आहे. कोरोनापासून  बचावासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला आहे. कोरोनाबद्दल सरकार गंभीर असून कर्नाटक सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे. 


मुंबई आणि बंगळुरूसारख्या महानगरात गर्दी टाळता येणार नाही, अशी स्थिती आहे. प्रचंड गर्दीची रेल्वे स्थानके, गच्च भरलेल्या बेस्ट गाड्या, मंत्रालयातील प्रचंड गर्दीची ठिकाणे टाळणार कशी, असा सवाल सर्वसामान्यांना सतावत आहे. पोटापाण्यासाठी घराबाहेर पडत गर्दीचा चेहरा होणे अपरिहार्य आहे. त्यामुळेच मनात कोरोनाचे भय बाळगत आणि यातून कसेबसे स्वत:ला सावरत, चाकरमानी मास्क व रुमाल तोंडावर ठेवून स्वत:ची काळजी घेत दैनंदिन व्यवहारात गुंतले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी राज्यात 8 दिवस सर्वच गर्दीची ठिकाणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 
उद्यापासून पुढील एक आठवडाभर, कर्नाटकमध्ये मॉल, चित्रपटगृह, पब, क्लब, प्रदर्शन, स्विमींग पूल, उन्हाळी शिबीर, स्पोर्ट्स इव्हेंट, मंगल कार्यालय आणि संमेलनं बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. तसेच, जोपर्यंत हा कोरोनाचा काळ संपुष्टात येत नाही, तोपर्यंत प्रत्येकाने प्रवास टाळला पाहिजे, असेही येडीयुरप्पा यांनी म्हटले आहे. कलबुर्गी येथे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या वृद्ध व्यक्तीच्या संपर्कात 31 लोकं आले होते. या सर्व लोकांची ओळख पटवून त्यांची तपासणी केली जाणार असल्याचेही येडीयुरप्पा यांनी म्हटले.   


दरम्यान, व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे सतर्कतेचा भाग म्हणून शासनाच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील सांगली येथे होणारे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने सर्व कार्यक्रम लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. तर, देशात 29 मार्चपासून आयपीएल सामने खेळवले जाणार होते. 15 एप्रिलपर्यंत आयपीएल सामने न खेळविण्याचा निर्णय बीसीसीआयने जाहीर केला आहे. त्यानंतर, पुढील परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल.