गरीब कुटुंबियांना 2 महिन्याचा किराना रॅशनचा पुरवठा करावा - उमेश चव्हाण*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


*गरीब कुटुंबियांना 2 महिन्याचा किराना रॅशनचा पुरवठा करावा - उमेश चव्हाण*


*पुणे -* सद्य परिस्थितीत केंद्र सरकारने येथील गरीब कुटुंबियांसाठी स्वस्त धान्य वाटप योजना जाहीर केलेली असताना ती अधिकृत रेशन दुकानांच्या माध्यमातून वितरीत केली जाणार आहे. सदरील प्रकार मोजक्‍याच धान्य दुकानातून वितरीत केला जाणार असल्याने गडबड आणि गोंधळ उडविणारा ठरेल, असे वाटते. यामध्ये अनेकांना या योजनांपासून वंचित रहावे लागेल. म्हणून पुणे महानगरपालिकेत झोपडीधारक म्हणून कर भरणा करणारे लाखो नागरिकाना  ज्याअर्थी पुणे महानगरपालिकेच्या आरोग्यविभागाअंतर्गत शहरी-गरीब योजना राबविताना लाभार्थींना जे निकष लावले जातात, ते निकष व अटी शिथील करून सर्व गरीबांना व झोपडीधारकांना किमान दोन महिने पुरेल इतके राशन पुणे महानगरपालिकेच्यावतीने देण्यात यावे, अशी आग्रही मागणी रुग्ण हक्क परिषदेच्यावतीने प्रदेश कमिटी अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केली. 


महानगरपालिकेच्या कामकाजाच्या पद्धतीनुसार निर्णय घेण्यास विलंब न करता मा.आयुक्त, मा. महापौर व मा. स्थायी समिती अध्यक्ष यांच्या विशेष अधिकारातून दहा कोटी रुपयांची तरतूद यासाठी करण्यात यावी व पुढील आठ दिवसाच्या आत कचरा गोळा करणाऱ्या व्यवस्थेप्रमाणे घरोघरी राशन पुरविण्याचे काम केल्यास गर्दी, गोंधळ होणार नाही, याबाबत तातडीने पावले उचलावीत व पुणेकरांचे पालकत्व मोठ्या जबाबदारीने पार पाडावे, पुणेकरांची काळजी घ्यावी, संकटसमयी त्यांच्या पाठीशी उभे राहून धिर व दिलासा द्यावा, याबाबत रुग्ण हक्क परिषद व रुग्ण हक्क परिषदेचे तमाम कार्यकर्ते, पदाधिकारी आपणास मदत करण्यास तत्पर राहतील. असे आयुक्त आणि महापौर यांना लेखी निवेदनाद्वारे चव्हाण यांनी कळविले आहे.
        या निवेदनावर अध्यक्ष उमेश चव्हाण, नेत्या ऍड. वैशाली चांदणे आणि केंद्रीय कार्यालयीन सचिव दीपक पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.