महाराष्ट्र गर्लस् एज्युकेशन सोसायटी, हुजूरपागा  नियामक मंडळाच्या गैर कारभाराविरुद्ध  ‘हुजूरपागा बचाव कृती समिती‘ स्थापन* 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


Press note


*महाराष्ट्र गर्लस् एज्युकेशन सोसायटी, हुजूरपागा  नियामक मंडळाच्या गैर कारभाराविरुद्ध  ‘हुजूरपागा बचाव कृती समिती‘ स्थापन*
--------------------------------------
*हुजूरपागा नियामक मंडळाच्या गैर कारभाराने संस्थेचे नुकसान :पत्रकार परिषदेत कृती समितीचा आरोप* 
.............................................
संस्थेवर प्रशासक नेमण्याची मागणी
................................
संस्थेच्या मांगडेवाडी -कात्रज शाळेच्या बांधकामाला पीएमआरडिए ची नोटीस


पुणे :


महाराष्ट्र गर्लस् एज्युकेशन सोसायटी, हुजूर पागा प्रशाला व्यवस्थापनाच्या गैरकारभाराविरूध्द आवाज उठविण्यासाठी ' हुजूरपागा बचाओ कृती समिती ' स्थापन करण्यात आली आहे.  संस्थेच्या  १३० वर्षाच्या उज्वल परंपरेला गैरकारभाराने ग्रासले असून विद्यमान व्यवस्थापनाच्या गैरकारभाराच्या विरोधात सनदशीर मार्गाने लढा देण्यात असल्याची भूमिका कृती समितीच्या वतीने आज पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आली.


शमा जाधव ( माजी अध्यक्ष, महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी ) , रुपाली पाटील -ठोंबरे ( सदस्य,महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी ), दीपक मेहता ( बिल्डींग कमिटी सदस्य,महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटी ) , सामाजिक कार्यकर्त्या श्यामला देसाईआणि सहकारी या पत्रकार परिषदेत उपस्थित होते.पुणे श्रमिक पत्रकार संघ येथे ही पत्रकार परिषद झाली.


विद्यमान नियामक मंडळ , सचिव रेखा पळशीकर या संस्थेचे हित न पाहता वैयक्तिक हिताच्या गोष्टी राबवीत असल्याचा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला.संस्थेवर प्रशासक नेमण्याची मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली.संस्थेच्या कात्रज  मांगडेवाडी गट नं. १६ / ४ येथील शाळेच्या अनाधिकृत बांधकामाला काढून टाकण्यासंदर्भात पीएमआरडिए ची नोटीस आली आहे.


संस्थेच्या मालकीच्या व्यावसायिक जागा नाम मात्र भाड्याने देउन संस्थेचे नुकसान करणे,नव्या जागा खरेदी मध्ये गैर व्यवहार ,शिक्षक –कर्मचारी नियुक्तीत भ्रष्टाचार आणि नियमांचे उल्लंघन ,नियामक मंडळावर अवैध नियुक्त्या करणे ,पाल्यांना प्रवेश देताना पालकांकडून देणग्या उकळणे ,शिक्षकांना नोकरीत कायम करण्यासाठी रकमा घेणे ,नियामक मंडळाच्या सभा झाल्याची बोगस कागदपत्रे तयार करणे,नियामक मंडळातील सदस्यांना बेकायदेशीरपणे काढून टाकणे ,सेवकांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम संबधित खात्यात न भरणे ,कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्तीनंतर निवृत्ती वेतन आणि आर्थिक  लाभांपासून वंचित ठेवणे , असे अनेक मुद्दे कृती समितीच्या सदस्यांनी पत्रकार परिषदेत मांडले.    



लक्ष्मी रस्त्यावरील महाराष्ट्र गर्लस् एज्युकेशन सोसायटी ही मुलींच्या शिक्षणासाठी स्थापन झालेली संस्था हुजूरपागा शाळा चालवते.ही सार्वजनिक विश्वस्त संस्था असून विद्यमान विश्वस्त ,नियामक मंडळ मनमानी कारभार करीत आहे.लक्ष्मी रस्त्यावरील संस्थेकडील ४ एकर जागेपैकी निम्मी जागा १३० व्यावसायिक आस्थापनांना नाम मात्र भाडे कराराने दिली आहे.या सर्व व्यवहारांसाठी धर्मादाय आयुक्तांकडून परवानगी घेण्यात आलेली नाही.गाळेधारकांकडून पैशाचा निट हिशेब ठेवण्यात आलेला नाही .सद्याच्या विश्वस्तांचे धर्मादाय कार्यालयाकडे ३० चेंज रिपोर्ट्स प्रलंबित असून नियमाप्रमाणे हे विश्वस्त कारभार पाहू शकत नाहीत ,तरीही बेकायदेशीर पणे कारभार सुरु आहे.संस्थेने कात्रज आणि अन्यत्र ज्या जागा खरेदी केल्या. त्यात मोठा गैर व्यवहार झालेला आहे.


या सर्व गैरकारभारामुळे उज्वल परंपरा असलेली शैक्षणिक संस्था मूळ उद्देशापासून भरकटली असून त्याचा परिणाम संस्थेतील शैक्षणिक वातावरणावर होत आहे.कृती समिती सनदशीर मार्गाने लढा देवून विद्यमान नियामक मंडळाचा गैरकारभार उघडकीस आणेल आणि संस्थेचा जुना नाव लौकिक परत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील,असे या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.



................................................