*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
पुण्याचा मावळा सज्ज झालाय अष्टहजारी शिखरं सर करायला
ध्वजप्रदान कार्यक्रम जल्लोषात : अन्नपूर्णा 1, लोत्से, मनास्लूवर करणार चढाई
पुणे : महाराष्ट्रातील पहिला गिर्यारोहक एव्हरेस्टवीर, सह्याद्रीचा सुपुत्र भगवान चवले हा येत्या सहा महिन्यात जगातील तीन अष्टहजारी शिखरं सर करण्यासाठी सज्ज झाला आहे. पुणेकर असलेला भगवान अन्नपूर्णा 1, लोत्से आणि मनास्लू या तीन अतिकठीण समजल्या जाणार्याझ शिखरांवर चढाई करण्यासाठी 22 मार्च रोजी निघणार आहे. या मोहिमेचा ध्वजप्रदान कार्यक्रम आज (दि. 5) असंख्य गिरीप्रेमी, हितचिंतक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत अतिशय जोशपूर्ण वातावरणात झाला.
पत्रकार भवन येथे आयोजित या सोहळ्याला महापौर मुरलीधर मोहोळ, ले. जनरल राजेंद्र निंभोरकर उद्योजक कृष्णकुमार गोयल यांची तसेच सह्याद्री ट्रेकर्स फाउंडेशनचे संस्थापक सुरेंद्र दुगड आणि स्वानंद अॅनडव्हेंचरचे प्रमुख संजीव शहा यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते क्रांतीचे प्रतिक असलेला भगवा ध्वज आणि तिरंगा राष्ट्रध्वज भगवान चवले यांच्याकडे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. चवले यांला ही मोहीम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागणार असून त्यासाठी 42 लाख रुपये खर्च येणार आहे. या सोहळ्यात अनेक हितचिंतकांनी मदतीचा हात पुढे करीत आर्थिक सहाय्य देऊ केले.
ऐतिहासिकदृष्ट्या पुणे शहराला जसे महत्त्व आहे त्याचप्रमाणे पुण्याची ओळख सांस्कृतिक राजधानी म्हणूनही आहे. पुणे हे शिक्षणाचे माहेरघर असल्याचे सांगून महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुण्यात क्रीडासंस्कृती जपली गेल्यानेही पुण्याचे नाव जगाच्या नकाशावर कोरले गेले आहे. भगवान चवले हे पुण्याचे असल्याने पुण्यनगरीचा प्रथम नागरिक म्हणून मला खूप आनंद आहे. समस्त पुणेकरांच्या वतीने त्याला मनापासून शुभेच्छा!
उरीवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये घुसून भारतीय जवानांनी केलेल्या सशस्त्र कारवाईचा थरार राजेंद्र निंभोरकर यांनी या वेळी कथन केला. काश्मीरमध्ये काम केलेले असल्याने शिखर सर करणे किती अवघड असते याची त्यांनी माहिती दिली.
कृष्णकुमार गोयल म्हणाले, ध्येयपूर्तीसाठी प्रयत्न करणे आणि शिखर गाठल्यानंतर मिळणारा आनंद खूप वेगळा असतो. प्रवाहाच्या विरोधात जाऊन धाडस करण्यासाठी वेडेच व्हावे लागते, त्याशिवाय यश मिळत नाही. ही मोहीम पूर्ण करण्यासाठी भगवान चवले याला 42 लाख रुपये खर्च येणार आहे, पुणेकर मदतीचा हात पुढे करून मोहिमेला नक्कीच देतील असा विश्वास व्यक्त करून त्यांनीही कृष्णकुमार गोयल फाउंडेशनच्या वतीने मदत जाहीर केली.
सुरेंद्र दुगड म्हणाले, सर्वस्व अर्पण करून भगवान चवले याने अष्टहजारी शिखरं सर करण्याचे ध्येय उराशी बाळगले आहे. त्याचे हे ध्येय पूर्ण करण्यासाठी आर्थिक पाठबळाची आवश्यकता आहे. सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने त्यांनी मदतीचा धनादेश चवले याच्याकडे सोपविला.
भगवानकडून शिकण्यासारखे खूप आहे, असे सांगून संजीव शहा म्हणाले, नवनवीन ध्येय गाठण्यासाठी पछाडलेला हा मावळा आहे. त्याने अनेक मोहिमा सर केल्या असल्या तरी त्याचे पाय जमिनीवर आहेत, हा त्याचा फार मोठा गुण आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी स्वानंद अॅसडव्हेंचरतर्फे त्यांनी मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
भगवान चवले याने गिर्यारोहणातील अनुभव कथन केले. मोहिमांदरम्यान अपयश आले तरी खचून न जाता ध्येयशक्ती अत्युच्च असली पाहिजे, असे त्याने सांगितले. कुटुंबियांकडून मिळत असलेल्या साथीबद्दल भगवान यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या संस्था, संघटनांच्या वतीने आर्थिक मदत या वेळी भगवान चवलेकडे सोपविण्यात आली.
मान्यवरांचे स्वागत सुधीर फडके, संभाजी चवले, संजीव शहा, धनंजय ढमढेरे यांनी केला. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन राहुल नलावडे यांनी केले.
फोटो ओळ : अष्टहजारी शिखरे सर करण्यासाठी सज्ज झालेल्या भगवान चवले याला भगवा आणि तिरंजा ध्वज प्रदान करताना सुरेंद्र दुगड, कृष्णकुमार गोयल, मुरलीधर मोहोळ, राजेंद्र निंभोरकर, संजीव शहा.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
*बातम्या आणि जाहिराती करिता संपर्क*
*संपादक संतोष सागवेकर,*
*मो.नं. - 9765202692 व्हाँटशाँफ वर तसेच*
*punepravah@gmail.com मेलवर पाठविणे बंधनकारक*