कथावाचनातून घडते संस्कारक्षम पिढी* - रेणुताई गावस्कर यांचे मत; 'नाती फुलताना'कथासंग्रहाचे प्रकाशन 

#PRESSNOTE


*कथावाचनातून घडते संस्कारक्षम पिढी*


- रेणुताई गावस्कर यांचे मत; 'नाती फुलताना'कथासंग्रहाचे प्रकाशन


पुणे : "रवींद्रनाथ टागोर, प्रताप शर्मा यांच्या कथा वाचत आम्ही मोठे झालो. कथा हा साहित्यप्रकार मुलांवर चांगले संस्कार करणारा असतो. 'सुरंगिणी टेल्स'सारख्या कथा मुलांचे भावविश्व व्यापून टाकतात. अशा प्रकारच्या कथावाचनातून संस्कारक्षम पिढी घडत असते. 'नाती फुलताना' हा कथासंग्रह कोणताही उपदेश न करता लेखिकेच्या समुपदेशनातील अनुभवांचे सकारात्मक भाव उमटले आहेत," असे मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या रेणुताई गावस्कर यांनी व्यक्त केले.


समुपदेशिका मंजुषा वैद्य लिखित 'नाती फुलताना' या कथासंग्रहाचे प्रकाशन रेणुताई गावस्कर यांच्या हस्ते झाले. नवी पेठ येथील एसएम जोशी सभागृहात झालेल्या कार्यक्रमावेळी माजी आमदार मेधा कुलकर्णी, मंजुषा वैद्य, बाबा कुलकर्णी, आशा कुलकर्णी, अर्चिता मडके, सचिन पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी संग्रहातील निवडक कथांचे वाचन झाले. 'बेपत्ता विकासचे पत्र', 'प्रिन्स', 'रिक्षावाले काका' या कथांनी भावनिकतेचे दर्शन घडवले.


मेधा कुलकर्णी म्हणाल्या, "धकाधकीच्या जीवनात मुलांसाठी आपण वेळ देत नाही. त्यांच्या मनाची मशागत करणे गरजेचे आहे. त्यासाठी मुलांना वाचनाची गोडी लावायला हवी. मुलांच्या वृत्तीमध्ये चांगला बदल अपेक्षित असेल, तर पुस्तकांचा आधार आवश्यक आहे. मुलांवर चांगले संस्कार करणे गरजेचे आहे.


प्रास्ताविकात मंजुषा वैद्य म्हणाल्या, संपूर्ण आयुष्याच्या कारकिर्दीत अनके कामे करत असताना एका वर्तमानपत्रात बोधकथा लिहण्याचा योग आला आणि वर्षभर ते सदर चालवले. दुसऱ्यासाठी लिहिताना स्वतःसाठी लिखाण सुरू केले आणि 'नाती फुलतांना'चा जन्म झाला. सूत्रसंचालन अभिजित कुलकर्णी यांनी केले, तर अर्चिता मडके यांनी आभार मानले.
--------------------------
कथासंग्रहाच्या प्रकाशनावेळी डावीकडून आशा कुलकर्णी, मंजुषा वैद्य, मेधा कुलकर्णी, रेणुताई गावस्कर, बाबा कुलकर्णी.