कर्तृत्वसंपन्न जीवनातून अखंड प्रेरणामृत घेऊन कार्यरत होण्यासाठी एक 'घर' आम्हाला हवंय. चला, ते 'घर', तो 'वाडा', 'आपला भिडेवाडा' पुन्हा उभारूया... -प्रगती पाटील

'आपला भिडेवाडा' वाचवा...
तुम्ही भिडेवाड्याचे नाव कधी ऐकलंय का? एका महान ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार होता हा वाडा. भारतात मुलींची पहिली शाळा सुरू केली महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीआईंनी, 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यात तात्याराव भिडे यांच्या वाड्यात. आज त्या ऐतिहासिक घटनेला 172 वर्षे पूर्ण झाली! 172 वर्षांपूर्वीच्या कोंदट सनातनी वातावरणात जोतीराव (वय 21 वर्ष) आणि सावित्रीआई (वय 17 वर्ष) यांनी एक उदात्त स्वप्न बघितले, शतकानुशतके अज्ञानाच्या अंधकारात खितपत पडलेल्या स्त्रियांना ज्ञानप्रकाश देण्याचं स्वप्न. जे धाडस देशात कुणीच केले नव्हते, करू शकत नव्हते ते धाडस तरुण फुले दाम्पत्याने केले. भिडेवाड्यात ज्ञानदीप तेवला. स्त्रीशिक्षणाची सुरुवात झाली, पण त्यासाठी फुले दाम्पत्याने किती कष्ट उपसले! खुद्द जोतीरावांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले. राहते घर सोडल्यानंतर कर्मठ सनातन्यांचे शिव्याशाप, शेण-दगडगोळे त्यांना झेलावे लागले.


 सावित्रीआईंना चारित्र्यहरणाच्या धमक्या मिळाल्या. जोतीरावांना जीवे मारण्याचे प्रयत्न झाले. इतके अग्निदिव्य सोसूनही त्यांनी भिडेवाड्यातील ज्ञानदीप विझू दिला नाही. 172 वर्षांत त्या दीपाने अगणित पणत्या उजळल्या आणि त्यांच्या तेजाने असंख्य घरांत, जीवनांत ज्ञानाचा, आत्मभानाचा, आत्मसन्मानाचा, विधायक कर्तव्यनिष्ठेचा प्रकाश पसरला. आज मी, तुम्ही आपण सर्वजणी जी शब्दसाधना करू शकतोय त्याचे श्रेय आपल्या कुटुंबियांप्रमाणेच जोतीराव आणि सावित्रीआईंनाही आहे, ज्या भिडेवाड्यात हा ज्ञानयज्ञ सुरू झाला होता त्या भिडेवाड्यालाही आहे!


पण आज भिडेवाड्याची काय अवस्था आहे? जणू विस्मृतीत गेलेला पार भग्नावस्थेतील भिडेवाडा कधीही कोलमडून पडेल अशी आजची परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी माझी मैत्रीण स्मिता अन मी पुण्यातील अरुंद गल्लीबोळात भिडेवाड्याचा पत्ता शोधत होतो. स्थानिक रहिवासी, रिक्षावाले यांनीही पत्ता सांगता येत नव्हता. 'गूगल मॅप'वर डेस्टिनेशन आल्याची सूचना येऊनही आसपास कुठं 'वाडा' दिसत नव्हता. अखेरीस एका निळ्या फलकावर मजकूर दिसला - '257, बुधवार पेठ, तात्याराव भिडेवाडा, याठिकाणीच महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि स्त्रीशिक्षणाची पहाट झाली. फातिमा शेख त्यांच्या सहकारी होत्या.' त्या फलकासमोरील भग्नवास्तू म्हणजे 'आपला भिडेवाडा'... त्याक्षणी मनात किती उद्विग्नता दाटून आली ते शब्दांत व्यक्त करता येणार नाही. कुणीतरी सणसणीत चपराक मारल्यासारखं का वाटत होतं मला? भिडेवाड्याच्या समोरच दिमाखात उभे आहे एक प्रसिद्ध देवस्थान, पुण्यातील सर्वाधिक मानाचे 'श्रीमंत दगडूशेठ हलवाई' गणपती मंदीर. एकीकडे त्या मंदिराचे दैदीप्यमान ऐश्वर्य आणि दुसरीकडे भग्नावस्थेतील आपला भिडेवाडा... दररोज मंदिरात सढळहस्ताने दिल्या जाणाऱ्या पैशांपैकी फक्त 0.01% पैसा जरी भिडेवाड्याच्या वाट्याला आला असता तर तो आज असा भग्नावस्थेत राहिला असता का? ही फक्त भिडेवाड्याची शोकांतिका नव्हेय, ही पुण्याच्या, महाराष्ट्राच्या अन भारताच्याही बौद्धिक, मानसिक, भावनिक दिवाळखोरीची परिसीमा आहे. स्वतःला सुशिक्षित, पुरोगामी, बुद्धिवादी, विवेकवादी, मानवतावादी म्हणवून घेणाऱ्या प्रत्येक माणसासाठी ही एक सणसणीत चपराक आहे! 'मंदीर-भिडेवाडा' यांच्यातील विषमता ही केवळ दोन वास्तुंमधील विषमता नव्हे. एकंदरीत समाज म्हणून आपण कुठल्या गोष्टींना प्राधान्य देतोय याचे हे दुःखद, दाहक अन लज्जास्पद वास्तव आहे. ज्यांच्यामुळे आज आत्मभान अन सन्माननीय आयुष्य लाभलंय त्यांच्याशी केलेली ही प्रतारणा आहे. असलं दांभिक जीवन जगताना सद्सद्विवेकबुद्धीची टोचणी कधी लागतच नाही का?


नववर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला दुःखी, निराश करण्याच्या उद्देशाने मी हे लिहिलेलं नाहीये. नवीन वर्षात नवे संकल्प, नवे निर्धार करायला हवेत. ज्यांची सद्सद्विवेकबुध्दी शाबूत आहे त्या सर्वांनाच नववर्षाचे आवाहन करावेसे वाटतेय - भिडेवाड्याला वाचविण्याचा संकल्प अन निर्धार करा. त्याचे संरक्षण, संवर्धन होऊन तेथे एक संग्रहालय (त्यासोबत शक्य असल्यास सुसज्ज ग्रंथालय) व्हायला हवे. जोतीराव आणि सावित्रीआईंच्या पावन स्मृती तेथे जपल्या जाव्यात. फक्त पुणे, महाराष्ट्र, भारतच नव्हे तर सर्व जगाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक विकासात ज्यांनी भरीव योगदान दिलेय त्या महामानवांचा परिचय नवीन पिढीला एका छताखाली होईल असं संग्रहालय तेथे व्हायला हवं. आज जे आत्मभान आपल्याला लाभलंय त्यासाठी ज्यांनी अपार कष्ट उपसलेत त्यांच्याबद्दलच्या कृतज्ञतेत साश्रुनयनांनी क्षणभर नतमस्तक होऊन विसावण्यासाठी अन त्यांच्या कर्तृत्वसंपन्न जीवनातून अखंड प्रेरणामृत घेऊन कार्यरत होण्यासाठी एक 'घर' आम्हाला हवंय. चला, ते 'घर', तो 'वाडा', 'आपला भिडेवाडा' पुन्हा उभारूया...
-प्रगती पाटील