प्रेस नोट
.............................
*भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात जयंती निमित्त स्व. पतंगराव कदम यांना अभिवादन*
पुणे:
ज्यांचे कर्तृत्व, दूरदृष्टी, विचारक्षमता व कल्पकतेने राज्याच्या वैचारिक, सांस्कृतिक, राजकीय प्रगतीला वेग आला आणि राज्याला एक वेगळी दिशा मिळाली, अशा नेत्यांपैकी स्व. डॉ पतंगराव कदम एक लोकनेते होते . त्यानी स्वतःच्या दुरदृष्टीने, विचारक्षमतेने व धाडसाने राज्याच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये आपला वेगळा असा ठसा उमटवला ,असे उद्गार डॉ भालेराव यांनी काढले.
भारती विद्यापीठ संस्थेचे संस्थापक स्व. डॉ पतंगराव कदम यांच्या ७६ व्या जयंती निमित्त भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय ) अभियांत्रिकी महाविद्यालय, धनकवडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्राचार्य डॉ आनंद भालेराव बोलत होते. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक वर्ग उपस्थित होता.
स्व. डॉ पतंगराव कदम, ज्यांना सगळे प्रेमाने आणि आदराने 'साहेब' म्हणून ओळखतात, यांच्या कारकिर्दीतल्या आठवणींना उजाळा देत असताना डॉ भालेराव यानी काही अनुभव सांगितले.
ते म्हणाले,'कुठल्याही प्रकारचा आर्थिक पाठिंबा किंवा राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा पतंगराव कदम यांनी स्वबळावर आणि कर्तृत्वाने राजकीय , शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटवला.
सलग ६ वेळा निवडणूकीत विजयी होऊन महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळात विविध खात्याची मंत्रिपद भूषविले. त्यांच्या कार्यात लोकांकडून मिळालेले प्रेम, आदर, प्रतिसाद यातून ते लोकनेते झाले.
डॉ भालेराव पुढे म्हणाले, १९६१ साली जेव्हा पतंगराव पुण्यात आले तेव्हा त्यांचे शिक्षण 'डिप्लोमा इन टीचिंग' होते. शिकत असताना त्यांनी हाल अपेष्टा आणि समाजाचे वैफल्य ग्रस्त परिस्थिती अनुभवली होती. त्यांना जाणीव झाली कि या परिस्थितीतून समाज उभारायचा असेल तर शिक्षण हाच मार्ग आहे . म्हणून त्यांनी वयाच्या १९ व्या वर्षी भारती विद्यापीठ ची स्थापना केली. जेणे करून समाजाच्या तळागाळातील, विस्थापित , निराधार व आर्थिक दृष्टया मागासलेल्या विद्यार्थाना उत्तम दर्जाचे शिक्षण घेण्याची संधी मिळावी आणि त्यांची प्रगती घडावी. स्थापन झाल्यावर जिथे फक्त मराठी - इंग्रजी च्या परीक्षा घेण्यात येत असे ,त्या भारती विद्यापीठ संस्थेचा आज वटवृक्ष झाला आहे ,असे डॉ भालेराव यांनी सांगितले.
संस्थेतील वातावरण हे नेहमी कर्तव्य दक्ष व कौटुंबिक असावे यासाठी देखील पतंगराव कदम नेहमी प्रयत्न करायचे असे त्यांनी सांगितले . या साठी ते दरवर्षी सेवक मेळावा आयोजित करायचे आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री असतानाही मेळाव्यात संपूर्ण दिवस उत्स्फूर्त सहभाग घ्यायचे, असे त्यांनी सांगितले आणि मेळाव्यातील काही आठवणी देखील त्यांनी सांगितल्या.
स्व. पतंगराव यांच्या प्रामाणिक आणि स्वच्छ स्वभावाचे काही अनुभव , कारकिर्दीत त्यांनी संस्थेशी जोडलेली मोठी व्यक्तिमत्वे, कर्मचाऱ्यांना दिलेली शिकवण, संधी, प्रगतीचे मार्ग अनेक उदाहरणे या वेळी डॉ भालेराव यांनी मांड ली. पतंगराव हे कधीही संस्थेला मिळालेले यश अथवा मानांकनाचे श्रेय स्वतःकडे न घेता सर्व कर्मचाऱ्यांच्या निष्ठेला आणि सहभागाला देत असत .त्यांच्या मोठेपणाचे आणि कौतुकाचे काही अनुभव देखील त्यांनी सांगितले. साहेबांची प्रत्येक कृती आणि प्रत्येक वाक्य हे जीवनाला उपयुक्त दिशा आणि प्रगती देणारे असत ,अ से डॉ भालेराव म्हणाले.
पुढे बोलत असताना ते म्हणाले कि समाज समाज अशाच व्यक्तींना स्मरणात ठेवतो ज्यांनी आपल्या ज्ञानाने, कर्तृत्वाने, दूरदृष्टीने समाजाचे धारण, पोषण, रक्षण केले आहे. आपल्या अशाच अविरत कार्यामुळे पतंगराव यांना "लोकनेते" हि ओळख मिळाली. त्यांच्या या कार्य साठी ते सर्व सामान्यांचे नेते आणि उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणून आजन्म स्मरणात राहतील.
................................................