*सर्व धर्म सह भावाचे पाईक!*
.................................................
( "म टा संवाद' पुरवणीतील फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या वरील डॉ. सदानंद मोरे यांच्या लेखातून )
................................................
येशू, रेव्ह. टिळक अशा अनेक खास ख्रिस्ती विषयांवर लेखन करणाऱ्या वि. द.घाटे यांनी येशूच्या जीवनातील बंडखोरीचा आवर्जून उल्लेख केला आहे. घाटे लिहित होते तेव्हा लॅटिन अमेरिकन
राष्ट्रांत लिबरेशन थिऑलॉजीचा उदय झाला नव्हता. पण दिब्रिटोंच्या काळात तो झाला होता.धर्मगुरूने दीक्षा, उपदेश,प्रवचन या वर्तुळ बाहेर जात रस्त्यावर उतरून अन्याय, अत्याचार,शोषण याविरुद्ध लढा दिला पाहिजे असे या विचारप्रणालीचे म्हणणे आहे. दिब्रिटोंनी तसेच केले. त्यातूनच 'वसई वाचवा' ही पर्यावरणाची चळवळ उभी राहिली. याही संघर्षातून ते तावून सुलाखून बाहेर निघाले.
बायबलचे सुबोध मराठी भाषांतर किंवा
भावानुवाद ही दिब्रिटोंनी मराठी भाषेला दिलेली देणगीच आहे. बायबलच्या अनुवादाचे प्रयोग गेली दीड-दोन शतके चालू आहेत. रेव्ह. टिळक आणि पंडिता रमाबाई यांच्या या अनुवादाच्या चौकटीविषयी झालेला वाद जाणकारांना ठाऊक आहे. अशा वादांपासून स्वतःला अलिप्त ठेवून दिब्रिटोंनी ही कामगिरी बजावली हे विशेष. त्यांच्या साहित्य क्षेत्रातील कामगिरीची दखल घेत त्यांना
साहित्य अकादमी, महाराष्ट्र शासन यांनी यथोचित गौरविले आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांना 'ज्ञानोबा तुकाराम' पुरस्कार देऊन त्यांच्या मराठी संतांशी असलेल्या नात्यावर जणू राजमान्यतेची मोहोर उमटवली असे म्हणता येते. अर्थात त्यांच्या या प्रयोगांवर आक्षेप घेणारी काही मंडळी ख्रिस्ती वर्तुळातूनच पुढे आली हा भाग वेगळा. तो अंतर्गत संघर्षाचा समजू या. त्यांच्यासारख्या समबुद्धीच्या
माणसांना स्वधर्मातील व परधर्मातील कर्मठांकडून होणारा विरोध सहन करावा लागतो हे त्यांचे प्राक्तनच म्हणायला हवे. दिब्रिटोंच्या मते 'धर्म पर हे संघर्षाचे आणि स्पर्धेचे नव्हे, तर संवादाचे आणि सहकार्याचे क्षेत्र आहे. आपण परधर्माचे
स्वरूप आत्मीयतेने समजून घेतले, तर अधिक डोळसपणे स्वधर्माचे पालन करू शकतो.' ही दिब्रिटोंची भूमिका राहिली आहे.हे समजून घेण्यासाठी त्यांनी अनेक प्रयोग केले.एकदा पालखीमार्गावर वारकऱ्यांच्या दिंडीतही सामील झाले. तो अनुभव कथन करताना ते लिहितात, 'वारकऱ्यांना बाह्य जगाचे भान उरात
नाही, ते भक्तिरसात आकंठ डुबून जातात. नृत्यरंगी बेभान होतात.... किती अंतर कापले, किती अंतर उरले याचा हिशेब ते ठेवीत नाहीत. गती हीच त्यांची स्थिती.गाव-गाव ते मार्गक्रमण करतात...
शेवटी वाळवंटी तीरी ते खेळ मांडतात....वारी हे मला जीवनाचे प्रतीक वाटते.'
..........................................
*दीपक बीडकर यांची रविवारीय वाचनसभा*.
_वाचन संस्कृतीला समर्पित उपक्रम_