स्टार प्रवाहवर १२ जानेवारीला दुपारी १२ वाजता सुरु होणाऱ्या  ‘मी होणार सुपरस्टार’ या कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

स्टार प्रवाहवर १२ जानेवारीला दुपारी १२ वाजता सुरु होणाऱ्या  ‘मी होणार सुपरस्टार या कार्यक्रमाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. राहुल देशपांडेमृणाल कुलकर्णीआदर्श शिंदे या कार्यक्रमात जजच्या भूमिकेत असून पुष्कर श्रोत्री या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. याचनिमित्ताने सुप्रसिद्ध गायक आणि जज राहुल देशपांडे यांच्याशी साधलेला हा खास संवाद


 


आयुष्यात मिळालेली दुसरी संधी ही अत्यंत महत्त्वाची – राहुल देशपांडे


मी होणार सुपरस्टार या कार्यक्रमाचं वेगळेपण काय सांगाल?


मी होणार सुपरस्टार नावातच खूप सकारात्मकता आहे. स्टार प्रवाहसोबतचा हा माझा पहिलाच कार्यक्रम आहे. इतकी छान टीम आहे त्यामुळे काम करायलाही मज्जा येते. गाण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलेल्या स्पर्धकांसाठी ‘मी होणार सुपरस्टार’चा मंच दुसरी संधी देणार आहे. महाराष्ट्रातून शोधलेल्या ३० स्पर्धकांपैकी कोणत्या स्पर्धकांची निवड करायची हा खूप मोठा प्रश्न होता. त्यामुळे मनावरती दगड ठेवून आम्ही १५ ऐवजी १६ स्पर्धकांची निवड केली आहे. १६ स्पर्धकांमधील प्रत्येकाच्या आवाजात वेगळेपण आहे. प्रत्येकाची गाण्याची स्टाईलही खूप वेगळी आहे. मला खात्री आहे हे आवाज महाराष्ट्राला आवडल्यावाचून रहाणार नाहीत.


 


आयुष्यात दुसरी संधी किती महत्त्वाची आहे?


अत्यंत महत्त्वाची आहे. पण त्या संधीचा तुम्ही कसा उपयोग करता हे देखिल तितकंच महत्त्वाचं आहे. मला लहानपणापासून गाण्याची आवड होतीच. आणि घरात संगीताचा वारसा असल्यामुळे लहानपणापासूनच मला त्याचं बाळकडूही मिळालं आहे. संगीताची आवड जोपासताना मी सीएचं शिक्षणही घेत होतो. आपल्या सर्वाचे लाडके पु ल देशपांडे हे माझ्या आजोबांचे चांगले परिचयाचे होते. त्यामुळे त्यांच्या घरी येणं जाणं व्हायचं. माझी गाण्याची आवड पाहून त्यांनीच मला संपूर्णपणे गाण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. माझ्यामते हा विश्वास ही माझ्या आयुष्यातली दुसरी संधी होती असं मला वाटतं. त्यामुळे ‘मी होणार सुपरस्टार’च्या निमित्ताने स्टार प्रवाहने दिलेल्या या संधीचं सोनं स्पर्धकांनी करायला हवं.


 


या कार्यक्रमाच्या प्रोमोजनी सध्या सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. कार्यक्रमाच्या ग्रॅण्ड ओपनिंग विषयी काय सांगाल?


मी आजवर फक्त ग्रॅण्ड फिनाले पाहिला आहे. पण एखाद्या कार्यक्रमाची इतकी ग्रॅण्ड सुरुवात कधीच पाहिलेली नाही. त्यामुळे १२ जानेवारीचा दिवस खऱ्या अर्थाने अविस्मरणीय ठरणार आहे. दुपारी १२ वाजल्यापासून मी होणार सुपरस्टारची ही रंगतदार मैफल सुरु होणार आहे. उदित नारायण, सुखविंदर सिंग, शान, मिका सिंग, शाल्मली खोलगडे, नकाश अझिझ असे दिग्गज गायक पहिल्या एपिसोडमध्ये हजेरी लावणार आहेत. त्यांची गाणी ऐकणं हा सुखद अनुभव असेल.


 


मी होणार सुपरस्टारच्या सेटवरचं वातावरण कसं असतं?


मी, मृणाल कुलकर्णी, आदर्श शिंदे आणि पुष्कर श्रोत्री आम्हा चौघांचीही छान गट्टी जमून आलीय. आदर्श माझा पहिल्यापासून मित्र होताच. पुष्करच्या एनर्जीबद्दल तर मी काय बोलू...त्याची एनर्जी कधी संपतच नाही. त्यामुळे सलग शूट केल्यानंतरही आम्हाला कंटाळा येत नाही. त्याच्याकडे पाहून नवी स्फुर्ती मिळते. मृणालपण इतकी गोड आहे. तिचा प्रेझेन्स खूप छान आहे. ती प्रत्येकाशीच मायेने बोलते. ‘मी होणार सुपरस्टार’च्या निमित्ताने नवं कुटुंब मिळालं आहे असंच म्हणायला हवं.


 


जजची भूमिका पार पाडणं अवघड आहे असं वाटतं का?


नक्कीच. मी सुद्धा आयुष्यात खूप स्ट्रगल करुन पुढे आलो आहे. त्यामुळे न दुखवता पण तितकंच खरेपणाने मी माझं मत सांगतो. स्पर्धकांचं टॅलेण्ट खरोखर थक्क करणारं आहे. त्यामुळे जज म्हणून आमचाही कस लागतोय. तेव्हा पाहायला विसरु नका १२ जानेवारीला दुपारी १२ वाजता मी होणार सुपरस्टारचं ग्रॅण्ड ओपनिंग आणि त्यानंतर दर शनिवार रविवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.