ऊस तोडणी कामगारांच्या जीवनावर भाष्य करणाऱ्या 'बिंडा'चे पोस्टर प्रकाशन

*ऊस तोडणी कामगारांच्या जीवनावर भाष्य करणाऱ्या 'बिंडा'चे पोस्टर प्रकाशन*


पुणे, : लक्ष्मी एंटरटेनमेंट निर्मित बिंडा या मराठी चित्रपटाचे पोस्टर शिवरत्न शिक्षण संस्थेचे अध्यक्ष धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. हे प्रकाशन शितलदेवी मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी अकलूज येथे करण्यात आले. यावेळी प्रकाशनाला निर्माते विशाल क्षिरसागर, सहनिर्माते भालचंद्र खोसे, रावसाहेब कांबळे, लेखक /दिग्दर्शक बिरा गावडे, कार्यकारी निर्माता विकास क्षिरसागर, मल्हारी गायकवाड, संतोष भोसले, संगीतकार मोनू अजमेरी आणि गीतकार संगीता फुलावळे, क्रिएटिव्ह दिग्दर्शक केतन पेंडसे , असिस्टंट दिग्दर्शक अजित मांदळे, कला दिग्दर्शक धनाजी शिंदे, नृत्य दिग्दर्शक राहुल रेड्डी आणि छायाचित्रकार फिरोज कुरेशी उपस्थित होते. 


बिंडा हा सामाजिक विषयावर भाष्य करणारा चित्रपट असून त्याला प्रेमकथेचा स्पर्श आहे. यामध्ये प्रामुख्याने ऊस तोडणी कामगाराच्या जीवनात होणाऱ्या घडामोडी, त्यांच्यावर होणारे अत्याचार, शैक्षणिक हाल, महिलांवर होणारे अत्याचार, त्यांना दिली जाणारी दुर्लक्षित वागणूक अशा अनेक घटकांना एकत्रित करून चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यात आले आहे. 
समाजात वगळल्या जाणाऱ्या ऊस तोडणी कामगारांच्या जीवनावर प्रकाश टाकून न्याय देण्याचा या चित्रपटाचा उद्देश असल्याचे लेखक दिग्दर्शक बीरा गावडे यांनी सांगितले. 


चित्रपटांतून प्रेक्षक सुधरतही नाही आणि बिघडतही नाही, तरीही चित्रपट बघितल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात चित्रपट संवेदनांना हात घालून घोळत राहतो. चित्रपट हे दुर्लक्षित घटकांना समाजात स्थान मिळवून करून देण्याचे काम करतो. माझ्या बालपणापासून हे जीवन अनुभवत असल्यामुळे त्यांच्या कथा आणि व्यथा मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न चित्रपटाच्या माध्यमातून केला असल्याचे मत गावडे यांनी मांडले.