हर्षवर्धन सदगीर याने तर माती विभागातून शैलेश शेळके याने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश

पुणे : प्रतिनिधी


६३ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये गादी विभागात हर्षवर्धन सदगीर याने तर माती विभागातून शैलेश शेळके याने प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत अंतिम फेरीत प्रवेश केला. आज मंगळवारी (दि. ७ जानेवारी) महाराष्ट्र केसरी किताबच्या आखाड्यात हे मल्‍ल एकाच तालमीतील असून आमनेसामने उतरणार आहेत.


म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडासंकुल येथे ही स्पर्धा सुरु आहे. या महाराष्ट्र केसरी खुला गट माती विभागातील अंतिम फेरीत तुल्यबळ, अटीतटीची, रोमहर्षक, चुरसीची अशा अनेक विशेषणांनी पार पडली. निर्धारित वेळेच्या शेवटच्या ४ सेकंदतही अंतिम विजेता कोण याविषयी संभ्रम निर्माण करत 'काटे की टक्कर' देत लातूरचा शैलेश शेळके व सोलापूरचा ज्ञानेश्वर जमदाडे यांची लढत झाली.
शैलेशने ज्ञानेश्वरवर ११-१० अशा अटीतटीच्या गुणसंख्येने विजय मिळविला व मानाच्या महाराष्ट्र केसरी किताबाच्या अंतिम लढतीत जागा निश्चित केली.


महाराष्ट्र केसरी : गतविजेता, उपविजेता स्पर्धेबाहेर


नाशिक जिल्ह्याच्या हर्षवर्धन सदगीरने मागील महाराष्ट्र केसरी पुणे शहराचा अभिजीत काटकेला ५-२ गुणांनी पराजित केले. त्यामुळे ही कालच्या दिवसातील विशेष लक्षवेधी लढत ठरली. तोडीसतोड चपळ लढत देत अखेर हर्षवर्धन महाराष्ट्र केसरी किताबच्या लढतीस सज्ज झाला.


महाराष्ट्र केसरी खुला गटाच्या माती विभागातील उपांत्य फेरीत ज्ञानेश्वर उर्फ माऊली जमदाडे व गतवर्षीच्या महाराष्ट्र केसरी बाला रफिक शेख यांच्यात चुरसीची लढत झाली. अपेक्षेप्रमाणे बाला रफिकने लीड घेतली होती. पण त्याला तोडीस तोड टक्कर देत माऊलीने एका मिनिटाच्या आत त्याला चितपट करून बाजी मारली व माती विभागातील अंतिम सामन्यात प्रवेश केला. तसेच लातूरच्या शैलेश शेळकेने हिंगोलीच्या गणेश जगतापवर ६-४ गुण फरकाने विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.


पुणे : महाराष्ट्र केसरी खुला गटात होणार चित्तथरारक लढती


पुणे शहराचा अभिजीत कटके व लातूरचा सागर बिराजदार यांच्यात महाराष्ट्र केसरी गादी विभागासाठी चित्तथरारक तुल्यबळ लढत झाली. यात अभिजीतने सागरवर २-० गुणांनी विजय मिळवत गादी विभागातील अंतिम फेरीत प्रवेश केला. तर नाशिक जिल्हयाच्या हर्षवर्धन सदगीरने मुंबई उपनगरच्या सचिन येलवार ६-० ने हरवत अंतिम फेरीत प्रवेश केला.