भारत मातेचे महान सुपुत्र आणि आझाद हिंद सेनेचे प्रवर्तक नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारत रत्न दयावा जपान स्थित बाळासाहेब देशमुख यांची मागणी

कृपया प्रसिध्दीसाठी                                                                                             दि. २२ जानेवारी २०२०


भारत मातेचे महान सुपुत्र आणि आझाद हिंद सेनेचे प्रवर्तक
नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारत रत्न दयावा
जपान स्थित बाळासाहेब देशमुख यांची मागणी


पुणे, दि. २२ जानेवारी: भारताचे महान सुपूत्र आणि आझाद हिंद सेनेचे प्रवर्तक नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद सेनेमध्ये हजारो जपान व भारतातील तरूणांना सहभागी करून आपले बलिदान दिले आहे. अशा भारताच्या महान सुपूत्रास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेऊन भारतरत्न दयावा, अशी मागणी नेताजी सुभाषचंद्र बोस मेमोरियल इंडो-जपान असोसिएशनचे संस्थापक व कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब देशमुख, संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसंतराव गाडगीळ, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू व आईसीसीआरचे माजी उपाध्यक्ष डॉ.एस.एन.पठाण आणि एमआयटी डब्ल्यूपीयूच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे सचिव प्रा. विनोदकुमार जाधव यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांची २३ जानेवारी रोजी जयंती असल्याने ही मागणी देशातील वेगवेगळ्या  काना-कोपर्‍यातून मोठ्याप्रमाणात होत आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जपान ही कर्मभूमी आहे. त्यामुळे तेथे त्यांचे स्मारक उभारण्यात यावे. या कार्यासाठी जपान येथील अकुज नोरी मसासा या शेतकर्‍याने दोन एकर जागा दान दिली आहे. यामुळे भारत सरकारने पुढाकार घेऊन स्मारक उभे करावे अशी ही मागणी त्यांनी केली. या कार्यासाठी भारतीय जनतेने ही सहकार्य करावे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी जपानमध्ये गेल्या ७५ वर्षांपासून रेन्कोजी मंदिर, टोकियो, जपान येथे आहेत. त्याची देखभाल मोची झुकी गुरुजी हे बौध्द भिक्षू करतात. या अस्थी १९४५ साली त्यांच्या आजोबांनी त्या मंदिरात ठेवल्या होत्या. नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यू तैवान येथे विमान अपघातात झाला. त्यांचे सहकारी-मित्र, त्या काळचे जपानच्या मिलिटरीचे प्रमुख त्या अस्थी जपानमध्ये घेऊन गेले.
अस्थी घेऊन जाण्यासाठी त्यांच्या सहकारी मित्रांनाही मोठा धोका होता. कारण तेथे अमेरिकेची सत्ता होती. जो कोणी त्या अस्थी घेऊन जाईल, त्यांच्या जिवाला मोठा धोका होता. टोकियोमध्येही कोणी त्या ठेवून घेण्यास तयार नव्हते. त्यामुळे मोची झुकी यांनी त्या रेन्कोजी मंदिरात ठेवून घेतल्या. आज ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत. रोज सकाळ संध्याकाळ त्या अस्थींची पूजा केली जाते व १८ ऑगस्टला मोठ्याप्रमाणात तेथे पुण्यतिथी साजरी केली जाते. जपानी लोकांमध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याबद्दल नितांत श्रध्दा व प्रेम आहे.
 
फक्त भारतच नाही, तर संपूर्ण आशिया खंड ही स्वतंत्र झाला पाहिजे अशी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांना जपानी जनतेची फार मोठी मदत झाली. आझाद हिंद सेनेची स्थापना करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यावेळी दुसर्‍या महायुध्दात जग बुडालेले होते. त्या जपानी लोकांनी घरात एकही भांडे शिल्लक ठेवले नाही. तसेच, घरात अन्नधान्याचा कणही नव्हता. सर्व काही आझाद हिंद सेनेसाठी समर्पित केले होते. नेताजी सुभाषचंद्र बोस आझाद हिंद सेनेबरोबरच ७० ते ७५ हजार जपानी सैन्य घेऊन इन्फाळपर्यंत पोहोचले होते.
अमेरिकेने नागासाकी व हिरोशिमावर अणुबाँब टाकल्याने त्या जपानी सैनिकांना तेथूनच माघार घ्यावी लागली. त्यावेळी फार बिकट परिस्थितीचा सामना त्यांना करावा लागला. यावेळी जपान येथील संपूर्ण मदत बंद झाली होती. तसेच भारताकडून ही कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळे एकूण ४८ हजार आझाद हिंद सेनेचे तरूण शहीद झाले. त्यात ४५ हजार जपानी तरूण व ३ हजार भारतीय तरूण शहीद झाले होते. त्या काळातच चीनकडे जाताना या महान नेत्याचा विमान अपघातात मृत्यू झाला. तेव्हापासून त्यांच्या अस्थींचे जतन जपान येथे करण्यात आले आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी भारतात आणून १५ ऑगस्टला लाल किल्ल्यावर त्यांचे पूजन करावे. १८ ऑगस्टला त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवसी त्या अस्थींचे विसर्जन गंगेत करावे. अशी इच्छा त्यांचे जपानचे सहकारी मोची झुकी व अन्य जपानी सहकार्‍यांनी व्यक्त केली आहे.
जपानचे पंतप्रधान मा. शिन्झो अ‍ॅबे हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे भक्त आहेत. यांनी भारतात आल्यावर कोलकत्यातील नेताजींच्या स्मारकाला भेट देऊन त्यांच्या स्मृतींला अभिवादन केले होतेे. नेताजींच्या अस्थी भारतात आण्यासाठी ते स्वतः सहकार्य करणार आहेत.  
आजपर्यंत अनेक भारतीय नेत्यांनी जपानच्या रेन्कोजी मंदिराला भेट दिली व तेथील नेताजींची समाधी व अस्थींचे दर्शन घेतले. परंतू कोणीही या अस्थी भारतात आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. आपल्या महान नेत्याच्या अस्थी भारतात आणाव्यात व गंगेत त्यांचे विसर्जन करावे. त्यांना भारतरत्न प्रदान करावे. त्या समारंभासाठी जर्मनीत असणारी त्यांची मुलगी अनिता बोस यांना बोलवावे असे निवेदन नेताजी सुभाषचंद्र बोस मेमोरियल इंडो-जपान असोसिएशन यांच्याकडून पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदी यांना देण्यात आले आहे.
नेताजी सुभाषचंद्र बोस मेमोरियल इंडो-जपान असोसिएशन, टोकियोचे अध्यक्ष श्री. खाजओ खानेको हे आहेत.
भारत मातेचे महान सुपुत्र, आझाद हिंद सेनेचे प्रवर्तक आणि भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक झुंजार व्यक्तिमत्त्व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अस्थी जपानहून आणण्यासाठी विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे, भारत या संस्थेचा सक्रिय सहभाग राहणार आहे.
अशी माहिती नेताजी सुभाषचंद्र बोस मेमोरियल इंडो-जपान असोसिएशनचे संस्थापक व कार्याध्यक्ष श्री. बाळासाहेब देशमुख यांनी दिली.  जनसंपर्क विभाग,
माईर्स एमआयटी, पुणे.