उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून नववर्षाच्या शुभेच्छा-
राज्यातील जनतेच्या जीवनात सुख-समृद्धी आणण्यासाठी
'ट्वेंटी ट्वेंटी' नववर्षात एकजूट होऊन प्रयत्न करुया…
मुंबई, दि. 31 :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आलेलं नवीन वर्ष हे 'ट्वेंटी ट्वेंटी' वर्ष आहे. हे वर्ष राज्यातील जनतेच्या जीवनात सुख, समृद्धी, घेऊन येईल. शेतकरी, कष्टकरी, माता-भगिनींच्या जीवनात आनंद निर्माण करेल, असा विश्वास अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छासंदेशात व्यक्त केला आहे.
नववर्षाच्या शुभेच्छा देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, राज्यातील समस्त जनतेला समृद्ध, प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी एकजुट होण्याचं आवाहन केलं आहे. महाराष्ट्र हे देशातलं सर्वाधिक प्रगत, पुरोगामी राज्य आहे. महाराष्ट्राची ही प्रतिष्ठा कायम राखताना आर्थिक, औद्योगिक, सामाजिक, सांस्कृतिक आघाडीवरही राज्याची घोडदौड कायम रहावी, यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करुया, जात, धर्म, प्रांत असे सगळे भेद विसरुन नवीन महाराष्ट्र घडवूया, असं आवाहन अजित पवार यांनी नवर्षाच्या शुभेच्छा देताना केलं आहे.