काश्मीर मुद्द्यावर मदत करण्यास तयार, डोनाल्ड ट्रम्प यांची इम्रान खान यांच्यासोबत चर्चा
_______________________________
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपण पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यासोबत काश्मीर मुद्द्यावर चर्चा करत असल्याचं सांगितलं आहे. डोनाल्ड ट्रम्प फेब्रुवारी महिन्यात भारत दौऱ्यावर येण्याची शक्यता असून त्याच पार्श्वभूमीवर इम्रान खान यांच्यासोबत काश्मीर मुद्द्यावर चर्चा केली जात आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीदेखील आपण काश्मीर मुद्द्यावर भारत आणि पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करण्यास तयार असल्याचं सांगितलं होतं.
स्वित्झर्लंडमध्ये जागतिक आर्थिक परिषदेदरम्यान इम्रान खान आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. यावेळी दोन्ही नेत्यांनी काश्मीर मुद्द्यावर चर्चा केली. काश्मीरमधील परिस्थितीवर आपण लक्ष ठेवून आहोत असं यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं. यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा मदत करण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी दर्शवली.
गतवर्षी जेव्हा इम्रान खान आणि ट्रम्प यांची भेट झाली होती तेव्हाही त्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. मात्र भारताने हा प्रस्ताव पूर्पणणे नाकारला होता. इम्रान खान यांच्या भेटीदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं की, “आम्ही जास्तीत जास्त व्यवयास करत असून इतर मुद्द्यांवरही मिळून एकत्र काम करत आहोत. आम्ही काश्मीर मुद्द्यावर भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या काय सुरु आहे याचीही चर्चा करत आहोत. आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत. जर आम्ही काही मदत करु शकतो तर नक्की करु”. डोनाल्ड ट्रम्प यांना यावेळी पाकिस्तानचा दौरा करणार का ? असं विचारण्यात आलं असता त्यांनी सध्या तरी आम्ही एकत्र बसलो आहोत असं उत्तर दिलं.