बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांच्याकडून जिवेमारण्याच्या धमक्या

बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांच्याकडून जिवेमारण्याच्या धमक्या


पुणे, ता: १०: बेस्ट इंटरप्रायजेस या मोहीन काझी यांच्या कंपनीला स्क्रॅपचे कॉन्ट्रॅक्ट मिळाले. याआधी हे कॉन्ट्रॅक्ट बाजार समितीचे सभापती शशिकांत दसगुडे यांच्याकडे होते. परंतु ते त्यांना न मिळाल्याचा राग मनातून धरून काझी यांना दसगुडे यांच्याकडून जिवेमारण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. तसेच दसगुडे यांच्या सांगण्यावरून गावगुंड पप्पू पवार, पप्पू राजापूर आणि इतर गुंडांच्या माध्यमातून महिन्याभरापासून धमक्या देऊन रस्त्यावर अडवणूक करून कामात अडथळा निर्माण करून त्रास देत असल्याची माहिती मोहीन काझी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.


याबाबत तक्रार करण्यासाठी पोलिस स्टेशनला गेलो असता पोलिस कुठल्याही प्रकारची दखल घेत नसून उलट राजकीय दबावामुळे दसगुडे यांचे समर्थन करत असल्याचे निदर्शनास आले असल्याचे काझी यांनी सांगितले. दसगुडे यांचा समाजात दबदबा असल्यामुळे पोलीस स्टेशन आणि स्थानिक राजकीय पक्षांचा पाठिंबा असल्यामुळे महिन्याभरापासून आजपर्यंत माझ्या कंपनीला एकही किलो माल उचलता आलेला नाही. पोलिसांकडून सहकार्य मिळत नसल्यामुळे कारेगावचे पीआय राऊत यांच्याकडे तक्रार केल्यानंतर काही गुंडांना अटक करण्यात आली परंतु तरीही अडवणुकीचे प्रयत्न थांबले नसून पोलीस यंत्रणाही मदत करत नसल्याचे काझी यांनी सांगितले.


काझी म्हणाले, गेल्या महिन्यात १२ डिसेंबरला बेस्ट इंटरप्रायजेसला स्क्रॅप उचलण्याचे काम मिळाले होते. हे कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यापासून शिरूर येथील रहिवासी मोहील काझी, त्यांचे कुटुंब आणि कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहे. सुरुवातीला हे कॉन्ट्रॅक्ट बाजार समितीचे सभापती शशिकांत पांडुरंग दसगुडे यांच्याकडे असल्यामुळे बदला घेण्याच्या भावनेतून काझी यांच्यावर पाळत ठेऊन दसगुडे यांचे पुतणे राजेंद्र दसगुडे, पप्पू पवार, पप्पू राजापूरे आणि काही गाव गुंडांनी काझी यांना धमक्या देऊन त्यांचे आर्थिक नुकसान करण्यास सुरुवात केली आहे. 


कॉन्ट्रॅक्ट मिळाल्यापासून दसगुडे यांचे गुंड माझ्या फर्मच्या बाहेर उभे राहू लागले होते त्यामुळे सुरक्षेसाठी मी कारेगाव पोलीस स्टेशनला संपूर्ण घटनेची कल्पना देऊन जीवाला धोका असल्याचा अर्ज केला. परंतु त्याच्या दुसऱ्या दिवशी दसगुडे यांच्याकरवी माझी गाडी अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे मी शिरूर पोलीस स्टेशनला जाऊन फिर्याद दखल करण्याची विनंती केली. त्यांनतर सीसीटिव्ही कॅमेरे तपासून दसगुडे यांचे गुंड पप्पू पवार हे कॅमेरात दिसल्यामुळे त्यांना स्टेशनला बोलावून यांच्याकडून अर्ज लिहून घेतला. त्यानंतर काही तासांनंतर अचानक माझ्यावरच कलम १५१ लावून मला रात्रभर पोलीस कोठडीत टाकण्यात आले. याउलट तीन दिवसांपूर्वी मी कारेगावला असताना पप्पू पवारने पोलीस स्टेशनला माझ्या विरोधात फिर्याद नोंदवून एफआयआर दाखल केल्याचे काझी यांनी स्पष्ट केले.