कर्जत चे गुलमोहर शासकीय विश्रामगृहाची दुरुस्ती कधी संपणार? दोन वर्षांपासून विश्रामगृह वापर बंद

 


कर्जत चे गुलमोहर शासकीय विश्रामगृहाची दुरुस्ती कधी संपणार?

दोन वर्षांपासून विश्रामगृह वापर बंद

कर्जत,दि.30 गणेश पवार

                                 कर्जत या तालुक्याचे ठिकाण असलेल्या शहरात गुलमोहर हे शासकीय विश्रामगृह असून ते अनेक वर्षे बंद आहे.40 वर्षापूर्वी बांधलेल्या या शासकीय विश्रामगृहाची दुरुस्तीचे काम अनेक वर्षे सुरू असून त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत आहे.दरम्यान,या वर्षात झालेल्या मागील तीन महत्वाच्या निवडणुकांसाठी शासकीय विश्रामगृह वापरता आले नाही,याबाबत शासन बांधकाम खात्याला जबाबदार धरणार का?असा प्रश्न उपस्थित होत असून नवीन आमदारांचे काळात या विश्रामगृहाला नवीन रूप मिळणार का?असा प्रश्न समोर येत आहे.

                                  प्रत्येक तालुक्यात शासनाचे विश्रामगृह असते तसे कर्जत या तालुक्याचे ठिकाण असलेल्या गावात 1978 मध्ये बांधण्यात आले.कर्जत शहरातील मुद्रे भागात असलेल्या या शासकीय विश्रामगृह इमारतीला गुलमोहर हे नाव देण्यात आले आहे.चार खोल्या आणि खानसामा असलेल्या या शासकीय विश्रामगृह इमारत गेल्या दोन वर्षापासून बाहेरील पाहुण्यांसाठी आणि शासकीय अधिकारी यांच्यासाठी बंद ठेवण्यात आले आहे.त्याचवेळी गेल्या सहा वर्षांपासून कर्जत शासकीय विश्रामगृह इमारतीची दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहे.दुरुस्ती सातत्याने होत असलेल्या त्या खर्चातून नवीन इमारत उभी राहिली असती असे देखील अनेकदा उपहासात्मक पणे वारंवार बोलले जात आहे.त्यात या भागाचे आमदार राहिलेले सुरेश लाड यांच्या कन्यांच्या विवाह सोहळ्याला शरद पवार यांच्या सारखे बडे आसामी येणार होते,त्यावेळी विश्रामगृह पाडून नवीन इमारत बांधली जाईल असे वाटले होते.पण त्यावेळी झाले नाही आणि आजही दरवर्षी केवळ दुरुस्तीवर लाखोंचा खर्च सार्वजनिक बांधकाम विभागाने आजवर केला आहे.आता सुद्धा गेली सहा वर्षे या शासकीय विश्रामगृह इमारतीचे दुरुस्तीचे काम सुरू आहे,ते काही थांबण्याचे नाव घेत नाही.त्याचवेळी मागील दोन वर्षांपासून या इमारतीमध्ये कोणालाही राहण्यास परवानगी नाही.

                              शासकीय विश्रामगृह बंद असल्याने कर्जत तालुक्यात या वर्षात झालेल्या पाच महत्वाच्या निवडणुकात हे शासकीय विश्रामगृह उपलब्ध होऊ शकले नाही.शासकीय विश्रामगृह हे निवडणूक काळात अधिग्रहण करून निवडणूक यंत्रणा पाहणारे निवडणूक निर्णय अधिकारी हे वापरत असतात. मात्र विश्रामगृह बंद असल्याने निवडणूक कामगिरीवर आलेले अधिकारी यांना अन्य पर्यायी व्यवस्था असलेल्या ठिकाणी राहावे लागले होते.त्यात लोकसभा निवडणुकीसाठी आलेल्या केंद्रीय निरीक्षक यांची राहण्याची व्यवस्था कृषी संशोधन केंद्राच्या भिसेगाव येथील विश्रामगृह इमारतीत करावी लागली होती.तर आताच झालेल्या विधानसभा निवडणुकीचे खर्च निरीक्षक आणि सर्वसाधारण निरीक्षक यांना देखील शासकीय विश्रामगृह ऐवजी कृषी संशोधन केंद्राच्या विश्रामगृह येथे राहावे लागले होते.ते विश्रामगृह हे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयापासून लांब होते.त्यावेळी गुलमोहर हे शासकीय विश्रामगृह निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयापासून 500 मीटर अंतरावर होते.

                              आता कर्जत तालुक्याला नवीन आमदार लाभले असून नवीन आमदार महेंद्र थोरवे यांच्या काळात तरी सार्वजनिक बांधकाम विभाग नवीन विश्रामगृह उभारणार का?असा प्रश्न आहे.मात्र गेली अनेक वर्षे म्हणजे दरवर्षी कायम दुरुस्ती सुरू असणाऱ्या शासकीय विश्रामगृह इमारतीवर सार्वजनिक बांधकाम विभागाने किती खर्च केला गेला?याची माहिती देखील कर्जत उपविभाग लपवित आहे.दुसरीकडे सद्यस्थितीत असलेल्या इमारतीचे स्लॅब हे कोसळण्याचे स्थितीत असताना देखील सार्वजनिक बांधकाम विभाग केवळ इमारतीची दुरुस्ती करण्यावर लाखोंचा खर्च करीत आहेत.त्यामुळे धोकादायक झालेल्या शासकीय विश्रामगृह इमारतीवर सार्वजनिक बांधकाम विभाग आणखी किती खर्च करणार आहे असा प्रश्न शेतकरी कामगार पक्षाचे कर्जत तालुका चिटणीस प्रवीण पाटील यांनी उपस्थित केला आहे.शासकीय विश्रामगृह सुस्थितीत नसल्याने रायगड जिल्हा परिषदेच्या विश्रामगृह इमारतीमधील खोल्या सातत्याने बुक असतात.त्यामुळे बांधकाम विभाग जो खर्च करायचा तो एकदाच करावा आणि शासकीय बांधकाम विभागाचे विश्रामगृह खुले करावे असे आवाहन पाटील यांनी केले आहे.

 

 

 

 

महेंद्र थोरवे-आमदार,कर्जत

शासकीय विश्रामगृह येथे आम्ही लोकप्रतिनिधी नसल्याने जात नव्हतो,परंतु दरवेळी विश्रामगृह बंद आहे असे बोलले जायचे.त्यामुळे आपण त्यासाठी एक बैठक घेऊन कामे लवकर पूर्ण करून इमारतीचा वापर सुरू करण्याचे आदेश देणार आहोत. पण कर्जत मध्ये वाढलेली वर्दळ लक्षात घेऊन आणखी एक नवीन विश्रामगृह सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतीच्या आवारात नवीन विश्रामगृह बांधले जावे याचा आपला प्रयत्न राहणार आहे.

 

 

 

 

सतीश श्रावगे-कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग

नवीन विश्रामगृह इमारत बांधण्याबाबत आपण सकारात्मक असून सातत्याने होत असलेल्या खर्चाचा अहवाल तपासला जाईल.

 

 

 

 

फोटो ओळ

छाय ः गणेश पवार