मेट्रोच्या कामाला गती देण्याचे निर्देश देताना प्रलंबित प्रकल्प वेळेत पुर्ण करावे.....उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवारांनी विविध विषयांवर घेतला आढावा.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला विविध विकास कामांचा आढावा
पुणे, दि. 17 :  जिल्ह्यात शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात आलेली विविध प्रलंबित आणि प्रस्तावित विकास कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाने पुढाकार घ्यावा. कोणतीही कामे प्रलंबित राहणार नाहीत याची संबधित अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी केल्या. तसेच जिल्हयातील विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, अशीही ग्वाही त्यांनी दिली.
          शासकीय विश्रामगृह येथे उपमुख्यमंत्री पवार यांनी जिल्हयातील विविध विकास कामांचा आणि प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी खा.डॉ अमोल कोल्हे, आ. दिलीप मोहिते             आ. सुनिल टिंगरे,आ. चेतन तुपे, आ. अतुल बेनके, विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पीएमआरडीएचे आयुक्त विक्रम कुमार, सोलापुरचे जिल्हाधिकारी   आर.बी. भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता सदाशिव साळुंखे, उपविभागीय अधिकारी जितेंद्र डूडी, महामेट्रो कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दिक्षीत आदी उपस्थित होते.
            यावेळी पुणे महानगर विकास प्राधिकरणा अंतर्गत असलेल्या शिवाजीनगर-हडपसर महामेट्रो तसेच पुणे मेट्रो प्रकल्पाच्या कामाचा सविस्तर आढावा घेताना कामासाठी लागणारा कालावधी, कामाची सद्यस्थिती, भूसंपादनाबाबतच्या अडचणी आदी विषयाबाबत माहिती घेत मेट्रोच्या कामाला गती देण्याचे निर्देश श्री पवार यांनी दिले.
        पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेत श्री पवार यांनी पुणे शहरात विकासकामे करताना दीर्घकालीन विचार करणे आवश्यक असून भौगोलिक विचार करून विकासकामाचे नियोजन करण्याच्या सूचना केल्या. पुणे शहाराच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासनाकडून आवश्यक निधीची गरज लक्षात घेत अर्थसंकल्पात तरतूद करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच राष्ट्रीय नदी संवर्धन योजने अंतर्गत  मुळा-मुठा नदी संवर्धन प्रकल्पाबाबतही त्यांनी सविस्तर आढावा घेतला. भामा आसखेड प्रकल्पाच्या कामासदंर्भात श्री पवार यांनी सविस्तर माहिती घेत याबाबत तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही सबंधित अधिका-यांना केल्या. पुणे महानगरपालिकेकडून राबविण्यात येत असलेल्या घनकचरा व्यवस्थापनासंदर्भातील स्थितीही श्री पवार यांनी जाणून घेतली.
        श्री क्षेत्र देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर, नेवासा पालखीतळ मार्ग विकासकार्यक्रमाबाबत विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी सविस्तर माहिती दिली. यामध्ये देहू,आळंदी भूसंपादन, पंढरपूर येथील वाळवंट सुधारणा कार्यक्रम, पालखी मुक्काम व रिंगण विकास, पालखी तळ भूसंपादन, आदि विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. राज्य शासनाकडून केलेली कामे समाधानकारक असून नागरी सुविधा देणे ही शासनाची जबाबदारी आहे. आपण सर्वांनी मिळून या सुविधांची जपवणूक करणे आवश्यक असल्याचे सांगून संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासाठी तसेच आवश्यक सोयी सुविधेसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही श्री पवार यांनी दिली. 
 चाकण शहराच्या विकास आराखड्याबाबत आढावा घेताना चाकण शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने राज्य शासन आपल्या बरोबर आहे. शहर विकासाचा आराखडा तातडीने सादर करण्याच्या सूचना देत शहरातील प्रलंबित प्रश्नांबाबत लोकप्रतिनिधी व अधिकारी यांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना श्री पवार यांनी दिल्या. 
 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती कार्यक्रम आयोजनाबाबतही उपमुख्यमंत्री पवार यांनी आढावा घेतला, यामध्ये शिवनेरीचे सुशोभिकरण व हरितीकरण तसेच शिवजंयतीच्या आयोजनासंदर्भात जिल्हाधिकारी राम यांनी सविस्तर माहिती दिली. शिवनेरी च्या विकासासाठी यंदाच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद करणार असल्याचेही पवार यांनी सांगितले. यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. 
0000