प्रबोधनकारांचं *बहुजनवादी हिंदुत्व*  उद्धव आणि राज ठाकरे स्वीकारतील का?

प्रबोधनकारांचं *बहुजनवादी हिंदुत्व*  उद्धव आणि राज ठाकरे स्वीकारतील का?


 


प्रबोधनकार ठाकरे यांचा आज 44वा स्मृतिदिन. यानिमित्ताने मुक्त पत्रकार आणि prabodhankar.org या वेबसाईटचे निर्माते-संपादक सचिन परब यांचा हा अभ्यासपूर्ण लेख. शिवसेना आणि मनसेला निवडणुका जिंकायच्या असतील तर त्यांना प्रबोधनकारांच्या मूळ विचारांकडे जावं लागेल, असं त्यांचं म्हणणं आहे.


गेल्या महिन्यात ११ ऑक्टोबरला रामभाऊ हरणेंचं निधन झालं. ते ९९ वर्षांचे होते. शांत, समाधानी, प्रसिद्धीविन्मुख आयुष्य जगलेल्या रामभाऊंच्या निधनाचा इव्हेंट होऊ नये, अशी त्यांच्या कुटुंबाची इच्छा होती. त्यानुसार त्यांच्या जाण्याची कुठे बातमीही झाली नाही. पण ती बातमी होती. कारण ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे थोरले भाऊ होते. राज ठाकरेंनी केलेल्या बाळासाहेबांच्या फोटोबायोग्राफीतल्या ठाकरेंच्या फॅमिली ट्रीमध्ये त्यांना तसा मान दिलाय.


रामभाऊ हरणे हे प्रबोधनकार ठाकरेंचे दत्तकपुत्र. हलाखीच्या दिवसांत ठाकरे कुटुंबासाठी रामभाऊंनी उचललेल्या जबाबदारीचं वर्णन प्रबोधनकारांच्या आत्मचरित्रात आलंय. बाळासाहेबांना हक्काने बाळ म्हणणारे ते शेवटच्या मराठी माणसांपैकी एक असावेत.


रामभाऊंनी दीर्घकाळ प्रबोधनकारांची पत्रं, निरोप डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा अनेक दिग्गजांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. अशा अनेकांच्या बैठकी त्यांनी जवळून अनुभवल्या. ब्राम्हणेतर आंदोलनापासून संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनापर्यंत प्रबोधनकारांच्या प्रवासाचे शेवटचे साक्षीदार आयुष्यभर मूक राहिले आणि आठवणींचा महत्त्वपूर्ण दस्तावेज सोबत घेऊन गेले.


शिवसेनेचा डबल रोल
रामभाऊंच्या निमित्ताने प्रबोधनयुगाला वर्तमानाशी जोडू शकणारा एक दुवा काळाच्या पडद्याआड गेल्याने प्रबोधनकारांचा ४४वा स्मृतिदिन आणखी सुनासुना झालाय. तरीही काळ उलटत चाललाय, तसे महाराष्ट्राला आत्मभान देणारे विचारवंत म्हणून प्रबोधनकार अधिकाधिक रिलेवंट बनत चाललेत.


कोण होते प्रबोधनकार?
बाळासाहेब आणि श्रीकांत ठाकरेंचे वडील. उद्धव आणि राज ठाकरेंचे आजोबा. स्वतःला सापडलेल्या काळाच्या तुकड्यावर या चार ठाकरेंनी स्वतःची लहानमोठी मुद्रा उमटवलीय. त्यामुळे ही उत्तरं स्वाभाविक आहेत.


फक्त प्रबोधनकार ठाकरे यांची ही ओळख तिथेच थांबणं चुकीचं आहे एवढंच. त्यांच्या प्रबोधनकार असण्याबद्दल आदर असणाऱ्यांना त्यांच्या ठाकरे असण्याचं वावडं आहे आणि त्यांच्यावर ठाकरे म्हणून प्रेम करणाऱ्यांना त्यांच्या प्रबोधनकार असण्याचा विटाळ आहे. त्यामुळे आपापल्या चौकटींत बसवण्यासाठी आटापिटा करणाऱ्यांचा प्रबोधनकारांना अख्खं स्वीकारण्यात अडचणच होते.


बाळासाहेब ठाकरेंनंतरची शिवसेना : आव्हानं आणि संधी
'बेरोजगार मराठा तरुणांनी नेतृत्व करण्याची हातची संधी घालवली'
मग आपापल्या सोयीच्या प्रबोधनकारांचा तुकड्या तुकड्यातला वारसा पुढे नेला जातो. सगळ्याच महापुरुषांचं असं होतं. पण प्रबोधनकारांच्या बाबतीत ते अधिक ठळक आहे. कारण अगदी टोकाचे विचार त्यांच्या लिखाणात आणि जगण्यातही सहज एकत्र बागडताना सापडतात.


'दैनिक सामना'ने आज प्रबोधनकारांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन केलं असेलच. आजवरचा अनुभव पाहता त्यात प्रबोधनकारांचा उल्लेख `थोर समाजसेवक, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी, साहित्यिक, नाटककार, वादविवादपटू, प्रभावी वक्ते, झुंझार पत्रकार' असा असतो.


ही विशेषणं आज आपल्या सगळ्यांच्याच सोयीची आहेत. पण बहुजनवादी विचारवंत आणि विद्रोही इतिहासकार ही त्यांची ओळख त्यांच्या व्यक्तित्वाशी अधिक जुळणारी आणि जास्त महत्त्वाची आहे. त्याच भूमिकेतून प्रबोधनकारांनी महाराष्ट्राचे विचार आणि कृती, इतिहास आणि भूगोल याला नवं वळण दिलंय.प्रबोधनकारांचं साहित्य
बाळासाहेबांमुळे प्रबोधनकारांची आठवण महाराष्ट्रात जागती राहिली. तसं झालं नसतं तर प्रबोधनकार सत्यशोधक आणि ब्राम्हणेतर चळवळीतल्या त्यांच्या इतर सवंगड्यांसारखेच विस्मृतीत हरवले असते, हे निश्चित. तरीही त्यांचं फक्त नाव पुसलं गेलं असतं, त्यांनी महाराष्ट्रावर टाकलेला प्रभाव नाही.


प्रबोधनकारांनी त्यांच्या दीर्घ आयुष्यात महाराष्ट्राच्या समाजजीवनातील मोक्याच्या ठिकाणी गाठी मारून ठेवल्यात. त्यामुळे वरवरच्या मलमपट्ट्या सोडून महाराष्ट्राला वारंवार मुळातल्या जातिभेदांच्या जखमांचा शोध घेत खोलात जावं लागतं.


प्रबोधनकार हिंदुत्ववादी होते का?
प्रबोधनकारांचा वैचारिक वारसा बाळासाहेबांनी आणि त्यांच्या शिवसेनेने चालवला का, याचा विचार करताना प्रबोधनकार हिंदुत्ववादी होते, हे विसरून चालणार नाही. गजाननराव वैद्य यांच्या 'हिंदू मिशनरी सोसायटी'चे ते एक प्रमुख नेते होते. धर्मचिकित्सा हा प्रबोधनकारांच्या लिखाणाचा गाभा आहे. त्यांनी हिंदू धर्माची जितकी चिरफाड केलीय, तितकी फार कमी जणांनी केली असावी.
अत्यंत निर्दय शब्दांत त्यांनी हिंदू धर्मातल्या ब्राम्हणी जातवर्चस्ववादी मानसिकतेवर टीका केलीय. `आजचा धर्म हा हिंदूधर्मच नाही. प्रचलित भिक्षुकशाही धर्म हा बुळ्याबावळ्या खुळ्यांना झुलवून भटांची तुंबडी भरणारं एक पाजी थोतांड आहे,' या त्यातल्या त्यात सोबर वाक्यातून प्रबोधनकारांच्या ब्राम्हणशाहीवरील हल्ल्याची कल्पना येऊ शकते.पुरोहितशाही हे हिंदू धर्माच्या आणि पर्यायाने देशाच्या अवनतीचं सर्वांत महत्त्वाचं कारण असल्याचं त्यांनी वारंवार मांडलंय. तेच प्रबोधनकारांचं हिंदुत्व असल्याची मांडणी ज्येष्ठ संपादक ज्ञानेश महाराव यांनी 'प्रबोधनकारांचे ज्वलंत हिंदुत्व' या पुस्तकात केलीय. स्वतः हिंदू आणि हिंदुत्ववादी बनून हिंदू धर्मातल्या ब्राम्हणी वर्चस्वावर कोरडे ओढण्याचा प्रबोधनकारांचा पवित्रा अनेक हिंदुत्ववाद्यांसाठी अडचणीचा 
'बहुजनवादी हिंदुत्वाचे मूळपुरुष' म्हणूनच प्रबोधनकारांचा शोध घ्यायला हवा. या हिंदू धर्माचा खूनच करायला हवा, इथपर्यंत टोकाचा विचार मांडूनही प्रबोधनकार हिंदुत्ववादी राहतात. कारण ते ना हिंदू धर्माचा विरोध करतात, ना हिंदुत्ववादाचा. ते विरोध करतात, हिंदुत्वाच्या नावाने बहुजनांचं शोषण करणाऱ्या ब्राम्हणी पुरोहितशाहीचा. ही सारी मांडणी निव्वळ अचाट आहे.


हे करताना ते कुठेच ब्राम्हणी हिंदुत्ववादाच्या वळचणीला गेलेले नाहीत. छत्रपती शाहूंच्या नंतर ब्राम्हणेतर चळवळीत मराठ्यांच्या दादागिरीला कंटाळून किंवा इतर कुठल्या कारणांमुळे वा. रा. कोठारी, रावबहाद्दूर सी. के. बोले यांसारखे ब्राम्हणेतर आंदोलनातले मोठे नेते हिंदूमहासभेत जाताना दिसतात. पण स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे प्रबोधनकार त्या वाटेकडे ढुंकूनही बघत नाहीत. उलट न. चिं. केळकर, सावरकर या हिंदू महासभेच्या अध्यक्षांवर अनेकदा टीका करतात.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तर त्यांचं टीका करण्यासाठी आवडीचं गिऱ्हाईक असावं, असं त्यांचं लिखाण वाचताना वाटतं. विशेषतः गोळवलकर गुरुजींनी गोहत्येविरुद्ध केलेल्या आंदोलनावर त्यांनी जळगावच्या 'बातमीदार' साप्ताहिकात लिहिलेली लेखमाला आजच्या संदर्भात महत्त्वाची आहे.


संघाला विरोध करणारे प्रबोधनकार
बाळासाहेबांनी तोच धागा पकडून ब्राम्हणी हिंदुत्ववादाला केवळ वापरलं. संघाच्या हिंदुत्वाची नेहमी टवाळीच केली. संघवाल्यांना आपल्या जवळही येऊ दिलं नाही. अगदी सुरुवातीच्या काही घटनांनीच सावध होऊन त्यांनी संघवाल्यांना शिवसेनेच्या संघटनेत शिरू दिलं नाही. संघ हाच आपला संघटन बांधणीतला सर्वांत मोठा शत्रू आहे, हे त्यांना पक्कं माहीत होतं. त्यामुळेच बाळासाहेब असेपर्यंत संघ कधीच शिवसेनेपेक्षा वरचढ होऊ शकला नाही. पण आता पारडं पूर्ण फिरलंय.
आजच्या शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत संघ आतपर्यंत घुसला असावा, असं लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या काळात वाटलं. जवळपास पंधरा वर्षांपूर्वी शिवसेनेचं पहिलं चिंतन शिबीर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत झालं आणि तिथे बाळासाहेबांच्या शिवसेनेला हिंदुत्व शिकवण्यासाठी सु. ग. शेवडे बोलावले गेले.


तसंच एकदा थेट सांगलीच्या भिडे गुरुजींना मार्गदर्शनासाठी आणण्याचा प्रयत्न झाला. आज शिवसेनेच्या अनेक शाखांमध्ये प्रबोधनकारांचा फोटो नाही पण सावरकरांचा आहे. राज ठाकरे यांनी दोनेक महिन्यांपूर्वी पहिलं फेसबूक लाईव्ह केलं, तेव्हा सावरकरांचा फोटो वर आणि प्रबोधनकारांचा फोटो खाली होता. उद्धव ठाकरे यांनी या दोनेक वर्षांतच नागपूरला जाऊन मोहन भागवतांची भेट घेतली होती. प्रबोधनकारांचं हिंदुत्व माहीत नसल्याचे हे परिणाम असावेत.


शिवसेनेने गमावला प्रबोधनकारांवरचा हक्क
पण बाळासाहेब असतानाच या घसरणीची सुरुवात झाली होती. प्रबोधनकारांच्या निधनानंतर वर्षभरातच वरळीची दंगल झाली, हा काही योगायोग नव्हता. या दंगलीत शिवसेनेने सवर्णांची बाजू घेऊन दलितांवर हल्ले केल्याचे आरोप झाले.


बाळासाहेबांनी प्रबोधनकारांकडून आलेली मराठी अस्मिता आणि हिंदुत्ववादाची चलनी नाणी सहज उचलली. पण प्रबोधनकारांच्या जहाल बहुजनवादाचा वारसा बाळासाहेबांनी पुढे चालवला नाही. तो त्यांनी चालवण्याचा थोडाफार प्रयत्नही केल्याचे संदर्भ सापडतात. पण तो बहुधा त्यांना पेलवला नसावा. प्रबोधनकारांनी बहुजनवादापायी स्वतःला पणाला लावून आयुष्याची ससेहोलपट करून घेतलेली त्यांनी पाहिली होती. त्याचा तो परिणाम असावा.प्रबोधनकारांच्या कारकीर्दीवर अनेक ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत.
बाळासाहेब स्वतः जातनिरपेक्षच जगले. याचा अर्थ त्यांना जात माहीत नव्हती असं नाही. महाराष्ट्रातल्या जातींचा इतिहास आणि भूगोल तळहातावरच्या रेषांपेक्षाही चांगला माहीत असलेल्या प्रबोधनकारांचे ते सुपुत्र होते. शिवसेनेच्या राजकीय प्रवासात त्यांनी जातीची ही समज नीट वापरली. काँग्रेसने मराठा, मुस्लिम आणि महार या थ्री एमचं राजकारण केलं.


याच तीन समाजघटकांना विरोध करत बाळासाहेबांनी शिवसेना महाराष्ट्रात पसरवली. ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबेंनी शिवसेनेच्या जातीय बांधणीची नस बरोबर पकडलीय. ते सांगतात, 'मराठेतर सवर्ण आणि महारेतर अस्पृश्य यांनी आपापल्या जातिसमूहांविरुद्ध केलेलं बंड म्हणजेच शिवसेना.'


पण राजकारणात यशस्वी होण्यासाठी बाळासाहेबांना प्रबोधनकारांच्या विचारांपासून दूर जाण्याची किंमत मोजावी लागली. बाळासाहेबांनी रिडल्सला विरोध केला तेव्हा शिवसेना प्रबोधनकारांच्या धर्मचिकित्सेपासून तुटली. तरीही ती शिवशक्ती भीमशक्तीचा प्रयोग करू शकत होती.


राज ठाकरेंच्या व्यंगचित्रांमागचं 'राज'कारण
शिवसेना महाड अधिवेशनापासून रामजन्मभूमी आंदोलनात उतरली, तेव्हा तिने 'देवळाचा धर्म, धर्माची देवळे' या पुस्तकातल्या प्रबोधनकारांच्या विचारांवर हक्क सांगण्याचा अधिकार गमावला. तेव्हाही बाळासाहेब राममंदिराच्या जागी शौचालय बांधा असं सांगू शकत होते. स्वतः भगवी शाल पांघरून रुद्राक्षाची माळ हातात घेणारे बाळासाहेब आध्यात्मिक बुवांवर हमखास टीका करत राहिले.


उद्धव-राज धडा घेतील?
पण बाळासाहेबांनी या कसरती केल्या तशा त्यांच्या नंतरच्या पिढीत होण्याची शक्यता कमी आहे. आमचं हिंदुत्व हे घंटा जानव्याचं नाही, हे उद्धव ठाकरे भाजपवर टीका करताना आजकाल बऱ्याचदा सांगतात. आदित्य ठाकरेही ते सांगू लागले आहेत. पण हे हिंदुत्व घंटा जानव्याचं नाही, म्हणजे नेमकं काय, ते सांगण्यासाठी त्यांना प्रबोधनकारांकडे जावं लागेल.भाजपच्या यशस्वी झंझावातात टिकून त्याला उत्तर द्यायचं असेल तर प्रबोधनकार शोधावे लागतील. अफाट यश मिळवल्यानंतर आज आपल्याबरोबर कोणीही का नाही, हे समजून घ्यायचं असेल तर राज ठाकरेंना प्रबोधनकारांकडे जावं लागेल. मनसेच्या झेंड्यावरचे रंग केव्हाचेच उडून गेलेत. त्या झेंड्यात अपेक्षित सोशल इंजिनिअरिंग हवं असेल तर राज ठाकरेंना बाबासाहेब पुरंदरे नाही, तर प्रबोधनकार ठाकरेंनी लिहिलेला इतिहास समजून घ्यावा लागेल.


बाळासाहेब ठाकरेंच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वात त्यांच्या सामाजिक विचारांची बैठक नेहमीच झाकली गेली. त्यात त्यांच्या राजकारणातल्या यशाचं रहस्य आहे. इतकी वर्षं टिकून राहण्यामागे त्यांची सामाजिक समज कारणीभूत आहे.


उद्धव किंवा राज ठाकरे यांना मराठी अस्मितेचं राजकारण टिकवून ठेवायचं असेल तर जातजाणिवांशी ट्युनिंग जुळवावंच लागेल. नाहीतर बाळासाहेबांच्या निधनाला पाच वर्षं झाली आणि त्यांचं स्मारकही महाराष्ट्रात उभारलं गेलं नाही, अशी आश्चर्यं घडत राहतील. बॅक टू बेसिक्स शिवाय शिवसेना-मनसेला पर्याय नाही. तो पाया प्रबोधनकार आहे. टिकायचं असेल तर त्यांना तिथे जावंच लागेल.