*कर्जमाफी, अनुशेष भरण्यासाठी 'रिपाइं'ची*
*जिल्हाधिकारी कार्यालायासमोर निदर्शने*
पुणे : शेतकऱ्यांप्रमाणे मागासवर्गीय महामंडळाची कर्जे त्वरित माफ करावीत, केंद्र व राज्यातील मागासवर्गीय अनुशेष भरून काढावा, आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी, जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थी व शिक्षकांच्या हल्लेखोरांना त्वरित अटक करून कायदेशीर कारवाई कारण्यात यावी, आदी मागण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले) वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. शेकडो कार्यकर्त्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. 'रिपाइं'चे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाप्रमाणे ही निदर्शने करण्यात आल्याचे, तसेच या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना देण्यात आल्याचे शहराध्यक्ष अशोक शिरोळे यांनी सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली असलेल्या महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य अपंग, वित्त व विकास महामंडळ, इतर मागासवर्ग महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ, महिला आर्थिक विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मउद्योग व चर्मकार विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यासह इतर विविध महामंडळाच्या कर्जधारकांची संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावीत. केंद्र व राज्य सरकारच्या अनेक खात्यात व महामंडळामध्ये मागासवर्गीयांच्या राखीव जागा भरल्या जात नाहीत. त्या त्वरित भराव्यात, राज्यातील कामगार भरतीची कंत्राटी पद्धत रद्द करत कामगारांना नोकरीत कायम करावे. महाविकास आघाडीचे सरकारने शेतकऱ्यांची सरसकट संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा विनाअट तातडीने कोरा करावा, आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी जेएनयु विद्यापीठातील विद्यार्थी व प्राध्यापकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. तसेच या हल्ल्याची सखोल चौकशी करून हल्लेखोरांना कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली. यावेळी 'रिपाइं'चे शहर संपर्कप्रमुख अशोक कांबळे, शहर युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष संजय सोनावणे, बसवराज गायकवाड, शहर सचिव महिपाल वाघमारे, बाबुराव घाडगे, नगरसेविका व पालिकेतील गटनेत्या सुनीता वाडेकर, सोनाली लांडगे, महिला आघाडीच्या शशिकला वाघमारे, प्रसिद्धीप्रमुख शाम सदाफुले यांच्यासह आठही विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.