ई-तिकिटाच्या काळाबाजारातून दहशतवाद्यांना निधी पुरवल्याचा संशय; RPFचा पर्दाफाश _______________________________

ई-तिकिटाच्या काळाबाजारातून दहशतवाद्यांना निधी पुरवल्याचा संशय; RPFचा पर्दाफाश
_______________________________


रेल्वे संरक्षण बला(RPF)नं ई-तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. गुन्हेगारी पद्धतीनं पैसे कमावण्यासाठी टोळीनं वेगवेगळे फंडे वापरल्याचं समजल्यानंतर तपास यंत्रणाही हैराण झाली आहे. या टोळीची सूत्रं दुबई, सिंगापूर आणि पाकिस्तानपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. तसेच या पैशातून दहशतवाद्यांना निधी पुरवला जात असल्याचाही संशय आहे. या प्रकरणात गुलाम मुस्तफा या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. गुलाम मुस्तफा 10 दिवसांपर्यंत तपास यंत्रणांच्या ताब्यात होता. या तपासात टोळीसाठी काम करणाऱ्या वेगवेगळ्या लोकासंदर्भात माहिती मिळाली आहे. एका गुन्हेगारी टोळीप्रमाणे हे लोक काम करत असल्याचंही उघड झालं आहे.
गुलाम मुस्तफा हा सॉफ्टवेअर डेव्हलप करतो आणि टोळीशी संबंधित ग्राहकांना ते विकून टाकतो. याचे धागेदोरे प्रवाशांना तिकीट विकणाऱ्या एजंटांपर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत. याच्या माध्यमातून आलेला पैसा वेगवेगळ्या बँक खात्यात जमा केला जातो. पैसे जास्त झाल्यानंतर त्याचा क्रिप्टो करन्सींद्वारे वापर केला जातो. 
मोरक्या दुबईचा आणि सॉफ्टवेअर कंपनी सिंगापूरची
या टोळीचा म्होरक्या हा दुबईत राहत असून, अद्यापही त्याला पकडण्यात यश आलेलं नाही. याचे धागेदोरे एक सॉफ्टवेअर कंपनीशी जोडलेले आहेत. मनी लाँडरिंगच्या प्रकरणात सिंगापूर पोलीस या सॉफ्टवेअर कंपनीचा तपास करत आहे. आरपीएफच्या डी. जी. अरुण कुमार यांनी सांगितलं की, या टोळीमध्ये सव्वा दोनशे लोक सामील आहेत. या टोळीशी संबंधित 28 लोकांना आरपीएफनं अटक केली आहे. गुलाम मुस्तफाच्या लॅपटॉपमधून अनेक धक्कादायक माहिती मिळाली आहे. ही पूर्ण टोळी तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करून काम करत आहे. गुरुजी नावाचा एक मास्टर माइंड ही टोळी चालवतो. या टेरर फंडिंगचा संबंध तहरिक-ए-पाकिस्तानशी सुद्धा आहे. तसेच दुबई, पाकिस्तान, बांगलादेश आणि युगोस्लाव्हियापर्यंत या टोळीनं हातपाय पसलेले असून, ती दहशतवाद्यांना पैसा पुरवत असल्याचा संशय आहे.