मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार
__________________________________


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. राज्य सरकारचे १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येचा दौरा करतील. ते अयोध्येला भेट देतील अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. संजय राऊत यांनी टि्वट करुन हे सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लोकसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांसह अयोध्या दौऱ्यावर गेले होते. शिवसेना हा पक्ष प्रखर हिंदुत्वाच्या विचारधारेसाठी ओळखला जातो. पण आता राज्यात शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आहे. त्यामुळे शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेल्याची चर्चा आहे.
उद्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पहिले महाअधिवेशन गोरेगावमध्ये पार पडणार आहे. या महाअधिवेशनात मनसेच्या झेंडयाचा रंग बदलण्याचा निर्णय होऊ शकतो अशी चर्चा आहे. मनसेकडून हिंदुत्वाचा मार्ग अनुसरला जाऊ शकतो. त्यामुळे मनसेच्या महाअधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शिवसेनेकडून उद्धव ठाकरे अयोध्येचा दौरा करतील असे जाहीर करण्यात आले आहे.