वस्तीविभागातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी विशेष मोहीम राबविणार - मा.धीरज घाटे*.

*वस्तीविभागातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी विशेष मोहीम राबविणार - मा.धीरज घाटे*.


*संक्रांतीच्या निमित्ताने गरजूंना शालोपयोगी साहित्य भेट देण्याचा क्रिएटिव्ह फौंडेशन चा उपक्रम - संदीप खर्डेकर*.


*समाजाने वस्त्यांमध्ये मुलांना शिकविणाऱ्यांचा आदर्श घ्यावा व त्यांना मदतीचा हात द्यावा - नगरसेविका मंजुश्री खर्डेकर*.


मनपा शिक्षण मंडळ व राज्य शासनाने अथक प्रयत्न करूनही केवळ अज्ञान व मनात अनेक शंका असल्याने अजूनही वस्ती विभागातील मुले शिक्षणापासून दूर असल्याचे ह्या शाळेत आल्यावर लक्षात येते त्यामुळेच यापुढील काळात वस्तीविभागातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी विशेष मोहीम राबविणार असल्याचे पुणे मनपा चे सभागृह नेते धीरज घाटे म्हणाले.वस्ती विभागात काम करणाऱ्या सेवाभावी संस्थांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे वचन देतानाच त्यांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर देउ असेही धीरज घाटे यांनी स्पष्ट केले.
क्रिएटिव्ह फौंडेशनच्या वतीने हिंगणे होम कॉलनी / संभा वस्ती येथे जिव्हाळा बहुउद्देशीय समाज विकास संस्था संचालित अनुराधा प्री प्रायमरी स्कूलमध्ये संक्रांती निमित्त शालोपयोगी साहित्य भेट देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.प्रत्येक सणाच्या निमित्ताने वायफळ खर्च न करता गरजूंना उपयुक्त वस्तू भेट देण्याचा उपक्रम क्रिएटिव्ह फौंडेशनच्या वतीने राबविण्यात येतो असे फौंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सांगितले.वस्तीतील १९० मुले याठिकाणी शिक्षण घेत असून मनपाच्या शाळांमध्ये पटसंख्या कमी होत असताना येथे मात्र येवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी येतात आणि संस्थेच्या विश्वस्त सौ. शर्वरी मुठे व सौ.सुजाता जोशी यांच्यासह सर्व शिक्षक सेवाभावी वृत्तीने कार्य करतात म्हणून त्यांना उपयोगी वस्तू (झेरॉक्स प्रिंटर,वह्या,विविध खेळणी व अन्य साहित्य ) भेट देताना मनस्वी आनंद होत असल्याचे संदीप खर्डेकर म्हणाले.यावेळी सभागृह नेतेपदी निवड झाल्याबद्दल धीरज घाटे यांचा सत्कार करण्यात आला.
मी शिक्षण मंडळ सदस्य असताना आग्रहपूर्वक आठवी व नववी चे वर्ग सुरु करण्याचा प्रस्ताव मान्य करुन घेतला,सातवीनंतर विशेषत: मुलींची शाळा सुटायची व त्यांचे पालक मुलींना घरकामाला जुंपायचे  असे सांगतानाच नगरसेविका मंजुश्री खर्डेकर यांनी वस्तीविभागात अद्यापही सुविधांचा अभाव असल्याने व आई वडिलांच्या अज्ञानामुळे तेथे मुले शिक्षणापासून वंचित असल्याचे अनुभवास येते.अश्या स्थितीत जिव्हाळा संस्थेच्या शर्वरी मुठे व सुजाता जोशी यांचे कार्य आदर्शवत असून समाजातील दानशूर व्यक्तींनी त्यांना मदतीचा हात द्यावा तसेच त्यांना जागा मिळवून देण्यासाठी धीरजजींनी प्रयत्न व सहकार्य करावे अशी अपेक्षा सौ.मंजुश्री खर्डेकर यांनी व्यक्त केली.
संभा वस्तीतील महिला काहीतरी काम द्या असे सांगत भेटायला आल्या,त्यांच्यासाठी शिवणकाम वर्ग सुरु केले व त्यांना प्रशिक्षित करत असतानाच तेथील मुले शाळेत जात नसल्याचे लक्षात आले आणि मग आमच्या संस्थेने चार वर्षापूर्वी ही शाळा सुरु केली असे विश्वस्त शर्वरी मुठे म्हणाल्या.सध्या प्री प्रायमरीला १९० विद्यार्थी असून आता पहिलीचे वर्ग सुरु करायला जागा नसल्याने या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न असल्याचे ही सौ.मुठे यांनी सांगितले.
ज्या शाळांमध्ये पटसंख्या कमी आहे तेथे अश्या चांगले कार्य करणाऱ्यांना जागा देण्याबाबत विचार करु असे धीरज घाटे यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे संयोजन संदीप खर्डेकर यांनी केले ,प्रास्ताविक सौ.शर्वरी मुठे यांनी तर स्वागत व आभार सौ.सुजाता जोशी यांनी केले. यावेळी उद्योजक अरविंद तथा पप्पूशेठ कोठारी,सतीश गायकवाड व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
संदीप खर्डेकर.