ॠणानुबंध,🤝                        पत्रकारितेचे*! 

*ॠणानुबंध,🤝                      


 पत्रकारितेचे*!


     कार्यकर्त्याच्या लेखणीतून, केवळ शाई नव्हे तर त्याचे अनुभवाचे शब्द प्रकट होत असतात, हे माधवराव खंडकरांचे शब्द, माझ्या मनावर कायमचे ठसा उमटवून गेले आहेत. नव्या वर्षाच्या सुरुवातीला, अनेक वृत्तपत्रांचे वर्धापनदिन आणि सहा जानेवारीच्या पत्रकार दिना निमित्ताने, मला या शब्दांची,सुमारे चाळीस वर्षे,  कायमच उजळणी होत असते. 
       वृत्तपत्रे ही कायमच, माझ्या मैत्रीचा  जिव्हाळ्याचा विषय ठरली आहेत. आपणही बातमीदारी करावी, सकारात्मक लेखणीने अनेकांना उमेद द्यावी,समाजाच्या सर्व स्तरात ,आपला लौकीकप्राप्त वावर असावा ,अशी सुप्त इच्छा, कायम जागरूक होती. ध्येय निश्चित झाले आणि या क्षेत्रात, व्यवहारापलीकडचे विश्व मी,आपलेसे केले. 
कार्यकर्ता आणि लेखक पत्रकार, या परस्पर पूरक भूमिकेने, माझी कार्यकक्षा विस्तारत गेली.लोकसंग्रह समृद्ध होऊन, अनेक संस्थांचा,अनमोल सहयोगी ठरलो. अनेक पत्रकार प्रशिक्षण संस्थांचा व्याख्याता झालो. सर्व वृत्तपत्रे, आकाशवाणी, दूरदर्शन मालिकांसाठी लेखन केले. पाच स्वतंत्र पुस्तके प्रकाशित झाली.या व्यवहारी दुनियेत,दृश्यभान नसलेल्या संपत्ती बाबत, मी नशीबवान ठरलो. 
   पत्रकारितेच्या विश्वात,सद्यःस्थितीत, अर्थकारणाचे  आणि नकारात्मक चर्चेचे वादळ घोंघावत असतांना, या लेखणीने माझी स्वतंत्रओळख निर्माण करून दिली. हे ऋणानुबंध, मला कायमच सामर्थ्यदायी ठरले, हे आत्मीयतेने, नमूद करावेसे वाटते.   
    लेखणीला शब्द सामर्थ्याचे वरदान लाभणे, हे  तपश्चर्येचे  फलित असते. सुरेश भटांच्या रचनेत, किंचित बदल करून म्हणावेसे  वाटते  . . . 
 *हा कसा झिम्मा विजांशी, शब्द माझे खेळती*  . . 
  *कोणते आकाश माझ्या अंतरी पान्हावले* !
     आनंद सराफ