शहीद भाई कोतवाल चित्रपटाबद्दल उत्सुकता... 24 जानेवारी रोजी होणार प्रदर्शित हुतात्मा भाई कोतवाल,हिराजी पाटील यांच्यावर आधारित
शहीद भाई कोतवाल चित्रपटाबद्दल उत्सुकता...

24 जानेवारी रोजी होणार प्रदर्शित

हुतात्मा भाई कोतवाल,हिराजी पाटील यांच्यावर आधारित

कर्जत,दि. .20  गणेश पवार

                             कर्जत तालुक्यातील हुतात्मे भाई कोतवाल आणि हिराजी पाटील तसेच भाई कोतवाल यांचे निकटचे साथीदार गोमाजी पाटील यांच्या जीवनावर आधारित शहीद भाई कोतवाल हा चित्रपट येत्या 24 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्यात प्रदर्शित होत आहे.स्वातंत्र्य पूर्व काळातील घटनांवर प्रकाश टाकणाऱ्या या चित्रपटाबद्दल मोठ्या प्रमाणात उत्सुकता लागली आहे.सध्या या चित्रपटाचे ब्रँडिंग सुरू असून ट्रीझर प्रसिद्ध झाल्यापासून सर्वत्र या चित्रपटाची चर्चा सुरू झाली असून प्रत्यक्ष हा चित्रपट कसा आहे हे 24 जानेवारी रोजी प्रदर्शित झाल्यानंतर कळणार आहे.

                           माथेरान येथील थोर क्रांतिकारक भाई कोतवाल यांनी 1942 च्या चलेजाव लढ्यात उडी घेतल्यानंतर त्यांना साथ देण्यासाठी 70 हुन अधिक देशप्रेमी तरुण हे कोतवाल यांना साथ देण्यासाठी एकत्र आले होते.त्यांनी ब्रिटिश सरकार विरुद्ध हाती घेतलेले क्रांतिकारी काम आणि पुकारलेले आंदोलन यात सहभागी तरुण देशप्रमाने देश स्वतंत्र करण्यासाठी उतरले होते.या पथकाने ब्रिटिश सरकार विरुद्ध सळो की पळो असे आंदोलन करून उभा केलेला इतिहास आता पुन्हा जिवंत होणार आहे.मानिवली गाव हे हुतात्मा हिराजी पाटील आणि त्यांचे वडील गोमाजी पाटील यांचे गाव,त्या गावचे सरपंच असलेले आणि हुतात्मा हिराजी पाटील यांचे नातू असलेले प्रवीण पाटील यांनी शहीद भाई कोतवाल चित्रपटाची निर्मिती केली आहे.स्वरजाई प्रोडक्शनने हा सव्वा दोन तासाचा चित्रपट बनविला असून कथा आणि दिग्दर्शन एकनाथ देसले यांचे तर अभिनय आणि संगीत हे मराठी चित्रसृष्टी मधील दर्जेदार लोकांचे लाभले आहे.हा चित्रपट 24 जानेवारी रोजी राज्यात सर्वत्र प्रदर्शित होत असून चित्रपटाच्या यशापेक्षा ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेला चित्रपट सर्वांनी पहावा यासाठी आर्थिक भार उचलून निर्मात्यांनी मोठा गाजावाजा सुरू केला आहे.

                                शहीद भाई कोतवाल हा चित्रपट सर्वांनी पहावा यासाठी मोठ्या प्रमाणात गाजावाजा केला जात आहे.या चित्रपटातील दोन गाण्यांचे हक्क झी म्युझिक ने स्वतःकडे घेतले आहेत.त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दूरचित्रवाणी वर या चित्रपटातील गाणी पाहायला आणि ऐकायला मिळत आहेत.त्याचवेळी राज्यातील नाभिक समाजाने देखील आपल्या जातीचा अभिमान असल्या सारखे या चित्रपटासाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत.भाई कोतवाल हे नाभिक समाजाचे होते आणि त्यांचा गौरवशाली इतिहास चित्रपट स्वरूपात येत असल्याने सर्वत्र केस कापण्यासाठी सवलती जाहीर होत आहेत.त्याचवेळी प्रत्येक दुकानात या चित्रपटाचे पोस्टर लावले जात आहेत.दुसरीकडे भाई कोतवाल,हिराजी पाटील आणि गोमाजी पाटील तसेच त्यांच्या अन्य सहकारी यांचा सर्व पराक्रम ज्या ज्या ठिकाणी घडला,त्या त्या ठिकाणी या चित्रपटाचे शूटिंग करण्यात आले आहे.कर्जत,माथेरान, सिद्धगड अशा ठिकाणी शूटिंग झाल्याने प्रत्यक्ष चित्रपट पाहताना त्यावेळेचा काळ नजरेसमोर ठेवुन हा चित्रपट बनविण्यात आला आहे.त्यामुळे1942 च्या वेळी देश पारतंत्र्यात असताना देशात काय परिस्थिती होती हे अनुभवण्याची संधी या चित्रपटाच्या निमित्ताने मिळणार आहे.दुसरीकडे मराठी मधील दिगग्ज कलाकार हे या चित्रपटात असल्याने चित्रपटाबाबत सर्वत्र प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.

 

 

 

प्रवीण पाटील-निर्माते

आम्ही पैसे कमविण्यासाठी चित्रपट बनविला नाही किंवा हुतात्मा हिराजी पाटील यांचे वंशज म्हणून देखील चित्रपट बनविला नाही.भाई कोतवाल आणू त्यांच्या सहकारी यांनी गाजवलेला इतिहास यांची माहिती सर्वांना व्हावी आणि त्यांचा इतिहास पुढे याव। हा एकच प्रयत्न आहे.

 

 

 

एकनाथ देसले-दिग्दर्शक 

स्वातंत्र्यपूर्व काळ उभा करणे फार कठीण काम असून आम्ही त्यांचा इतिहासची साक्ष देणाऱ्या सर्व ठिकाणी जाऊन आम्ही चित्रपटाचे शुटिंग केले आहे.त्यामुळे आम्ही 100 टक्के प्रयत्न केला आहे असे आमचे मत आहे.त्याचवेळी रायगड,ठाणे,मुंबई मधील तब्बल 2200 कलाकार यांना घेऊन आम्ही सामोरे जात आहोत.

 

 

फोटो ओळ 

चित्रपटाचे पोस्टर असे सर्व सलून बाहेर लागले आहेत.

 छाय ः  गणेश पवार