19 फेब्रुवारी 2020 शिवजयंती उत्सव- माहिती - सफर छत्रपती शिवशंभु निर्मित सह्याद्रीच्या गडकोट, किल्ले या संदर्भात* 🚩🙏🏻🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🙏🏻 *शिवजयंती मना-मनात...* *शिवजयंती घरा-घरात.

*19 फेब्रुवारी 2020 शिवजयंती उत्सव- माहिती - सफर छत्रपती शिवशंभु निर्मित सह्याद्रीच्या गडकोट, किल्ले या संदर्भात*


🚩🙏🏻🚩🙏🏻🙏🏻🙏🏻🚩🙏🏻


*शिवजयंती मना-मनात...*
*शिवजयंती घरा-घरात....*


🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻


*आज शिव सह्याद्री "किल्ले-रांगणा"याची सफर*
 💥💥💥💥💥💥💥💥


*किल्ले रांगणा उर्फ प्रसिध्दगड सहयाद्रीच्या धारेतून दक्षिणेस पसरलेल्या, पण घाटमाथ्यापासून अलग झालेल्या डोंगरावर तसेच देश, कोकण व गोवा यापासून जवळ मोक्याच्या ठिकाणी वसलेला आहे. छत्रपतींच्या आवडत्या किल्ल्यामध्ये याचा समावेश होता, म्हणूनच १७८१ च्या एका ऐतिहासिक कागदपत्रात, ‘येक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित नाहीतर सकल सावंत बारदेशावर उतरेल’ असा उल्लेख आलेला आहे. गडाच्या रांगडेपणाच्या बाबतीत कोल्हापूर जिल्हयात असलेल्या १३ किल्ल्यांमध्ये रांगण्याचा पहिला क्रमांक लागतो. रांगणा किल्ल्यावर जाण्यापूर्वी पाटगांव येथील श्री मौनी महाराजांच्या मठाला भेट देणे आवश्यक आहे. याच ठिकाणी छत्रपतींनी दक्षिण दिग्विजयास जाताना ,१६७६ मध्ये मौनी महाराजांचे आशीर्वाद घेतले होते, या मठास छत्रपती शिवाजी, संभाजी, राजाराम, राणी ताराबाई व राजर्षी छत्रपती शाहू यांनी सनदा दिलेल्या आहेत. मठाच्या मागील पायवाटेने पुढे चालत गेल्यावर भद्रकालीचे यादवकालीन मंदिर लागते. ओवर्‍या, दिपमाळा अशा जुन्या वास्तुंनी मंदिराचा परिसर सजलेला आहे.*


*रांगणा किल्ला बांधण्याचे श्रेय शिलाहार राजा भोज दुसरा याच्याकडे जाते. १४७० मध्ये तो महंमद गवानने जिंकला. त्यावेळी महंमद गवानने काढलेले उद्गार होते, ‘अल्लाच्या कृपेने रांगणा ताब्यात आला. त्यात मर्दमुकीबरोबर संपत्तीही खर्च करावी लागली’.* 


*बहामनी साम्राज्य लयाला गेल्यानंतर हा किल्ला अदिलशाहीत आला. शिवकाळात अदिलशाही सरदार सावंतवाडीचे सावंतांकडे हा गड होता. सन १६५८ मध्ये विजापूरचा सरदार रुस्तम जमानने हा गड सावंताकडून घेतला. शिवरायांचे कोकणातील अधिकारी राहुजी पंडित यांनी रुस्तम जमानकडून हा किल्ला घेतला. पुढे अदिलशहाने रांगण्याविरुध्द मोहिम उघडली. त्यावेळी छत्रपती आग्य्राला कैदेत होते. स्वराज्याच्या अस्तित्वावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. अशा बिकट प्रसंगी स्वत:…*


*जिजाबाईंनी खास मोहिम काढून दि १५/०८/१६६६ रोजी रांगणा जिंकला. ही एक अद्‌भूत घटना रांगण्याचे स्वराज्यातील महत्व अधोरेखीत करते. दि १७/०८/ १६६६ रोजी महाराजांनी आग्य्राच्या कैदेतून पलायन केले. १४ एप्रिल ते १२ मे १६६७ या काळात रांगण्याला बहलोलखान व व्यंकोजी भोसले यांनी वेढा दिला होता. परंतु शिवरायांनी जातीने येऊन हा वेढा मोडून काढला. शिवरायांनी या गडाच्या मजबुतीकरणासाठी ६००० होन खर्च केल्याचा पुरावा सापडतो*


*औरंगजेबाला दख्खन मोहिमेत हा किल्ला जिंकता आला नाही. वारणेच्या तहानुसार रांगण्याचा ताबा करवीरकर छत्रपतींकडे आला. शाहू - ताराबाई संघर्षात पन्हाळयावरुन निघून ताराबाई या गडावर वास्तव्यास आल्या होत्या. सन १७०८ मध्ये सातारकरांनी गडास वेढा दिला, त्यावेळी ताराबाईला सिंधुदुर्गावर पाठवून रामचंद्र पंत अमात्यानी व पिराजी घोरपडे यांनी किल्ला ३ महिने लढविला. पावसाळा सुरु झाल्यामुळे छत्रपती शाहूनी वेढा आटोपता घेतला.*


*सावंतवाडीकरांवर कायम दबाव ठेवण्यासाठी करवीरकराच्या दृष्टीने रांगण्याला विशेष महत्व होते. सावंतवाडीकरांच्या वतीने जिव्हाजी विश्राम यांनी फितुरीने रांगणा हस्तगत केला होता. परंतु करवीरकरांचा निधडया छातीचा वीर सुभान यशवंतराव शिंदे यांनी अडीच महिने झुंज देऊन गड हस्तगत केला. करवीरकरांचे महास्थल म्हणून या गडाचा उल्लेख त्यावेळच्या कागदपत्रात वारंवार येतो. पुढे सावंतवाडीकरांनी करवीरकरांशी एकनिष्ठ राहाण्याचे ठरविले व रांगणा इंग्रजाचे राज्य येई पर्यंत करवीरकरांकडे राहिला.*


*गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे*


*सहयाद्रीतील प्रत्येक गडात प्रवेश करण्यासाठी डोंगरावर चढाई करावे लागते. परंतु रांगण्यात प्रवेश करण्यासाठी चक्क उतार उतरुन गडात प्रवेश करावा लागतो. गडाच्या भव्य बुरुजाच्या डाव्या बाजूने दरीच्या माथ्यावरुन जाणार्‍या छोटया वाटेने पुढे गेल्यावर गडाचा पहिला भग्न दरवाजा लागतो. प्रवेशद्वार परिसराची रचना युध्दशास्त्रातील ‘रणमंडळ’ या संज्ञेप्रमाणे आहे. ती घटकाभर थांबून समजून घ्यावी अशी आहे.* 


*पहिल्या प्रवेशाद्वारातून पुढे गेल्यावर बुरुजाचे संरक्षण देऊन लपविलेला गडाचा दुसरा दरवाजा लागतो. याच्या आत पहारेकर्‍यांच्या देवडया आहेत. या दरवाज्याच्या उजव्या अंगाने जाणार्‍या पायवाटेने गेल्यावर एक कोरडा तलाव लागतो. येथून पुढे जांभ्या दगडात बांधलेली जोती दिसतात. गडाच्या या भागात दोन्ही बाजूने भक्कम तट असून त्यावर चढण्यासाठी जिने आहेत. शेवटी भव्य बुरुजात एक हनुमंताचे शिल्प कोरलेला चोर दरवाजा आहे. परंतु तो दगडांनी चिणलेला आहे. येथून पुन्हा माघारी दुसर्‍या दरवाज्याजवळ यायचे. समोरच उजव्या हातास वाडयाची चौकट दिसते. चौकटीतून आत गेल्यावर विहिर लागते. वाडयाच्या भिंतीजवळ फारसी शिलालेख आहे. वाडा पाहून पुढे गेल्यावर समोरच गडाचा तिसरा भक्कम दरवाजा लागतो. त्याला चार कमानी आहेत. दरवाज्यातून आत गेल्यावर सरळ पायवाटेने पुढे गेल्यास बारमाही भरलेला तलाव लागतो. तलावाच्या दुसर्‍या बाजूस अनेक समाध्या दिसतात. एका कोपर्‍यात भग्न शिवमंदिर दिसते. यानंतर ओढा पार करुन आपण रांगणाई मंदिराजवळ येतो.*


*रांगणाई देवीचे मंदिर प्रशस्त असून, मुक्कामास योग्य आहे. मंदिरात रांगणाई देवीची ढाल, तलवार, त्रिशूळ इत्यादी आयुधे घेतलेली मुर्ती आहे. रांगणाईच्या उजव्या हाताला विष्णूची मुर्ती व डाव्या हाताला भैरवाची मुर्ती आहे. या ठिकाणी एक फारसी शिलालेखाचा दगड आहे. मंदिरासमोरच दिपमाळ आहे. रांगणाई मंदिराच्या उजव्या बाजूला मारुतीचे मंदिर आहे. जवळच कोरडी विहिर आहे.*


*यापुढे दाट जंगल असल्याने आपण पुन्हा तिसर्‍या दरवाज्यापर्यंत माघारी यायचे. तलावाकडे तोंड उभे राहिल्यास डाव्या हाताने जाणार्‍या पायवाटेने चालू लागायचे. वाटेत छोटेसे गणेशमंदिर लागते. तटबंदीच्या बाजूने चालू लागल्यावर एक तलाव लागतो. या तलावाच्या काठावर देवळीमध्ये शिवलिंग आहे. पिंडीस दोन लिंगे आहेत. हे पाहून तटाच्या बाजून पुढे चालू लागल्यावर काही पायर्‍या उतरल्यावर एक दरवाजा लागतो. या दरवाजाच्या डाव्या बाजूस तटबंदीमध्ये गोल तोंडाची विहिर आहे. पुढे चालून गेल्यावर आपण गडाच्या हत्तीसोंड माचीवर पोहोचतो. ही संपूर्ण माची राजगडाच्या संजिवनी माचीप्रमाणे तटबंदीने संरक्षित केलेली आहे. तटबंदीला पायर्‍याही आहेत. तटाच्या उजव्या हाताच्या उतारावर चिलखती बुरुज आहे. हा बुरुज पाहून आपण वर यायचे व सोंडेच्या टोकावर असलेल्या चोर दरवाज्यात उतरायचे. माथ्यावर बारा कमानी असलेला दगडात खोदून काढलेला हा दरवाजा आहे. या दरवाज्यातून उतरण्यासाठी पायर्‍या असून त्या उतरल्यावर आपण दरीच्या तोंडावर येतो, तेव्हा सावधपणा बाळगावा. तटाकडेने पुढे चालत राहिल्यावर आपणास आणखी एक भव्य दरवाजा लागतो. या दरवाज्यातून उतरणारी वाट केरवडे गावात जाते. हा दरवाजा गोमुखी बांधणीचा आहे.*


*तटाकडेने पुढे चालत राहिल्यावर आपण पश्चिमेकडील कोकण दरवाजाच्या माथ्यावर येऊन पोहोचतो. या दरवाज्यावर गोल बुरुज आहे. या दरवाज्यातून उतरणारी वाट कोकणातील नारुर गावास जाते. कोकण दरवाजा रांगणाई देवी मंदिराच्या बरोबर मागे असल्याने आपण पायवाटेने १५ मिनिटात मंदिरात येऊन पोहोचतो.आपल्याकडे पुरेसा वेळ असल्यास भटवाडीत मुक्काम करुन आपणांस सिध्दाच्या गुहा पाहता येतात.*


*गडावर जाण्याच्या वाटा*



*१) कोल्हापूरहून गारगोटी - कडगाव मार्गे पारगाव गाठायचे. पाटगाव पासून तांब्याचीवाडी मार्गे भटवाडी गाठायची. पाटगाव ते भटवाडी १० - १२ किमीचे अंतर असावे. भटवाडी पासून पुढे ४५ किमी वर चिक्केवाडी आहे. मोठी गाडी तांब्याच्या वाडी पर्यंत जाते, पण छोटी गाडी असेल तर ती चिक्केवाडी पर्यंत जाऊ शकते. अन्यथा तांब्याची वाडी ते चिकेवाडी अंतर पायीच कापावे लागते. भटवाडीत पोहोचल्यावर गावाच्या मधून जाणार्‍या रस्त्याने आपण धरणाच्या भिंतीजवळ पोहोचतो. येथून उजव्या हाताने लाल मातीचा गाडी रस्ता सुरु होतो. या रस्त्याने आपण तळीवाडी मार्गे चिक्केवाडीला पोहोचायचे. चिक्केवाडीतून एक ठळक पायवाट रांगण्यास जाते. वाटेत एक दगडी उंबरठा व चौकीचे अवशेष दिसतात. यापुढे येणारी खिंड पार करुन उतरल्यावर आपण रांगण्यासमोरील पठारावर येतो. या पठाराच्या मागच्या झाडीत उजव्या हाताला बांदेश्वराचे मंदिर आहे. येथे विष्णू व गणेशाची भान हरपवणारी मूर्ती आहे. मंदिरासमोर एक जुनी समाधी आहे.*


*२) याशिवाय रांगण्यावर जाण्यासाठी कोकणातील कुडाळजवळील नारुर आणि केखडे गावातून सुद्धा वाट आहे.*


*जय जिजाऊ*
             *जय शिवराय*
                     *जय शंभूराजे*


*आम्हीच ते शिवशंभु सेवक ज्यांना आस इतिहासाची अन शिव-शंभु कार्याची*


*शिवजयंती हा फक्त उत्सव नसुन तर ऐक प्रकारची आधुनिक चळवळच आहे की जी संपूर्ण शिवशंभु चरित्राचे प्रबोधनाची माहितिच्या स्वरुपात सर्वाना देणे हा आमचा हेतु आहे*


*अखिल शिवाजीनगर गावठान शिवमहोत्सव समिति पुणे*🙏🏻💥🚩💥🚩💥🚩